आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आहेरात दिली लग्नपत्रिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सध्या लग्नसराईचा काळ आहे.औरंगाबाद शहरातील सप्तपदी मंगल कार्यालयात एकाच दिवशी दोन लग्ने लागतात.याची मलाही कल्पना नव्हती, पण माझ्या बायकोच्या मैत्रिणीच्या मुलीचे लग्न होते म्हणून आम्हाला सहकुटुंब तेथे जायचे होते. बायकोचे आवरणे सकाळी आठपासून सुरू होते. मुहूर्त सकाळी साडेदहाच्या सुमाराचा होता.मुहूर्तावर पोहोचणे गरजेचे म्हणून वेगाने स्कूटर दामटत होतो. रस्त्यावरच्या गर्दीतून मार्ग काढत मंगल कार्यालय गाठले. वरात दारात आलीच होती. नवरदेवाचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीत होत होते. घोडयापुढे नवरदेवांची मित्रमंडळी डीजेच्या तालावर जल्लोषात नाचत होती.

आजूबाजूला गर्दी जमली होती. बरे झाले! आपण वेळेवर पोहचलो.तू मैत्रिणीशी बोल, मी स्कूटर बाजूला लावतो, तू हो पुढे.’ असे तिला म्हटले.ती पोराचा हात धरून गर्दीत मिसळली. मी गाडी पार्क करून मंगल कार्यालयात गेलो. दारावर उभ्या यजमानाचे स्वागत स्वीकारत मंडपात शिरलो. मंगलाष्टके चालू झाली होती. अक्षता टाकल्यानंतर नवरा-नवरीला शुभेच्छा देणा-यांची धांदल उडाली. मी सौ. ला शोधत होतो. पण गर्दीत ती दिसत नव्हती. तिला शोधतच स्टेजवर गेलो. नवरीने वाकून नमस्कार केला. मीही आशीर्वाद देत तिच्या हाती पाकीट दिले आणि घाम पुसत मंडपाबाहेर आलो.तितक्यात, सौ. च समोरून येताना दिसली. अहो, होता कु ठे तुम्ही? चला, मंदा,तुमची वाटत पाहते आहे. तिची ओळख करून देते. मी म्हणालो, मी तर आताच नव-या मुलीला आशीर्वाद देऊन आलो. ‘झाले! केला वेंधळेपणा. अहो माझ्या मैत्रिणीच्या मुलीचे लग्न इकडे होते. तुम्ही तिकडे कुठे शिरलात?’ म्हणजे आम्ही दुस-याच लग्नात गेलो तर... अरे देवा! सौ. मागून चालताना सहज खिसा चाचपून पाहिला, तर आहेराचे पाकीट तसेच! म्हणजे दुसरा घोटाळा केला खरा, पण आहेर समजून लग्नपत्रिकाच तिकडे दिली गेली होती. हे मात्र तिला शेवटपर्यंत सांगितले नाही.