आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने घोटाळ्यातील जैनची २१ बँकांमध्ये ६० खाती; चेकबुक, पासबुकचा पोलिसांसमोर खच, राजेंद्रने केलेले आर्थिक व्यवहार तपासणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वामन हरी पेठेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या राजेंद्र किसनलाल जैनने (३९, रा. समर्थनगर) दीड वर्षामध्ये शहरातील २१ बँका,  पतसंस्था व मायक्रो फायनान्समध्ये जवळपास ६० खाती उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बँकेच्या पासबुक, चेकबुकचा खच सध्या तपास अधिकाऱ्यांच्या पुढे पडला आहे. शहरातील कोणा-कोणासोबत राजेंद्रने आर्थिक व्यवहार केले, याचा पोलिस बारकाईने तपास करत आहेत.


४ जुलै राेजी आर्थिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केल्यानंतर पेठे यांच्या एका शाखेतून २७ कोटींचा घोटाळा समोर आला. गुन्हे शाखा एक महिन्यापासून याचा तपास करत होती. परंतु जैनने पोलिसांना दाद दिली नाही व भाच्यासह त्याला अटक करण्यात आली. सध्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड राजेंद्र जैन याच्याभोवतीच तपासाची चक्रे फिरत आहेत. त्याशिवाय व्यवस्थापक अंकुर अनंत राणे व जैनचा भाचा लोकेश जैन यांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे. शनिवारी रात्री तपास पथकाने जैनच्या बँक खात्यांची चौकशी सुरू केली. सिद्धार्थ उद्यानाजवळील पार्किंगमध्ये उभ्या करत असलेल्या गाडीतून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये २१ बँक खात्यांचे एकापेक्षा अधिक पासबुक व अनेक चेकबुक सापडले. हे सर्व चेकबुक व पासबुकची रविवारी दिवसभर पथक कसून तपासणी करत होते. यातून लाखो रुपयांचे व्यवहार झाले आहेत. यात जैनने शहरातील जवळपास प्रत्येकच बँकेत किमान दोन ते कमाल १२ पर्यंत खाती उघडली. यात बँकेतर्फे संशय व्यक्त केला जाऊ नये म्हणून विविध १३ पेक्षा अधिक जणांच्या नावाने खाती उघडली आहेत. यात त्याच्या पत्नी, मुले, गाडीवरील चालकांसह टाकलेल्या विविध व्यवसायांच्या नावाने खाती आहेत. 


फर्निचर ५० लाखांच्या घरात : जैनने समर्थनगर येथील कोटी रुपयांच्या दोन फ्लॅटपैकी एका फ्लॅटमध्ये ५० लाख फर्निचरवर खर्च केले. मागील दोन दिवसांमध्ये त्याच्या बालाजीनगर, समर्थनगर येथील तिन्ही फ्लॅटची तपासणी सुरू आहे. यात रविवारी पोलिसांनी त्याच्या साडी विक्रीच्या नोंदी व व्यवहार असलेले रजिस्टरदेखील ताब्यात घेतले. पोलिस घरी गेल्यावर जैनचे वयोवृद्ध आई-वडील पोलिसांसमोर शांत बसले होते. 


भ्रष्टाचारातून व्यावसायिकतेकडे 
जैनच्या गाड्यांमध्ये तब्बल २६ गाड्यांची कागदपत्रे आढळून आली. यात दुचाकी, चारचाकींह पोकलेनचा समावेश आहे. गाड्यांच्या व्यवहाराचे बाँड सापडल्याने गाड्यांची नेमकी मालकी तपासली जात आहे. २६ वाहनांच्या गाडीची कागदपत्रे पोलिस सोमवारी आरटीओला पाठवून माहिती घेतील. प्राथमिक तपासात ही सर्व वाहने जैनची असून त्याने मागील काही वर्षांमध्ये ती वेगवेगळ्या नावावर ठेवली. त्यातील काही विकली तर काही व्यवसायासाठी लावल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.