आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यातील पशुधन 'निराधार', ना आैषध, ना डॉक्टर, होरपळ डॉक्टरांची पदे रिक्त, जनावरांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत दवाखान्यांची संख्या अपुरी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर. दुग्ध व्यवसाय हा शेतीला चांगला जोड व्यवसाय. पण, यंदाच्यावर्षी दुष्काळामुळे जनावरांच्या चारा-पाण्याची मोठी समस्या आहे. तर, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनावरांना संसर्गजन्य रोग होत असून, इतर आैषधे अद्याप आली नाहीत. उपलब्ध आैषधे दवाखान्यांपर्यंत गेली नाहीत. उपचारांसाठी डॉक्टरांची पदे रिक्त, जनावरांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत दवाखान्यांची संख्या अपुरी. एकीकडे नैसर्गिक संकट अन् दुसरीकडे प्रशासनाच्या संथगतीच्या कारभाराची समस्या, यामुळे दररोज सुमारे दहा लाख पेक्षा जास्त लिटर दुधाचे संकलन होणाऱ्या जिल्ह्यातील पशुधनाची ना काळजी ना चिंता असे चित्र आहे. 

 

दीड कोटीची आैषध खरेदी अडकली 
पशुसंवर्धनासाठी लागणाऱ्या आैषध खरेदीसाठी शासनाकडून दर निश्चिती करण्यात येते. यंदाच्यावर्षीचा दर करार अद्याप निश्चित झाला नाही. जिल्हा नियोजन समितीतून ७० लाख व झेडपीच्या सेस फंडातून विविध योजनांतर्गत ८० लाखांची तरतूूद आहे. सुमारे दीड कोटींच्या आैषधांच्या मागणीची फाईल दरकरार प्रक्रियेत अडकलीय. 

 

आपल्या प्रतिक्रिया : तुमची पसंती नावासह ९२०००१२३४५ या क्रमांकावर एसएमएस करा. 
संसर्गजन्य आजाराचा फैलाव, आैषधे नाहीत, उपलब्ध आैषधे दवाखान्यांपर्यंत गेली नाहीत 

 

जनावरांच्या आरोग्यापेक्षा प्रदर्शनाकडे 'लक्ष' 
पशुसंवर्धन विभागातर्फे गेल्या दोन वर्षांपासून लाळ-खुरकतीच्या आैषधांची खरेदी वेळेवर झाली नाही. थंडीमध्ये मोठ्या जनावरांना 'त्या' संसर्गजन्य रोगाची लागण होण्याचा मोठा धोका असतो. दिवाळीपूर्वीच खरेदीची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे असते. गेल्यावर्षी 'दरकरार'च्या मुद्यावरून आैषधांची खरेदी रखडली. यंदाच्यावर्षी तोच घोळ सुरूय. दरम्यान, पशुसंवर्धन मंत्रालयाने जालना येथे देशपातळीवरील पशुप्रदर्शन घेतले. त्याच्या नियोजनात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह संपूर्ण विभाग व्यस्त होता. 

 

डॉक्टरांची पदे रिक्त 
जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांची ५० पदे रिक्त आहेत. सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त आहेत. रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रशासनातर्फे सोईस्कर पत्रव्यवहाराचा सोपस्कार होतो. गेल्यावर्षी पशुसंवर्धन मंत्र्यांच्या समोर जिल्ह्यातील पशुसंवर्धनच्या रिक्त पदांसह, सोयी-सुविधांच्या अडचणी मांडण्याच्या उद्देशाने त्यांच्याच हस्ते उत्कृष्ट गोपालक पुरस्कारांचे वितरण करण्याची तयारी केली. मंत्री जानकरांनी तारीख न दिल्याने तब्बल सहा महिन्यानंतर स्थानिक पातळीवर पुरस्कारांचे वितरण झाले. 

 

अल्पशिक्षित पशुवैद्यकाची बाधा 
डेअरी उद्योगात काम करणाऱ्या अकुशल कामगारांचे कौशल्य वाढवण्यासाठी अभ्यासक्रम आहे. पण तो पूर्ण केलेल्या काहींनी थेट जनावरांचे डॉक्टर असल्याच्या थाटात डॉक्टरीपेशा सुरू केला आहे. प्रशिक्षण न घेताच स्वयंघोषित वैद्यकांनी जनावरांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. शहर व जिल्ह्यात अशा प्रकारच्या वैद्यकांची संख्या ३०० पेक्षा अधिक असूनही त्याकडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करतात. काहींना डॉक्टरांबरोबर राहिल्याने व्हॅक्सिनेशन किंवा जनावरांच्या आजारपणांबाबतही अल्पशी माहिती मिळते. या मिळालेल्या जुजबी माहितीच्या जोरावर ते थेट 'स्वघोषित डॉक्टर' बनले. 

 

कामात कसूर, जुजबी कारवाई 
अकोलेकाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील शाहू लामकाने यांनी देशी गाईला (खिलार) देशी खोंडाचे कृत्रिम रेतनाची मागणी केलेली. पण, पशुवैद्यकाने त्याकडून नियमानुसार ४१ रुपयांऐवजी २०० रुपये घेऊन संकरित वळूचे इंजेक्शन दिले. देशी कालवडीला संकरित वासरू जन्मल्यानंतर तो प्रकार उघडकीस आला. त्याप्रकरणी पशुपालकाने पशुसंवर्धन उपसंचालकांपासून सर्वांकडे तक्रार केली. झेडपीच्या सभापतांनी दोषींवर कारवाई करून पशुपालकास नुकसान भरपाईचे आदेश दिले. संबंधितांवर जुजबी कारवाई करून पुन्हा सोईस्कर ठिकाणी नियुक्ती केली. पण, अद्याप पशुपालकास नुकसान भरपाई दिली नाही. पशुसंवर्धन विभागाच्या हलर्जीपणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी पाठराखण केली. 

 

तीन महिन्यांमध्ये अज्ञात रोगाने ५० जनावरांचा मृत्यू 
२०३ एकूण दवाखाने 
१२० श्रेणी एक 
८३ श्रेणी दोन 

१९८ दवाखान्यांना स्वतंत्र इमारत आहे. पण, २५ इमारतींमधील किरकोळ कामे पूर्ण न झाल्याने त्या वापरात नाहीत. 


जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांमध्ये अज्ञात रोगाने ५० पेक्षा अधिक जनावरांच्या मृत्यूची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे आहे. काळमवाडी (ता. माळशिरस) येथे २२ गायी, पाच शेळ्या, तीन म्हशींचा मृत्यू झाला. मंगळवेढ्यात ११ गायी, एक म्हैस, कोळेगाव (माळशिरस) दोन गायी, भंडीशेगाव (ता. पंढरपूर) सहा गायींचा मृत्यू. 

 

पाच ठिकाणी स्वतंत्र इमारत नाही 
शिरवळ (अक्कलकोट) ग्रामपंचायतीच्या जागेत भरतो दवाखाना 
शिंगडगाव (दक्षिण सोलापूर) ग्रामपंचायत जागेत 
कोरफळी (बार्शी) ग्रामपंचायत खोलीत 
तांबोळे (मोहोळ) वनविभागाच्या जागेत दवाखाना 
वाघोली (मोहोळ) ग्रामपंचायत जागेत दवाखाना 

 

पशुसंवर्धनचे सेवाशुल्क 
पशुसंवर्धन विभागाने वेळेवर आैषधांची खरेदी न करणे, जनावरांच्या चारा खरेदीवर बेसुमार पैैशांची उधळपट्टी केल्याच्या तक्रारी सदस्यांनी सर्वसाधारण सभेत व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलेली. त्यानंतर सुधारणा झाली नसल्याचे चित्र आहे. मार्च एंडच्या तोंडावर आैषधांची खरेदी करून ती वर्षभर पुरविण्याचा खटाटोप असतो. पण, प्रत्यक्षात काही महिन्यांमध्येच आैषध संपतात. त्यामुळे पशुपालकांना खासगी दुकानांमधून आैषधे आणावी लागतात. 

 

२० वी पशुगणना संथगतीने सुरू 
सप्टेंबरपासून जनावरांची २०वी पशुगणना सुरू आहे. प्रगणकांना मोबाइल टॅब दिले असून पशुपालकांच्या घरोघरी जाऊन गणना ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात ५० टक्केही गणना व्यवस्थित पूर्ण झालेली नाही. संथगतीने काम सुरू आहे. आधी मोबाइल टॅब खरेदीच्या दरकरारमुळे गणनेस विलंब झाला. त्यानंतर टॅब दिले. पण, त्यामध्ये इंटरनेट कनेक्शनचे सीमकार्ड देण्यात न आल्याने दोन महिने गणना रखडली होती. 


पशुसंवर्धनच्या रिक्त पदांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना सोबत घेऊन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची भेट घेतली. पण, अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. सेस फंडातून आैषधांसाठी वाढीव तरतूद केली. दरकरार निश्चितीपर्यंत आैषध उपलब्ध आहेत." मल्लिकार्जुन पाटील, सभापती, जिल्हा परिषद 

 

शासनाकडून दर करार निश्चितीनंतर आैषधांची मागणी होईल. जिल्ह्यात आैषधांचा साठा पुरेसा आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वैरण बियाणे वाटपाचे नियोजन आहे. अतिरिक्त पोषण आहार देण्यात येईल.'' चंद्रशेखर दैवज्ञ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद 


मार्चएण्डच्या तोंडावर आैषधांची खरेदी करणे चुकीचे आहे. खरेदीनंतर सगळ्या आैषधांचा एकदम वापर होणार का? मंगळवेढा तालुक्यात लाळ-खुरकतमुळे ५०-६० जनावरे मेली. दवाखान्यात डॉक्टर व आैषध नसल्याने होणाऱ्या त्रासाची जाणीव यंत्रणेला कधी होणार?"' नितीन नकाते, जिल्हा परिषद सदस्य 

 

जनावरांसाठी अॅम्ब्युलन्स, मोबाइल उपचार केंद्राची गरज 
जिल्हा नियोजन समितीत नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जनावरांवर उपचारांसाठी दोन स्वतंत्र फिरते उपचार केंद्र व अॅम्ब्युलन्सची गरज आहे. दुर्धर शस्त्रक्रिया, अपघात किंवा मोठ्या आजाराने बाधित जनावरांना सोलापुरातील जिल्हा पशुचिकित्सालयात आणण्यासाठी स्वतंत्र अॅम्ब्युलन्सची गरज आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधी, सदस्यांनी ठोस कृती धोरण राबविण्याची आवश्यकता आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...