आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीत केवळ हवाच नव्हे तर पाणीही प्रदूषित झाले आहे. देशातील महानगरांतील सर्वाधिक प्रदूषित पेयजल दिल्लीत आढळून आले आहे. मुंबईतील पिण्याचे पाणी पेयजलाच्या गुणवत्तेच्या १९ मानकांवर उतरले आहे. मुंबईतील १० नमुन्यांतील पाणी शुद्ध असल्याचे परीक्षणात दिसून आले. दिल्लीच्या सर्वच्या सर्व ११ नमुन्यांत प्रदूषके आढळून आली. त्यामुळे ते सर्वात खराब असल्याचे स्पष्ट झाले. केंद्र सरकारने ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड॰सकडे (बीआयएस) देशातील २१ प्रमुख शहरांतील पेयजलाचे नमुने संकलित करून त्यानुसार त्याची श्रेणी ठरवण्याची जबाबदारी सोपवली होती. केंद्रीय ग्राहक, खाद्य तथा सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी पेयजलाची गुणवत्तेच्या आधारे विविध शहरांचा समावेश असलेली यादी जाहीर केली. यादीत अव्वल पाच शहरांत अनुक्रमे मुंबई, हैदराबाद, भुवनेश्वर, रांची, रायपूरचा समावेश आहे. कोलकाता व दिल्ली शेवटी आहे.
तीन टप्प्यांत प्रत्येक शहर, जिल्ह्यात परीक्षण होणार
पासवान म्हणाले, भविष्यात पेयजलाचे तीन टप्प्यांत परीक्षण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व राज्यांच्या राजधानीतील पाण्याचे परीक्षण होईल. दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटीच्या पाण्याचे परीक्षण होईल. तिसरा टप्प्यात देशातील सर्व जिल्ह्यांतील पाण्याची चाचणी होईल. याबाबत अध्ययन केले जाईल. यासंबंधीची सर्व माहिती पुढील वर्षापर्यंत मिळेल. २०२४ पर्यंत प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोहोचवले जाईल, असे आश्वासन मोदींनी दिले होते. आमचे सरकार त्या दिशेने कार्यरत आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत बीआयएसने केला अभ्यास
पासवान म्हणाले, देशात अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या आजाराचा फटका मोठ्या प्रमाणात मुलांना बसत असल्याचे दिसून आले. पाण्याच्या गुणवत्तेला निश्चित मानक लागू करणे गरजेचे आहे. या मुद्द्यावर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांना पाण्याचे परीक्षण करण्याचे आदेश दिले. बीआयएसने ही पाहणी ग्राहक मंत्रालयाच्या सूचनेनुसार केली. जल जीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घरात वाहिन्यांद्वारे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
पुद्दुचेरी देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा
जलशक्ती मंत्रालयाने पुद्दुचेरीला देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा घोषित केले आहे. ही माहिती शनिवारी पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी आणि बाजारपेठांतील स्वच्छतेचे परीक्षण केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. याबद्दल पुद्दुचेरी जिल्ह्याला पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार सोहळा शहरी व विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या उपस्थितीत १९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
हैदराबाद, रांची, चंदीगड, सिमल्यात स्वच्छ पाणी; यादी अशी
१. मुंबई २. हैदराबाद ३. भुवनेश्वर ४. रांची ५. रायपूर ६. अमरावती ७. सिमला, ८. चंदीगड
९. त्रिवेंद्रम १०. पाटणा ११. भोपाळ १२. गुवाहाटी १३. बंगळरू १४. गांधीनगर १५. लखनऊ १६. जम्मू, १७. जयपूर,१८. डेेहराडून, १९. चेन्नई, २०. कोलकाता, २१. दिल्ली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.