आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतुल पेठकर
नागपूर - जैवविविधतेचा होत असलेला ऱ्हास, वाढते कार्बन उत्सर्जन, निसर्गाचे बिघडलेले संतुलन यामुळे आज जागतिक हवामान बदलाचे संकट उभे ठाकले आहे. भूगर्भातील पाण्यापासून नैसर्गिक वायू संसाधनांपर्यत खनिज संपत्ती आटत चालली आहे. नैसर्गिक आपत्तीत वाढ होत आहे. याचा इशारा महात्मा गांधींनी यापूर्वीच दिला होता. त्यामुळेच आज जागतिक हवामान बदलाचे संकट निर्माण झाले आहे, अशा भावना वर्धा येथील नयी तालीम शाळेत गांधीजींच्या अभ्यासासाठी आलेल्या दक्षिण कोरियातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादातून त्यांना समजलेले गांधीजी उलगडत गेले...
> प्रश्न : महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाने भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात संवादाचा पूल बांधला जाईल, असे तुम्हाला वाटते का?
उत्तर : महात्मा गांधी हे केवळ भारताचे नाही तर जागतिक नेते आहेत. त्यांचे विचार मानवतेला एकत्र आणतात. आमचे संस्थापक श्री यांग कोरियन सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेबद्दल असमाधानी होते. योग्य पर्याय शोधण्यासाठी त्यांनी जगभर प्रवास केला. आणि बऱ्याच वेगवेगळ्या वैकल्पिक शैक्षणिक मॉडेल्स बद्दल जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील टॉलस्टाॅय फार्ममधील गांधींच्या शैक्षणिक प्रयोगांविषयी अभ्यास केला. त्यानंतर कोरियन मुलांना याच शिक्षण पद्धतीची गरज असल्याचे त्यांना पटले. यातून मुलांना काम करता करता जगाला समजून घेता येईल, अशी त्यांना खात्री होती. अशा प्रकारे त्यांनी गांधींच्या कल्पना दक्षिण कोरियामध्ये आणल्या. आम्हाला असे वाटते की दक्षिण कोरियातील अर्थ व्यवस्थेबद्दलच्या त्यांच्या कल्पना केवळ दक्षिण कोरियाच नव्हे तर जगात इतर ठिकाणीही लागू होण्यासारख्या आहेत.
> प्रश्न : तुमच्या मते व्यक्तिमत्त्वातील कोणत्या वैशिष्ट्यांमुळे महात्मा गांधी जागतिक प्रतीक होऊ शकले?
उत्तर : गांधीजींना आम्ही एक कुशाग्र बुद्धीचा आणि मनाने एक साधा माणूस म्हणून ओळखतो. “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. सत्याच्या प्रयोगाने त्यांनी जगाला अहिंसा, स्वावलंबन, करुणा आणि समुदाय सहकार्य ही तत्त्वे दिली. सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वत: आचरणात आणली. त्यांच्या समाजजीवनाच्या प्रयोगांची अनेक जिवंत उदाहरणे आहेत. सेवा ग्राम हे त्यापैकीच एक. उक्ती आणि कृती एकच असलेले फार थोडे नेते होऊन गेले. म्हणूनच त्यांचा उपदेश लोक नि:शंकपणे पालन करतात. त्यांचे जीवन आजही प्रासंगिक आहे. या प्रासंगिकतेमुळे ते आजही हवे आहेत.
> प्रश्न : महात्मा गांधींच्या अहिंसेची तत्त्वे संघर्ष निराकरणात कशी मदत करू शकतात?
उत्तर : गांधीजींची अहिंसा म्हणजे निष्क्रिय प्रतिकार नाही, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यांची अहिंसा म्हणजे सक्रिय करुणा आहे. म्हणूनच ते इतरांचा द्वेष किंवा तिरस्कार करीत नाही. खरं तर, ते सर्वांबद्दल दया भाव व्यक्त करतात. अहिंसा हे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या वाढीसाठी एक शक्तिशाली साधन आहे. योग्य काय आहे आणि सर्वांच्या हिताचे काय आहे याचा सारासार विचार करून आपली मुले स्वतःचा संघर्ष सोडवतात.
> प्रश्न : एक गट म्हणून, आपल्यावर प्रभाव पाडणारी गांधीजींची मूल्ये कोणती आहेत?
उत्तर : वर नमूद केल्याप्रमाणे, आम्ही अहिंसा, आत्मनिर्भरता, करुणा आणि समुदाय सहकार्य या मूल्यांचे पालन करतो आणि ही मूल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या शालेय अभ्यासक्रमात या मूल्यांचा अभ्यास केला जातो. आमचे शिक्षक यासाठी वचनबद्ध आहेत.
गांधीजींना श्रमिकांबद्दल खूप आदर होता
मी अगदी लहान असताना गांधीजींबाबत माहिती मिळाली. आमच्या पाठ्यक्रमात त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर मला ते खूप भावले. कारण त्यांचे अनेक विचार आमच्या देशाला लागू होतात. उच्चशिक्षित आणि कार्यालयात काम करणाऱ्या उच्चपदस्थांना खूप महत्त्व दिले जाते. परंतु कष्टकरी, कामगार व मजुरांना फारच कमी महत्त्व दिले जाते. त्यांना श्रमिकांबद्दल आदर होता. स्वत:ची कामे ते स्वत:च करायचे, ही गोष्ट मला आवडते. अहिंसेबद्दल ते आग्रही होते. पण, प्रत्यक्ष जीवनात त्याचे पालन करणे वाटते तितके सोपे नसते.
दार्म किन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.