आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आंदोलनाच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍य सरकारी कर्मचा-यांचा संप तिस-या दिवशी मागे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज दुपारपासून मागे घेत असल्याचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या समन्वय समितीने आज मंत्रालयात जाहीर केले. सातवा वेतन आयोगाच्‍या अंमलबजावणीसह इतर मागण्‍यांसाठी राज्‍य सरकारी कर्मचा-यांनी मागील दोन दिवसांपासून संप पुकारला होता. राज्‍यभरात सुरू असलेल्‍या मराठा आंदोलनाच्‍या पार्श्‍वभूमीवर आंदोलन मागे घेण्‍यात यावे असे आवाहन राज्‍य सरकारने शासकीय कर्मचारी संघटनांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सरकारी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्‍याचा निर्णय घेतला आहे.

 

याबाबत अधिक माहिती देताना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर यांनी सांगितले की, दुपारी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्यासमवेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी शासन सकारात्मक असून लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही  केली जाईल, असे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले. तसेच मराठा आरक्षणासाठी असलेला बंद आणि रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून संप मागे घेत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

यावेळी  सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौण्ड, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी, शिक्षक समिती, शिक्षक भारती, टीडीएफ, महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र कोतवाल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

राज्‍य सरकारी कर्मचारी समन्‍वय संघटनांनी हा संप पुकारला होता. यामध्‍ये राज्‍यातील एकूण 17 लाख कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्‍ये शासकीय, निमशासकीय कर्मचारी, जिल्‍हा परिषद, नगरपालिका कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होती.

 

या  आहेत मागण्‍या
- सातवा वेतन आयोग तात्‍काळ लागू करावा.
- पाच दिवसांचा आठवडा करण्‍यात यावा.
- जुन्‍या निवृत्‍तीवेतन योजनेचे पुनरूज्‍जीवन करण्‍यात यावे.   

 

बातम्या आणखी आहेत...