आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाला सुखद धक्का

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश चतुर्थी आली की मला हमखास या प्रसंगाची आठवण येते. गेल्या गणेश चतुर्थीस माझे यजमान काही कामानिमित्त बाहेरगावी होते. मी एकटीच गणपतीची मूर्ती आणण्यासाठी बाजारात गेले. तेथे विविध स्टॉलवर गणेशांच्या आकर्षक मूर्ती होत्या. त्या विविध रूपातील मूर्ती पाहूनच भान हरपून गेले. चोहीकडे ‘गणपतीबाप्पा मोरया,’ ‘आला रे आला, गणपती आला,’ अशा विविध घोषणा देत गणेश भक्तांनी परिसर दुमदूमन सोडला होता. गणेशाच्या जयजयकारात अनेक भाविक प्रतिष्ठापनेसाठी मूर्ती उत्साहात घेऊन जात होते. मीही एक सुंदर शाडूपासून बनवलेली गणपतीची मूर्ती विकत घेतली. घरी जाण्यासाठी मी ऑटोरिक्षा केली. मूर्ती घेऊन आमचा रिक्षा गर्दीतून वाट काढत निघाला. मी मूर्तीला घेऊन शांत बसलेली पाहून तो म्हणाला, मावशी, तुम्ही ‘गणपतीबाप्पा मोरया’चा जयघोष करत नाही का? मी एकट्याने कशी जयजयकार करू असे म्हणताच, त्यानेच रिक्षा चालवता-चालवता ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. माझ्याही अंगात उत्साह संचारला.

घर येईपर्यंत तो आणि मी मिळून जयजयकार करत होतो. घराजवळ आल्यानंतर दार उघडताना मूर्तीस खाली ठेवत होते. तेव्हा तो पुढे झाला आणि म्हणाला, ‘मावशी, गणेशाच्या मूर्तीला खाली ठेवू नका. मी उचलून घेतो, तोपर्यंत तुम्ही दरवाजा तर उघडा.’ त्याने घरातील बैठकीच्या हॉलमध्ये असलेल्या टेबलावर मूर्ती ठेवली. त्याला पिण्यासाठी पाणी दिले. नंतर रिक्षाचा किराया देण्यासाठी घराबाहेर आल्यावर माझ्या लक्षात आले, गणपतीबाप्पाचा जयजयकार करणारा तो तरुण मुस्लिम समाजाचा असूनही गणरायाचे उत्साहात स्वागत करत होता. मी थक्कच झाले. गणरायाच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी सर्व समाजबांधव एकत्र येतात, हे वाचले होते. आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. लोकमान्य टिळकांनी सर्व समाज एकत्र यावा, यासाठीच गणेशोत्सव आणि शिवजयंती सार्वजनिकरीत्या साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. तो किती सार्थ होता, हे दिसून आले.