आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत अंत्यसंस्कार योजना नव्याने सुरू होणार; अंत्यसंस्कारासाठी आता नागरिकांना मोजावे लागणार नाहीत पैसे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मनपाने सन २०१२ मध्ये शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू केली, परंतु पुढे ती निधीअभावी बंद पडली. आता ती नव्याने सुरू होण्याच्या हालचाली आहेत. वसुधा वुडलेस क्रिमेशन या स्वयंसेवी संस्थेने प्रती अंत्यसंस्कार दोन हजार रुपये घेऊन लाकडाचा वापर न करता यंत्र आणि गोवऱ्यांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्याचा प्रस्ताव मनपासमोर ठेवला आहे. चर्चेअंती ही रक्कम आणखी कमी होऊ शकते. अर्थात रक्कम कितीही ठरली तरी नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. प्रतापनगर, कैलासनगर, पुष्पनगरी, एन-६, मुकुंदवाडी आणि बनेवाडी स्मशानभूमीत प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू केली जाईल. यासाठी २२ ते २३ लाखांचे प्रत्येकी एक यंत्र खरेदी करणार आहे. मनपाने हे यंत्र खरेदी करून देणे आणि अंत्यसंस्काराची रक्कम देणे असे योजनेचे स्वरूप असेल. त्यासाठी विशिष्ट यंत्रावर गोवऱ्या ठेवून, यंत्र विद्युत जोडणी करून अंत्यसंस्कार केले जातात. एका अंत्यसंस्काराची प्रक्रिया दीड ते दोन तासांत पूर्ण होते. भविष्यात हीच पद्धत अंगीकारली जाण्याची शक्यता आहे. 

 

६ यंत्रे खरेदीसाठी मनपा तरतूद करणार असल्याचे घोडेले यांनी स्पष्ट केले असले तरी काही उद्योजक, बँका आणि सीएसआर फंडातून यंत्र उपलब्ध करून देण्यास राजी असल्याचे त्यांनी सांगितले. दोन संघटनांनी दोन यंत्रे देण्याचे कबूल केले आहे. किमान सहा यंत्रे पहिल्या टप्प्यात दिली जातील. विश्व हिंदू परिषदेच्या प्रांताचे गोरक्षक सेलचे अध्यक्ष राजेश जैन आणि वसुधा संस्थेचे संचालक अभिषेक उंटांगळे यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे. सभागृहात यावर निर्णय घेतला जाईल. 

 

वीज, यंत्राचा वापर पण विद्युतदाहिनी नव्हे 
या प्रक्रियेत यंत्राचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी वीज जोडणी लागेल. वीज आणि यंत्र आले म्हणजे ही विद्युतदाहिनी तर नव्हे ना, असा प्रश्न नागरिकांना पडू शकतो, परंतु ही दाहिनी नाही. मृतदेह जाळण्यासाठी गोवऱ्यांचा वापर होईल. लाकडाची गरज पूर्ण करण्यासाठी यंत्राची मदत होईल. २ हजार रुपये मनपाला खर्च येणार आहे. मात्र, नागरिकांना शून्य खर्च येणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...