आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलने विनयभंग प्रकरणातील अधिकाऱ्याला पुन्हा दिले एक्झिट पॅकेज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को - तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी गुगलच्या वतीने विनयभंग प्रकरणातील आणखी एक आरोपी अमित सिंघल यांना ४.५ कोटी डॉलरचे (३१२ कोटी रुपये) एक्झिट पॅकेज देण्याचे प्रकरण समोर आले आहे. विनयभंग केल्याचा आरोप झाल्यानंतर सिंघलकडून २०१६ मध्ये राजीनामा घेण्यात आला होता. कंपनी एखाद्या अधिकाऱ्याला नोकरीवरून काढत असेल, अशा वेळी एक्झिट पॅकेज दिले जाते. त्या अंतर्गत देण्यात येणारी रक्कम आधीच निश्चित करण्यात येणाऱ्या अटीमध्ये निश्चित केलेली असते. सिंघल यांना काढण्यात आले, त्या वेळी त्यांना किती रक्कम देण्यात आली याची माहिती मिळाली नव्हती. याबाबतचा खुलासा या प्रकरणावर शेअरधारकांच्या वतीने गुगलवर दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये झाला आहे. यामध्ये गुगलची मालकी असलेली कंपनी अल्फाबेटवर आरोप करण्यात आला आहे की, कंपनीने सिंघल यांना एक्झिट  पॅकेज देऊन स्वत:ची जबाबदारी झटकली आहे. कंपनीवर विनयभंग  प्रकरणाविरोधात सक्ती न दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.   


यामध्ये झालेल्या खलाशानुसार सिंघल यांना काढण्याआधी दोन वर्षे १.५-१.५ कोटी डॉलर (१०४-१०४ कोटी रुपये) आणि तिसऱ्या वर्षी ५० लाख डॉलर (३५ कोटी रुपये) ते १.५ कोटी डॉलर देण्याची तयारी दर्शवली होती. यामध्ये तीन वर्षांपर्यंत स्पर्धक कंपनीमध्ये काम न करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, गुगलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी उबेरमध्ये कामाला सुरुवात केली. काही आठवड्यांतच त्यांच्यावरील विनयभंगाचे आरोप सार्वजनिक झाल्यामुळे त्यांना तो जॉबही सोडावा लागला. तंत्रज्ञान क्षेत्रातील वेबसाइट टेक क्रंचनुसार अशा प्रकारे गुगलने सिंघल यांना १.५ कोटी डॉलरच दिले होते. गुगलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, कंपनीने कामाच्या ठिकाणी अनेक बदल केले आहेत. आता कोणत्याही व्यक्तीने चुकीचा व्यवहार केल्यास त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जाते.


अमित यांनी आयआयटी रुरकीमधून घेतली पदवी 
 सिंघल यांच्यावर एका महिला कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप केला होता. गुगलने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर हा आरोप योग्य असल्याचे समाेर आले. त्यानंतर सिंघल यांचा राजीनामा घेण्यात आला. सिंघल या प्रकरणात दोषी होते, त्यामुळे अशा वेळी त्यांना एक्झिट पॅकेज देण्याची आवश्यकता नव्हती, असे शेअरधारकांचे म्हणणे आहे. झाशीमध्ये जन्म झालेल्या सिंघल यांनी आयआयटी रुरकी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी मिनेसोटा विद्यापीठामधून एमएसची पदवी घेतली. ते १५ वर्षांपर्यंत गुगलच्या कोअर सर्च टीमचे प्रमुख होते.  

बातम्या आणखी आहेत...