आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोटूल एक विद्यापीठ!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोटूल ही आदिवासी समाज संस्कृतीतील बहुआयामी व्यवस्था आहे. गावाच्या विकासाचे, जत्रा-उत्सवांच्या विधींचे निर्णय तिथे घेतले जातात. गावाचे प्रश्न तिथे मांडले जातात. ते सोडवण्याचे मार्ग शोधले जातात. या अर्थाने गोटूल ही ग्रामसभा आहे, सामाजिक-सांस्कृतिक केंद्र आहे, शिक्षण-प्रशिक्षणाचे साधन आहे, सामूहिक संवादाचे माध्यम आहे, गावातील प्रश्न सोडवण्याचे कोर्टही आहे.  गडचिरोली आणि माडिया आदिवासी अशी ओळख सांगताच शहरातील अनेकांचे डोळे लकाकतात. नक्षलवादी, दुर्गमता यापाठोपाठ विषय निघतो तो गोटूलचा. गोंड, माडिया आदिवासींची संस्कृती म्हणजे ‘गोटूल’ आणि गोटूल म्हणजे मुक्त लैंगिक संबंध एवढाच अर्थ त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असतो. छत्तीसगडमधील एका परदेशी लेखकाने गोटूलचा उल्लेख सेक्स सेंटर असा केल्याने आदिवासींमध्ये मोठी संतापाचा लाट उसळली होती. आदिवासींसाठी ‘गोटूल’ हे फक्त भौतिक स्ट्रक्चर नाही, तर ती संस्कृती आहे. नाचगाण्यापलीकडे सामुदायिक जीवनपद्धतीचा, सामूहिक निर्णय प्रक्रियेचा एक प्रगत नमुना आहे. मध्य भारतातील गोंड, माडिया, मुरिया या आदिवासी गावांमध्ये गोटूल आहेत. गावाच्या मध्यभागी हे असते. पण गोटूल म्हणजे फक्त गावचे सभागृह नाही, तर सामुदायिक जगण्याचे, सामूहिक निर्णय प्रक्रियेचे आणि लोकसहभागाचे अत्यंत रचनाबद्ध अशी यंत्रणा आहे. वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या एका आदिम संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. गावातील लोक तिथे जमतात, चर्चा करतात, निर्णय घेतात, न्यायनिवाडे करतात, उत्सव साजरे करतात. आदिवासी समाजातील  गोटूल ही अत्यंत पवित्र, वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रगत व्यवस्था आहे.  ‘गोटूल’ हा शब्द माडिया भाषेतील ‘गोटिंग’ या शब्दावरून तयार झाला. गोटिंग म्हणजे चर्चा करणे. चार लोक जमले की चर्चा तर होतेच. पण ती चर्चा आणि गोटूलमध्ये होणारी चर्चा यात एक महत्त्वाचा गुणात्मक फरक असतो. गोटूलमधील चर्चेतून घेण्यात आलेले निर्णय सामूहिक असतात, ते सगळ्यांना मान्य असतात आणि सगळे जण ते पाळतात. गोटूलमध्ये झालेल्या निर्णयांना आदिवासींमध्ये एक अधिमान्यता असते. त्यात लोकांचा सहभाग आणि खुलेपणा, पारदर्शीपणा असतो. गोटूलमध्ये जे ठरते ते गावातील सर्वांना माहीत असते आणि मान्य असते. तो निर्णय सर्वांवर बंधनकारक असतात. सण-उत्सव साजरे करण्याचे, प्रथापरंपरा पाळण्याचे, पेरण्या-लावण्या ठरवण्याचे निर्णय गोटूलमध्ये घेतले जातात. गायता म्हणजे गावचा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली हे निर्णय घेतले जातात. त्यात पेरमा म्हणजे धार्मिक प्रमुख त्यासाठी मार्गदर्शन करतो. गोटूलमध्ये जमण्याचा हाकारा गावातील कोतला देतो. त्याला ‘जमावा’ म्हणतात. कधीकधी सगळे रानात गेले असताना तातडीने काही निर्णय घेण्याची वेळ येते. अशा वेळी कोतला गोटूलमधील ढोल बडवून ‘जमावा’ देतो. माडिया भाषेत त्याला डोल पायतीतोर म्हणतात. उत्सवातल्या ढोलाचा ताल वेगळा असतो जमावाचा वेगळा असतो.  मध्यभारतातील गडचिरोली, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील माडिया, मुरिया, गोंड गावांमध्ये गोटूल आहेत. वर्तुळाकार रचनेचे गोटूल उघड्या सभागृहासारखे असते. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात दोन खोल्यांची गोटूल आहेत. पुढील उघडी खोली बैठकांसाठी वापरली जाते, तर मागील बंद खोलीत गावकीची वाद्ये, भांडी ठेवली जातात. गावात मुक्कामी असलेले पेरमा, सरकारी कर्मचारी, गावाचे पाहुणे तिथेच राहतात.  गोटूल ही आदिवासी समाज संस्कृतीतील बहुआयामी व्यवस्था आहे. गावाच्या विकासाचे, जत्रा-उत्सवांच्या विधींचे निर्णय तिथे घेतले जातात. गावाचे प्रश्न तिथे मांडले जातात. ते सोडवण्याचे मार्ग शोधले जातात. या अर्थाने गोटूल ही ग्रामसभा आहे, सामाजिक-सांस्कृतिक केंद्र आहे, शिक्षण-प्रशिक्षणाचे साधन आहे, सामूहिक संवादाचे माध्यम आहे, गावच्या पाहुण्यांसाठी गेस्ट हाऊस आहे, गावातील प्रश्न सोडवण्याचे कोर्टही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांच्या  सहभागातून गावाच्या सामूहिक निर्णय प्रक्रियेचे ते स्थान आहे. लोकशाहीचे केंद्र आहे. पंचायत राज व्यवस्थेने आणि पेसासारख्या आदिवासींसाठीच्या विशेष कायद्यानंतर गावपातळीवरील कारभाराला घटनात्मक मान्यता मिळाली आणि गोटूलचे स्थान अधिक बळकट झाले. सध्या गावातील सर्व बैठका, ग्रामसभा आम्ही गोटूलमध्येच घेतो. पंचायत पातळीवर गोटूल इलाखा समिती असते. आमच्या भामरागड पारंपरिक इलाखा गोटूल समितीत १०८ गावे आहेत. याची मीटिंग तालुक्यातील समाजाच्या जागेत भरवली जाते. इलाखा समित्यांसाठी चार दिशांचे चार कोतले आहेत. इलाका समितीत घेतले गेलेले निर्णय कोलते गावांपर्यंत पोहोचवतात आणि गोटूलमध्ये गावाने घेतलेले निर्णय, आलेले प्रश्न इलाका समित्यांपर्यंत आणतात. या अर्थाने गोटूल हे इलाका समित्या आणि गावे यांच्यातील संवादाचा दुवा आहेत. तिथे गोटूल हे कम्युनिटी कम्युनिकेशन सेंटर म्हणून काम करते.  हे झाले गोटूलचे सगळे चांगले गुण. गोटूलचा एक अवगुणही आहे – तो म्हणजे यात स्त्रियांना स्थान नाही. खरं तर मूळ आदिवासी संस्कृती ही मातृसत्ताक आहे. विवाहानंतर मुलीने सासरी नाही, तर मुलाने मुलीच्या घरी जाऊन राहण्याची परंपरा आजही अनेक गावांमध्ये पाळली जाते. कमारमुत्ते, जंगो या स्त्रीरूपातील माडियांच्या देवता आहेत. कदाचित नागरी समाजाच्या प्रभावामुळे आलेल्या काही अवगुणांपैकी हा असावा. गोटूलच्या निर्णय प्रक्रियेचे प्रमुख असलेले पेरमा, गायता हे पुरुषच आहेत. गोटूलमधील बैठकांमध्ये गावातील पुरुषच येतात. हे चित्र बदलण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या प्रतिनिधित्वामुळे ते शक्यही होत आहे.  गोंड, माडियांसारख्या आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्याची भाषा सरकार करते. परंतु त्यासाठी त्यांनी आणि बिगर आदिवासी नागरी समाजाने आदिवासींमधील ही गोटूल व्यवस्था समजून घेणे गरजेचे आहे. ते समजून न घेता विकासाच्या नागरी संकल्पना आदिवासींवर थोपवण्याचा प्रयत्न केला तर काहीच साध्य होत नाही हे आपण सगळ्यांनी अनुभवले आहे. आदिवासींच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च होतो. परंतु, त्यातून गोटूल सारखी सांस्कृतिक केंद्र उभी राहावीत, गोटूलमध्ये तरुणांसाठी शिक्षण-प्रशिक्षण केंद्रे सुरू व्हावीत या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे. ते लक्षात न घेता समाजमंदिरांसारख्या नागरी योजना आदिवासींवर लादल्या जातात. समाज मंदिरांच्या बांधकामांसाठी सरकार साडेसहा लाख रुपयांचा निधी देते. अनेक ठिकाणी गोटूल पाडून त्या जागेवर समाज मंदिर बांधली जातात. मुळात ‘मंदिर’ या शब्दालाच आमचा आक्षेप आहे. तेच काम करणारी ‘गोटूल’सारखी व्यवस्था अस्तित्वात असताना, सरकारने गोटूल बांधणीसाठी निधी देण्याची, असलेल्या योजनेच्या किमान नावात बदल करण्याची, त्याच्या रचनेत स्थानिक पातळीवर बदल करण्याची मुभा देण्याची गरज आहे. गाव प्रमुख या नात्याने गोटूलच्या माध्यमातून गायता कारभार करणारा असते. सरकारने गायत्यांनाच पोलिस पाटील केले. नावात पोलिस आल्यावर ते नक्षलींचे लक्ष्य ठरले. त्यांना मानधन सुरू केले. पोलिसांची कामे त्यांच्या मागे लावली. पोलिसांचे खबरे म्हणून आतापर्यंत अनेक गायत्यांना नक्षलींनी ठार केले. त्याऐवजी गोटूलच्या पारंपरिक रचनेतील ‘गायते’ पदाच्या माध्यमातून सरकार गावाच्या विकासासाठी त्यांचा सहभाग करवून घेऊ शकले असते आणि त्यांचे जीवही वाचले असते.  गोटूल व्यवस्थेचे एवढे चांगले उपयोग असताना पोलिस यंत्रणा गोटूल यंत्रणा संपवण्याच्याच मागे लागली आहे. लाहेरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गोटूल बंद पडून तिथे फक्त मातीचं खिंडार उरलंय. गोटूलमध्ये आदिवासी जमतात ते रात्री. ढोल वाजवतात ते रात्री. पोलिसांनी जमाव बंदीचे आदेश काढले आणि हे सारं बंद झालं. आम्ही ते पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करतोय, पण गोटूल पुन्हा उभं करणं म्हणजे फक्त एक बांधकाम करणं नाही, लोकांना तोच विश्वास आणि तोच मोकळेपणा मिळावा, खुल्या संवादाची, विचारविनिमय करण्याचे जुने वातावरण पूर्ववत होणे खूप कठीण आहे. स्थानिक विकास निधीतून गोटूल बांधण्याची, पारंपरिक वाद्यं घेण्याची तजवीज असावी, असा प्रस्ताव गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदस्य म्हणून  मी अनेकदा मांडला. ग्रामस्वराज्य आणि गावाचा विकास खऱ्या अर्थाने साकार करायचे असेल तर गोटूल यंत्रणा, तेथील पारंपरिक रचना, सामुदायिक निर्णय प्रक्रिया, लोकसहभागाचा कारभार समजून घेणे गरजेचे आहे. गावागावातील गोटूलवर झेंडा फडकेल आणि ही गोटूल हीच गावाच्या कारभाराची, विकासाची, शिक्षणाची, संस्कृती संवर्धनाची आणि सक्षमीकरणाची साधने बनतील तेव्हाच आदिवासींच्या विकासाची गती वेग घेईल. अन्यथा पुण्यामुंबईसारख्या शहरांजवळ असूनही संस्कृती उद्ध्वस्त झालेल्या, उपजीविकेची साधनं गमावलेल्या कातकरी समाजासारखे आदिवासी हे फक्त मजूर बनून राहतील, माणूस नाही. शब्दांकन : दीप्ती राऊत  लेखकाचा संपर्क : ९४०५१३०५३०

बातम्या आणखी आहेत...