Smartphone / देशातील 1.5 कोटी स्मार्टफोनमध्ये सध्या गुगल-जीमेल बंद होणार नाही

हुवावेच्या नवीन स्मार्टफोनमध्ये गुगल सपोर्ट सर्व्हिसची अडचण होण्याची शक्यता

वृत्तसंस्था

May 22,2019 11:00:00 AM IST

नवी दिल्ली/वॉशिंग्टन/बीजिंग - स्मार्टफोनधारकांसाठी सध्या दिलासा देणारे वृत्त आहे. अमेरिकी सरकारच्या वतीने चीनमधील अव्वल दूरसंचार कंपनी हुवावेला पुढील ९० दिवसांपर्यंत गुगल आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीचा वापर करण्यासाठी दिलासा देण्यात आला आहे. अमेरिकी सरकारने अलीकडेच दिलेल्या आदेशानंतर गुगलने हुवावे कंपनीशी संबंध तोडण्याची घोषणा केली होती. हुवावेच्या स्मार्टफोनवर गुगल अॅपचे अॅक्सिस मिळणार नसल्याचे कंपनीने सांगितले होते. त्याचबरोबर जे ग्राहक हुवावेचा जुना स्मार्टफोन वापरतात त्यांनाही ऑपरेटिंग प्रणालीचे नवीन अपडेट मिळणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले होते.


असे असले तरी भारतातील हुवावेच्या कस्टमर केअर सेंटरच्या वतीने सांगण्यात आले की, हुवावेचे जे फोन आधीपासूनच सुरू आहेत, सध्या तरी त्या फोनमध्ये अडचणी येणार नाहीत. गुगल, जीमेल आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणाली अाधीप्रमाणेच काम करत राहील. त्यांच्या वतीने सांगण्यात आले की, हुवावेच्या नवीन स्मार्टफोनमध्ये गुगल सपोर्ट सर्व्हिसची अडचण होण्याची शक्यता आहे. मात्र, ही अडचण दूर करण्याचा कंपनी प्रयत्न करत आहे. दूरसंचार विभागानुसार भारतात सध्या जवळपास ४० कोटींपेक्षा जास्त स्मार्टफोन आहेत.

X
COMMENT