आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धी व्यंकटेशाला 1008 खाद्यपदार्थांचा भोग: 30 वर्षांची परंपरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थानतर्फे दिवाळीच्या पंचमीला सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता १००८ खाद्यपदार्थांचा अन्नकूटचा प्रसाद चढवण्यात आला. देवस्थानात ही परंपरा मंदिर निर्मितीपासून म्हणजे सन १९८८ पासून सुरू आहे. यात सिद्धी व्यंकटेशाला मोसंबीद्वारे तर माता लक्ष्मीला ५० ते ६० हजार बांगड्यांद्वारे सजवण्यात आले होते. या वेळी मंदिरात सायंकाळी ५.३० वाजेपासूनच भाविकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. 


श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थानतर्फे दर वर्षी अन्नकूटचा कार्यक्रम घेण्यात येतो. मात्र, यंदा तब्बल १००८ खाद्यपदार्थांचा अन्नकूटचा प्रसाद तयार करण्यात आला. यानिमित्ताने मंदिराला मोठ्याप्रमाणावर सजवण्यात आले होते. तसेच १००८ अन्नपदार्थांचा प्रसाद अतिषय आकर्षक पद्धतीने मांडण्यात आला होता. हा प्रसाद वाट्यांद्वारे अतिषय गोल आकर्षक व मोठ्या गोलमध्ये मांडण्यात आला होता. तसेच देवस्थानतर्फे प्रत्येक भाविकाला जेवण देण्यात येत होते. यात चार ते साडेचार हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम देवस्थानतर्फे करण्यात आला होता. आरतीच्या आधी सिद्धी व्यंकटेशाची धातूच्या मूर्तीला पाच प्रदक्षिणा घालतल्या. एका भाविकाने ही मूर्ती डोक्यावर धारण केली. तर दोन जण मूर्तीला हवा घालत होते. तसेच इतर जण घंटी व शंकनांद करत होते. भाविक महिलांनी भजने म्हणून परिसर भक्तीने भरला. 


भजने, शंखनाद; सायंकाळी दर्शनासाठी मोठी गर्दी, साडेचार हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ 

श्री सिद्धी व्यंकटेश मंदिरात सोमवारी अन्नकूट कार्यक्रमात आकर्षक पद्धतीने रचन्यात आलेले विविध १००८ पदार्थ. तसेच भजन गाताना महिला भाविका. व्यंकटेश अन् लक्ष्मीच्या मूर्तींनी भाविकांचे वेधले लक्ष अन्नकूट कार्यक्रमात सिद्धी व्यंकटेशाच्या मुख्य मूर्तीला पूर्णपणे मोसंबीद्वारे सजवण्यात आले होते. तर माता लक्ष्मीच्या मूर्तीला ५० ते ६० हजार रंग असलेल्या काचेच्या बांगड्यांद्वारे सजवण्यात आले होते. यात हिरव्या, लाल, गुलाबी, भगव्या या रंगातील बांगड्यांचा समावेश होता. दोन्ही मूर्ती बांगड्यांमुळे व मोसंबीमुळे अतिषय प्रसन्न वाटत होत्या. 
अन्नकूटमध्ये तिखट, गोडसह विविध खाद्यपदार्थांचा समावेश 


अन्नकूट कार्यक्रमात भगवान व्यंकटेशांना १००८ खाद्यपदार्थांचा प्रसाद चढवण्यात आला. यात विविध प्रकारची शेव, तिखट व गोड बुंदी, विविध डाळी, चवळीचे दाणे, मुरमुरे, चिवड्याचे, बर्फीचे विविध प्रकार, हिरवा वाटाणा, पिकलेली व कच्ची केळी, मोसंबी, बदाम, बत्ताशे, गोड मिरची, वडे, भजे, श्रीखंड, गुलाब जामून, काजू कथली आदी १००८ खाद्यपदार्थ देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केले.


श्री रामसापीर सेवा मंडळ ट्रस्टतर्फेही अन्नकूट 
गणेशवाडीतील श्री रामसापीर सेवा मंडळ ट्रस्टच्या मंदिरात कार्तिक लाभ पंचमी दिवाळीनिमित्त अन्नकूट महाप्रसाद देवाला अर्पण करण्यात आला. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्त मंदिराला परंपरेनुसार फुलांची आरास करून सजवण्यात आले होते. अन्नकूट महाप्रसादाचा परिसरातील दोन हजार भाविकांनी लाभ घेतला. सकाळी ११.३० वाजता रामदेवबाबांची महाआरती महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते करण्यात आली. तर सुनीता राठी, वैशाली बांगर, मंगला बिर्ला, शांता बिर्ला, मीना शर्मा यांनी रांगोळी काढून सजावट केली होती.

 

या वेळी ट्रस्टचे चेअरमन अशोक लाठी, चत्रभूज राठी उपस्थित होते. कार्यक्रमास व्हाइस चेअरमन नंदलाल व्यास, सचिव शरद लाठी, विश्वस्त विलास चौधरी, सोहनलाल शर्मा, शिववल्लभ राठी, पंकज जैन, प्रदीप जोशी, चंदनमल अग्रवाल, चंदन अबोटी, विजय बाहेती, नितीन चांडक, श्यामसुंदर बिर्ला, रामनिवास धूत, नारायण मणियार, अभिलाष राठी, प्रकाश बिर्ला, दिनेश राठी, महेश मणियार यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...