अवलिया / ‘एक रुपया द्या, तुमचे सरकार आणा’ वा ‘नोटा’चे बटण दाबा, अपक्षांचे सरकार आणा

लातूर जिल्ह्यातील ‘राष्ट्रपती’ची बड्या पक्षांना घरी बसवण्यासाठी युक्ती, मुंबईत सीएसटीसमाेर उभे राहून अनाेखा प्रचार, पेटीएम, यूपीआय, भीम अॅपनेही स्वीकारतात देणगी

Oct 13,2019 08:32:00 AM IST

अशोक अडसूळ

मुंबई - प्रचाराचा वाढलेला खर्च, त्यामुळे निवडणुका लढवण्यावर सामान्य माणसांवर आलेली बंधने मोडून काढण्यासाठी मराठवाड्याचे एक ज्येष्ठ नागरिक मुंबईत प्रचार करतोय. ‘एक रुपया द्या, तुमचे सरकार आणा’ अशी त्याची घोषणा असून मुंबईकरांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.


मूळ लातूरकर विजय प्रकाश कोंडेकर (७४) छत्रपती शिवाजी टर्मिनसबाहेर दिवसभर उभे राहतात. सोबत एक स्टीलची पेटी आहे. त्यावर ‘मी मुख्यमंत्री... १ रुपया द्या, तुमचे सरकार आणा’ असा फलक लावलेला आहे. मतदारांनी दिलेला रुपया ते पेटीत टाकतात. मतदानावेळी ‘नोटा’च्या वरचे बटण दाबा... त्यामुळे अपक्ष उमेदवार जिंकून येईल आणि सगळ्या बड्या पक्षांचा बाजार उठेल, असा ते प्रचार करतात. फूटपाथवर जाणारे-येणारे मुंबईकर कोंडेकरांकडे आश्चर्याने बघतात. काही जण थांबतात, म्हणणे ऐकून घेतात. रुपयाचे नाणे देतात. काही जण ५०/१०० ची नोट पेटीत टाकतात. काही सरकारवर संताप व्यक्त करतात. कोंडेकर १९ आॅक्टोबरपर्यंत प्रचार करणार आहेत.


पेटीएम, यूपीआय, भीम अॅपने मतदारांना एक रुपयाचे दान करता यावे यासाठी त्यांनी फलकावर भ्रमणध्वनी टाकला आहे. दिवसभर फूटपाथवर प्रचार आणि रात्र सीएसटीवर अशी कोंडेकरांची दिनचर्या आहे. त्यांचे पुण्यात कुटुंब आहे. १९९० पासून ते वेगवेगळ्या माेहिमा चालवतात. या विधानसभेला त्यांनी अपक्षांना निवडून आणण्याची मोहीम हाती घेतली आहे.

असे आहे कोंडेकर यांचे गणित :

अपक्ष उमेदवारांची नावे ईव्हीएमवर सर्वात खाली असतात. त्याखाली नोटाचे बटण असते. ‘नोटा’च्या वरचे बटण बहुसंख्य मतदारांनी दाबले तर अपक्ष उमेदवारच निवडून येणार, असा कोंडेकरांचा तर्क आहे.

‘राष्ट्रपती’ टाेपण नावाने कोंडेकरांची ओळख

१ विजय कोंडेकर मूळचे शिरूर अनंतपाळचे (जि. लातूर). राज्य वीज मंडळातील कायमची नोकरी सोडून १९९० पासून ते राजकारणात सक्रिय झाले. ‘राष्ट्रपती’ या टाेपण नावाने ते ओळखले जातात.

२ त्यांनी ६ लोकसभा निवडणुका लढवल्या. १९९० मध्ये विलासराव देशमुख यांच्याविरोधात लातूरमध्ये, तर २०१९ मध्ये पुण्यात गिरीश बापट यांच्याविरोधात लढले.

३ कोंडेकर यांनी आजपर्यंत तब्बल तीन वेळा राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

४ राष्ट्रपती होईपर्यंत कपडे घालणार नाही, अशी शपथ घेतली. १९९० पासून आजपर्यंत धोतराशिवाय वरती शर्ट, बनियन परिधान केलेला नाही.

कोंडेकरांमुळे केंद्राला काढावे लागले वटहुकूम

१ १९९३ च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबातून १० जागी कोंडेकरांनी उमेदवारी दाखल केली होती. जर कोंडेकरांचे काही ‘बरे-वाईट’ झाले असते तर दहा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पुन्हा घ्यावी लागली असती. त्यामुळे लोकसभेचे निकाल लांबले असते म्हणून केंद्राने दोन वटहुकूम काढले. एक म्हणजे अपक्ष उमेदवाराचे निधन झाल्यास निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबवायची नाही. दुसरा म्हणजे एक व्यक्ती दोनपेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारी दाखल करू शकणार नाही.


२ कर्नाटकातील बेल्लारीत कोंडेकरांनी लोकसभा लढवली. त्या वेळी त्यांनी ‘नो सिम्बाॅल इज माय सिम्बाॅल’अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे निवडणूक यंत्रणेची धावपळ उडाली होती.

X