आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदाघाटाचा परिसर बनला टवाळखोरांचा अड्डा; महापालिका प्रशासनासह पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या गोदाघाटांचा अनेक ठिकाणी टवाळखोरांनी ताबा घेतला आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी गैरप्रकार होत असून, घाटांची दुरवस्था झाली आहे. महापालिका अधिकाऱ्यांची अनास्था आणि पोलिस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे गर्दुल्ले आणि टवाळखोरांचे मात्र चांगलेच फावत आहे. 

 

गोदावरी नदीच्या काठी भाविकांची गरज लक्षात घेता महापालिकेच्या वतीने घाटांचा विकास करण्यात आला होता. मात्र, सिंहस्थानंतर ओस पडलेल्या या विनावापर घाटांचा गैरवापर सुरू झाला आहे. काही ठिकाणी वाहनांची पार्किंग, कुठे कपडे व वाहने धुण्याचे प्रकार, तर काही ठिकाणी गैरप्रकारांसाठी या घाटांचा वापर होताना दिसतो आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार सर्रास सुरू आहेत. 

 

शहराच्या सौंदर्यीकरणासोबतच भाविकांना सुविधा मिळावी, हा या घाटांच्या विकासामागील मुख्य हेतू होता. त्यासाठीच घाट परिसर प्रशस्त करण्यात आला. तसेच, विद्युत रोषणाईमुळे पर्यटकांसह स्थानिकांसाठी हा परिसर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. सिंहस्थानंतर या घाटांच्या देखभाल, दुरुस्तीकडे पालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठ फिरवली आहेे. त्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता, पथदीप बंद अशी या घाटांची अवस्था आहे. रात्रीच्या वेळी टवाळखोरांकडून या ठिकाणी गैरप्रकार सुरू असतात. परिणामी या परिसराला टवाळखोरांचा अड्ड्यासारखे स्वरूप प्राप्त झाले आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस याबाबत भाविकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता महापालिकेसह पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे. गोदाघाटांची हानी टाळण्यासाठी आणि पावित्र्य कायम राखण्यासाठी वृक्षलागवडीसह येथील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडून ठोस उपाययोजनांची गरजही व्यक्त होते आहे. 

 

अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करण्याची गरज 
घाट परिसराच्या दुरवस्थेबाबत दिवसेंदिवस नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. घाटांच्या दुरवस्थेमुळे लाखो रुपये वाया गेल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत ठाेस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...