आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरीला पूर : धरणे ओसंडली, आणखी तीन दिवस बरसण्याचा हवामान खात्याचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे / नाशिक - राज्याच्या विविध भागांत दमदार पावसामुळे धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ होत असून पश्चिम महाराष्ट्र, नाशिक परिसरात अनेक धरणे ओसंडली आहेत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही ठिकाणी संततधार सुरू असून आगामी तीन दिवस पावसाचा जोर टिकून राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. किनारी प्रदेशात सोसाट्याचे वारे वाहतील आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

दरम्यान, नाशिक व नगर जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील धरणे भरू लागली असून या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उद्यापर्यंत पाण्याचा वेग वाढवण्यात येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 
 
> ८३,७७३ क्युसेक वेगाने नांदुर मधमेश्वर पिकअप वेअरमधून गोदावरी नदीमध्ये विसर्ग { गंगापूर धरणातून सकाळी नऊपासून १७७४८ क्युसेक पाण्याच्या विसर्ग करण्यात अाल्याने  गाेदावरीने नाशकात शनिवारी धाेक्याच्या पातळी गाठली. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने. 
 
>  नगर : भंडारदराून प्रथमच प्रवरामध्ये साडेचार हजार क्युसेक वेगाने विसर्ग. हे पाणी कायगाव टोका येथे गोदावरी-प्रवरा संगमात दाखल होईल.
 

प.महाराष्ट्रात धरणे तुडुंब 
> पानशेत : धरण काठोकाठ भरल्याने आंबी नदीत विसर्ग सुरू.

> कोयना : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस सुरू असल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांनी उचलून सुमारे २० हजार क्यूसेकने विसर्ग.

> खडकवासला : धरण पूर्ण भरल्याने मुठा नदीत शनिवारी सकाळपासून १६ हजार क्यूसेकने विसर्ग.

> वरसगाव, टेमघर : ही धरणेही भरण्याच्या वाटेवर. भामा आसखेडमधून आठ हजार क्यूसेकने भीमा नदीत पाणी सोडले.

> डिंभे : धरण पूर्ण भरल्याने ५ हजार क्यूसेक विसर्ग चालू. 
 

जायकवाडीतील पाणीसाठा ११.५९% 
पैठण - जायकवाडी धरणाच्या वरील भागात असलेल्या धरणांतून विसर्ग सुरू असल्याने शुक्रवारी रात्रीच्या माेजणीनुसार जायकवाडीतील पाणीसाठा ११.५९ टक्क्यांवर आला. नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक सुरूच राहणार असल्याने जायकवाडीतील पाणीपातळी रविवार संध्याकाळपर्यंत चांगली वाढू शकेल.
 

गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
औरंगाबाद - नाशिक जिल्ह्यातील धरण प्रकल्प क्षेत्रात सतत पाऊस चालू आहे. येत्या ३-४ दिवसांत  आणखी पावसाची शक्यता पाहता जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. गोदावरी नदीलगत पूरस्थिती असल्याने गोदाकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. नदीपात्रात प्रवेश करू नये, जनावरांना मोकळे सोडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले.
 

मुंबई : पांडवकडा धबधब्यात ४ मुली बुडाल्या, ३ मृतदेह सापडले
मुंबई - नवी मुंबईतील खारघरजवळील पांडवकडा धबधब्यात एका कॉलेजमधील चार विद्यार्थिनी वाहून गेल्याची घटना शनिवारी घडली. पैकी तीन मुलींचे मृतदेह सापडले आहेत. चारही विद्यार्थिनी सहलीसाठी पांडवकडा धबधब्यावर आल्या होत्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात प्रवाहात वाहून गेल्या. सकाळी ११ वाजता ही घटना घडली. मृतांत चेंबूर येथील नेहा जैन (१९) हिचा समावेश आहे.