आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकार महाविकास आघाडीचे; शपथविधी साेहळ्यात छाप सेनेची, एकत्रित झळकले तिन्ही झेंडे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी साेहळ्यास गुरुवारी मुंबईच्या एेतिहासिक शिवाजी पार्कवर माेठी गर्दी झाली हाेती. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकर्त्यांची एकत्रित गर्दी या मैदानाने प्रथमच अनुभवली - Divya Marathi
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी साेहळ्यास गुरुवारी मुंबईच्या एेतिहासिक शिवाजी पार्कवर माेठी गर्दी झाली हाेती. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकर्त्यांची एकत्रित गर्दी या मैदानाने प्रथमच अनुभवली

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, अाणि या क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या शिवाजी पार्कचे शिवसेनेशी नाते अधिक घट्ट झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन पूर्ण झाले, हा क्षण बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला साक्षी मानून पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक नागरिकांनी गर्दी केली हाेती. या वेळी जय भवानी, जय शिवराय या घोषणांची व भगव्या झेंड्यांची सवय असणाऱ्या शिवाजी पार्कवर प्रथमच शिवसेना, राष्ट्रवादी अन‌् काँग्रेसचे झेंडे झळकले. तसेच जय भवानी, जय शिवराय, जय राष्ट्रवादी, काँग्रेस जिंदाबादच्या घोषणाही अनुभवल्या. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने असले तरी या संपूर्ण कार्यक्रमावर अखेरपर्यंत शिवसेनेचीच छाप दिसून अाली.

शपथविधी साेहळ्यास उद्याेजक मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, अजित पवार, राज ठाकरे , सुप्रिया सुळे, अमित देशमुख, रोहित पवार यांच्यासह स्टॅलिन यांची उपस्थिती लक्ष वेधून गेली. नितीन चंद्रकांत देसाई यांनी अवघ्या २४ तासांत उभ्या केलेल्या व्यासपीठामुळे सोहळा आकर्षक बनला होता. राज्याच्या कानाकाेपऱ्यातून तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते व ठाकरेंवर प्रेम करणारे लाेक कार्यक्रमास उपस्थित हाेते. मैदानात २० एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.

नंदेश उमपच्या महाराष्ट्र गीताने वातावरण भारावले
 
शपथविधीच्या सुरुवातीलच लाेकगायक नंदेेश उमप आणि संचाच्या महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणाने वातावरण भारावले. पोवाड्यालाही उपस्थितांची साथ मिळत होती. अधूनमधून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय महाराष्ट्रच्या घोषणा सुरू होत्या. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हाेता, प्रत्येक मंत्री शिवरायांचे दर्शन घेऊन मगच शपथ घेण्यासाठी जात हाेता.

पाेवाडे, जयघाेष...
 
पोवाडे, घोषणाबाजी, शिवरायांचा जयघोष हे शिवसेनेला नवीन नाही. मात्र, शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी एका व्यासपीठावर आलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांसाठी हा प्रसंग नवीन होता. आपल्या नेत्याच्या शपथविधीमुळे शिवसेना नेते सुखावलेले असताना राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेत्यांचे चेहरे मात्र फार खुलल्याचे दिसले नाही.
 

बातम्या आणखी आहेत...