Home | National | Other State | Goa CM Monohar Parrikar died

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 18, 2019, 08:02 AM IST

गोव्याचे चार वेळा मुख्यमंत्री, नंतर संरक्षणमंत्री... आज राष्ट्रीय दुखवटा

 • Goa CM Monohar Parrikar died

  पणजी | गोव्याचे ४ वेळा मुख्यमंत्री व संरक्षणमंत्रिपद भूषवलेले भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांचे रविवारी निधन झाले. ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी हाेते. सोमवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील. २००१ मध्ये त्यांची पत्नी मेधा यांचेही कर्करोगाने निधन झाले होते. २०१८ मध्ये निदान झाल्यानंतर न्यूयॉर्कपर्यंत उपचारांचे प्रयत्न झाले. परंतु डॉक्टरांना यश आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकरांच्या निधनाने कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याचे सांगत सोमवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. पर्रीकर हे देशातील पहिले आयआयटीयन मुख्यमंत्री हाेते.

  मनोहर पर्रिकरांचा प्रवास
  13 डिसेंबर 1955 रोजी मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील मापुसा येथे जन्म झाला. मार्गोओ येथील लोयोला हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे माध्यमिक शिक्षण मराठी भाषेतूनच झाले. पुढे 1978 साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

  आयआयटी शिक्षित मनोहर पर्रिकर हे भारतातील पहिले आमदार होते.

  मनोहर पर्रिकर यांनी सुरूवातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केले. तरूण वयातच ते संघात मुख्य शिक्षक बनले. पुढे राजकारणात त्यांनी भाजपमधून प्रवेश घेतला.

  1994 साली पहिल्यांदा पर्रिकर गोवा विधानसभेत आमदार म्हणून निवडूण गेले. जून 1999 ते नोव्हेंबर 1999 या काळात गोव्यात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2000 रोजी मनोहर पर्रिकर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पुढे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठा कालावधी गोव्यात घालवला.

  2014 साली केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर मनोहर पर्रिकर हे देशाचे संरक्षणमंत्री झाले. त्यासाठी उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेवर गेले. मात्र, गोव्यात राजकीय त्रिशंकु स्थिती निर्माण झाल्याने, पर्रिकर पुन्हा गोव्यात परतले आणि मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. पण, याच काळात त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले, आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Trending