Home | Business | Personal Finance | Gold price increase in market due to investment demand

गुंतवणुकीसाठीच्या मागणीमुळे बाजारामध्ये सोन्याच्या किमतीत वाढ 

नवनीत दमाणी | Update - Feb 13, 2019, 09:10 AM IST

सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांनी सोन्याची निवड करणे सुरू केले आहे. 

 • Gold price increase in market due to investment demand

  नवी दिल्ली- डॉलरमध्ये घसरण आणि गुंतवणूकदार आणि व्यापारी यांच्या वतीने खरेदीमध्ये करण्यात आलेल्या वाढीमुळे महिन्याभरापासून बुलियन बाजारात तेजी आहे. अमेरिका आणि चीन यांच्या दरम्यान सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरल्याने सोने खरेदीचा कल आणखी वाढला आहे. २०१८ मध्ये अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याज दरात वाढ करण्याची गती मंद होण्याच्या अपेक्षेने काही काळ आलेली तेजी सोडली तर सर्वाधिक काळ घसरणच दिसून आली. सोन्याच्या किमतीमधील तेजी केवळ डॉलर घसरल्यामुळे आलेली नाही. गुंतवणुकीसाठीची मागणी वाढल्यानेही किंमत वाढली आहे. मागील काही महिन्यांमध्ये गोल्ड ईटीएफची खरेदी वाढल्यामुळे लक्षात येते की, गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढली आहे. अमेरिका आणि चीन यांच्या दरम्यान व्यापारी युद्धाची भीती तर आहेच पण त्याच बरोबर अमेरिकी सरकारच्या आंशिक शटडाउनमुळेही शेअर संदर्भात अनिश्चिततेचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांनी सोन्याची निवड करणे सुरू केले आहे.

  डॉलरमध्ये कमजोरीचे संकेत :
  जानेवारीमध्ये अमेरिकेचे जाहीर झालेले आर्थिक आकडे नकारात्मक आहेत. डिसेंबरच्या पे-रोल आकडेवारीनुसार ३ लाख नोकऱ्या मिळाल्या आहेत. मात्र, जानेवारीमध्ये आकडे कमी होऊन २.२२ लाख राहिले. त्याच बरोबर जानेवारीमध्ये प्रतितास उत्पन्नातील वाढही डिसेंबरच्या तुलनेत कमी राहिली. यामुळे डॉलर कमजोर होत असल्याचे प्राथमिक संकेत मिळाले. चौथ्या तिमाही मध्येही अमेरिकेकडून मजबूत आकडेवारीची अपेक्षा नाही. त्यामुळे सोन्याच्या मागणीतील तेजी कायम राहण्याची अपेक्षा आहे.

  अमेरिकेमध्ये व्याजदर ऐतिहासिक सरासरीपेक्षा कमी :
  फेडरल रिझर्व्हने त्यांच्या मागील बैठकीत व्याजदर यथास्थिती ठेवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकी अर्थव्यवस्थेवरील संकटांची स्थिती पाहता पतधोरण आढावा घेताना कडक धोरणाचा अवलंब करण्याची योजनादेखील आता संपली असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि अर्थसंकल्पासंदर्भातील देशांतर्गत ओढाताण पाहता अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये सध्या २.२५ टक्के ते २.५ टक्क्यांच्या दरम्यान व्याजदर आहेत. हे ऐतिहासिक सरासरीपेक्षा कमी आहे. जर यामध्ये वाढ करण्यात आली नाही तर भविष्यात एखादे संकट आले तर त्यात कपात करण्याची जास्त संधी राहणार नाही.

  फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि चीन या देशांच्या अधिकाऱ्यांमधील चर्चा पुढे सरकली तर सोन्याच्या किमतीमध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीनचे राष्ट्रपती दोन्ही देशांच्या दरम्यान व्यापारी वाद संपवण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस व्हिएतनाममध्ये भेटण्याचेही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  ३४,२०० रु. पर्यंत किंमत जाण्याची शक्यता :
  भारताचा विचार केल्यास आंतरराष्ट्रीय किमतीच्या तुलनेत सोन्याच्या दरात भारतीय बाजारात तेजीने वाढ झाली आहे. रुपयामध्ये घसरण झाल्याने सोन्याच्या दरात आणखी वाढ होत आहे. यामुळे सोन्याची किंमत मागील साडेपाच वर्षांच्या उच्चांकावर गेलेली आहे. एक्स्चेंजमध्ये याची किंमत १,३५० ते १,४२० डॉलर प्रतिऔंसपर्यंत जाऊ शकते. देशांतर्गत बाजारात सोने ३३,७०० ते ३४,२०० रुपयांदरम्यान राहण्याची अपेक्षा आहे.

  - हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. या आधारावरील गुंतवणुकीतून नुकसान झाल्यास दैनिक 'दिव्य मराठी' नेटवर्क जबाबदार राहणार नाही.

Trending