आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख मदत द्या; पीक कर्ज, वीज बिल माफ करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्षांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सायंकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. परतीच्या पावसाने राज्यात उद‌्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, वीज देयक व पीक कर्जसुद्धा माफ करावे आणि नुकसानीच्या पंचनाम्याची मुदत वाढवून द्यावी, अशा मागण्यांचे निवेदन या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिले.


राजभवनात राज्यपाल यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्याच्या सहा विभागात परतीच्या पावसाने तब्बल दीड कोटी एकर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हातचे पीक वाया गेले आहे. रब्बी हंगाम तोंडावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे व पीक कर्ज तत्काळ पुरवणे गरजेचे आहे. सरकारने २५ हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.


फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांना प्रति हेक्टरी दोन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. चिखलामुळे बरेच पंचनामे बाकी आहेत. त्यामुळे पंचनाम्यांची मुदत वाढवून द्यावी. पैसे नसतील तर सरकारने ओव्हरड्राफ्ट घ्यावा, अशी मागणी करत राज्याचा पोशिंदा जर मोडून पडला तर राज्यही मोडून पडेल, असे अजित पवार म्हणाले.


विनोद तावडे राजभवनावर आले होते, तुमची त्यांच्याशी चर्चा झाली काय? या प्रश्नावर पवार म्हणाले, 'कदाचित विधानसभेचे तिकीट का कापले, हे राज्यपाल महोदयांना ते विचारायला आले असतील. या शिष्टमंडळात छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे तर विजय वडेट्टीवार, अमित देशमुख अादी उपस्थित हाेते.

सरकारला काळजीच नाही : बाळासाहेब थाेरात
कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ असे दुहेरी संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. नुकत्याच उद‌्भवलेल्या पूरसंकटाचे ६ हजार ८०० कोटी पैसे केंद्राने अद्याप दिलेले नाहीत. आता या नुकसानीचे पैसे कधी येणार, असा सवाल करत काळजीवाहू सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांनी केला.

शिवसेनेने 'एनडीए' सोडावी, राष्ट्रवादी साथ देण्यास तयार

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून अाॅफर

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हा जनादेशाचा अवमान आहे. तशी वेळ राष्ट्रवादी येऊ देणार नाही. शिवसेना जर 'एनडीए'तून बाहेर पडली तर सत्ता स्थापनेसाठी त्यांना पाठिंबा देण्यास अाम्ही तयार अाहाेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी सांगितले.


मलिक म्हणाले की, भाजपला वगळून राज्यात सरकार स्थापन होऊ शकते. मात्र त्यासाठी शिवसेनेने पुढाकार घ्यायला हवा. आघाडीतील एकही आमदार भाजपच्या संपर्कात नाही. भाजपने कर्नाटकप्रमाणे फोडाफोडीचा प्रकार केल्यास भाजपात गेलेले आघाडीचे आमदार घरवापसी करतील. त्यामुळे भाजपचे संख्याबळ आणखी घटेल, असा इशारा मलिक यांनी भाजपला दिला.


शरद पवार दिल्लीहून मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत परतणार आहेत. बुधवारी ते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी राजकीय परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रवादीतून सांगण्यात आले.

अाता पाडण्यात अामची मास्टरकी : जयंत पाटील
उमेदवार फोडण्याची धमकी भाजपने देऊ नये. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचा एकही आमदार राजीनामा देऊन भाजपात गेल्यास त्या जागी त्याच पक्षाचा दुसरा उमेदवार आघाडी निवडून आणेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. उमेदवार पाडण्यात अाता आमची मास्टरकी झाली आहे, असे ते म्हणाले.