Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | government gives order to school administration to give healthy food for students

विद्यार्थ्यांना बर्गर-पिझ्झा कमी; फळे, भाज्या व दूध नियमित देण्याचे आदेश

विशेष प्रतिनिधी | Update - Jun 01, 2019, 11:31 AM IST

स्थूलतेमुळे निर्णय, राज्यातील २ हजार शाळांना अन्न व औषध प्रशासनाचे पत्र

 • government gives order to school administration to give healthy food for students

  नाशिक - लहान मुलांमधील वाढता स्थूलपणा, मधुमेह या विकारांना कारणीभूत जंक फूडऐवजी शाळा आणि महाविद्यालयांच्या कँटीनमधून दूध, फळे, भाज्या, कडधान्य यांसारखे पोषक अन्नघटक असलेले पदार्थ देण्यात यावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शिका जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील २ हजार शाळांना ही पाठवण्यात आली असून त्याच्या अंमलबजावणीसाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये आरोग्य समित्या नियुक्त करण्यात येण्याच्या सूचना या विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पुढील ६ महिन्यांचे वेळापत्रक देण्यात आले असून, त्यानुसार येत्या जुलैअखेरपर्यंत समित्या स्थापन करण्याची मुदत देण्यात आली आहे.


  शाळा आणि महाविद्यालयांच्या कँटीनमधील जंक फूडमधील अतिरिक्त मेद, मीठ आणि साखर मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे पुढे आले आहे. तरीही अनेक शाळा-महाविद्यालयांच्या कँटीनमध्ये जंक फूड ठेवण्यात येते. याच्या अतिसेवनामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह यांसारखे आजार बळावत असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेतून मांडण्यात आले. या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने सर्व राज्य शासनांना विद्यार्थी कँटीनसाठी पोषक आहार मार्गदर्शिका तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ही मार्गदर्शिका जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील २ हजार शाळांच्या मुख्याध्यापकांना ही मार्गदर्शिका पाठवण्यात आली असून, याचे नियमन करण्यासाठी येत्या जुलै महिनाअखेरीपर्यंत आरोग्य समित्या नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


  या आरोग्य समित्यांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक/कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक-पालक-विद्यार्थी प्रतिनिधी, न्यूट्रिशनिस्ट आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांचा समावेश असावा, त्यांनी विभागाच्या मार्गदर्शिकेनुसार कँटीनचा मेनू निश्चित करावयाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचना राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी शाळांना लागू असणार आहेत, असेही यात सांगण्यात आले आहे.


  पालक, शिक्षक व आहार तज्ज्ञांनी पुढाकार घ्यावा
  आपल्या मुलांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी जंक फूडचा वापर कमी होऊन त्यांचा आहार पोषक असणे हे गरजेचे आहे. त्या उद्देशाने हे पाऊल उचलले असून यास चांगला प्रतिसाद मिळेल, याची खात्री आहे. शिवाय पालक व आहारतज्ज्ञांनाही स्वत:हून आपल्या पाल्यांच्या व परिचयातील शाळांतील या आरोग्य समित्यांसाठी पुढे येणे व या मार्गदर्शिकेचा प्रभावी अंमल घडवून आणण्यात मदत करण्याचे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी केले आहे.

  या आहेत मार्गदर्शिका
  > कमी खा -
  बर्गर, पिझ्झा, चॉकलेट, आइस्क्रीम, फ्राइज
  > साधारण खा- खाद्यतेल, मांस, मासे, अंडी
  > जास्त खा- फळे, भाज्या
  > नियमित खा - कडधान्ये, तृणधान्ये, दूध

  असे आहे वेळापत्रक
  > जून-जुलै-
  आरोग्य समितीची नियुक्ती करणे
  > ऑगस्ट- सप्टेंबर- कँटीनसाठी पौषिक पदार्थांचा मेनू तयार करणे
  > ऑक्टोबर - नोव्हेंबर- विद्यार्थी पालकांसाठी पोषण कार्यशाळा
  > डिसेंबर - प्रशासनातर्फे आढावा

Trending