आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारने दूध दर दोन रुपयांनी घटवला; १ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, अनुदानही मिळाले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सहकारी व खासगी दूध संस्थांकडील पिशवीबंद दूध वगळून उर्वरित गायीच्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसतानाच शासकीय दूध योजने साठीच्या गाय, म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 


दुधाच्या खरेदीदरात गेल्या दोन वर्षात तीनदा वाढ करण्यात आली होती. सुरुवातीला दोनदा प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर जून २०१७ मध्ये आणखी तीन रुपयांची दरवाढ करण्यात आली. त्यामुळे गायीचे दूध प्रतिलिटर २७ रुपये आणि म्हशीचे दूध प्रतिलिटर ३६ रुपये या दराने खरेदी करणे अपेक्षित होते. मधल्या काळात अतिरिक्त दूध आणि भुकटीचे दर कोसळल्यामुळे दूध संघ १७ ते १८ रुपयांना शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करत होते. त्याविरोधात पावसाळी अधिवेशनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे शासनाने संघांना २५ रुपये दर देण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी शासनाने संघांना अनुदान जाहीर केले आहे. मात्र हे अनुदानच अजूनही मिळणे सुरू झालेले नाही. 


गायीचे दूध २५, म्हशीचे ३४ रुपये लिटर 
सरकारच्या निर्णयानुसार ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफच्या असलेल्या गायीच्या दुधासाठी २५ रुपये प्रतिलिटर तर ६ फॅट आणि ९ एसएनएफ असलेल्या म्हशीच्या दुधासाठी ३४ रुपये प्रतिलिटर दर देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, वितरकांना सरसकट ३ रुपये कमिशन मिळणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. 


निकष बदलल्याने दर कमी केले : मंत्री महादेव जानकर 
दुधात फॅट चांगले असले तरी 'एसएनएफ'मध्ये (साॅलीड नाॅट फॅट) अन्य आवश्यक घटक कमी असतात. त्यामुळे दुधाचा दर्जा घसरतो. यापूर्वी दुधाला फॅटनुसार दर मिळत होता, आता 'एसएनएफ'नुसार दर देण्याची अट आहे. त्यामुळे शासकीय योजनेसाठी दूध खरेदी दर कमी केले आहेत, असे दुग्धव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...