Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Government service jam due to strike of employees

२२ हजार कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सरकारी सेवा ठप्प

प्रतिनिधी | Update - Aug 08, 2018, 11:23 AM IST

संपामुळे राज्य सरकारच्या निगडित असलेल्या सर्व शासकीय कार्यालयांमधील सरकारी सेवा मंगळवारी दिवसभर ठप्प होती.

 • Government service jam due to strike of employees

  नगर- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी केलेल्या संपामुळे राज्य सरकारच्या निगडित असलेल्या सर्व शासकीय कार्यालयांमधील सरकारी सेवा मंगळवारी दिवसभर ठप्प होती. या संपात जिल्ह्यातील विविध विभागांतील २२ हजार कर्मचारी सहभागी झाले होते. या संपामुळे शहरातील प्रमुख सरकारी कार्यालयांत शुकशुकाट होता. विविध संघटनांच्या वतीने संपाला पाठिंबा देण्यासाठी निदर्शनेही करण्यात आली.दरम्यान, हा संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा विविध संघटनांनी केला आहे.


  सरकारने सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, थकीत महागाई भत्ता मिळावा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, पाच दिवसांचा आठवडा जाहीर करावा, खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करावे व रिक्त पदे तातडीने भरावीत, यासह अन्य मागण्यांसाठी राज्य शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून तीन दिवस संप पुकारला आहे. या संपात महसूल, जिल्हा परिषद कर्मचारी, पाटबंधारे विभागाचे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी, कोषागार विभाग, भूमी अभिलेख यासह विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचारी सहभागी झाले. या संपात जिल्ह्यातील २२ हजार कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदवला. संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटना समन्वय समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद ठेवून धरणे आंदोलन केले. आंदोलनात सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष बी. बी. सिनारे, कार्याध्यक्ष सुभाष तळेकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, पी. डी. कोळपकर, महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेंद्र राऊत सहभागी झाले होते. या संपाला निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. धरणे आंदोलनात शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, राजेंद्र कोतकर, प्रा. माणिक विधाते, राजेंद्र लांडे, भाऊसाहेब कचरे, प्रा. सुनील पंडित, डॉ. मुकुंद शिंदे, देविदास पाडेकर, बाळासाहेब वैद्य, एम. एल. भारदे, संदीपान कासार, दिनकरराव घोडके, विजय काकडे, अरुण शिंदे, सुधाकर साखरे, श्रीकांत शिर्शिकर, पुरुषोत्तम आडेप, रवी डिक्रूज, कैलास साळुंके आदी या वेळी उपस्थित होते. या संपात राजपत्रित अधिकारी संघटना, तलाठी संघटना, ग्रामसेवक संघटना, शिक्षक शिक्षकेतर संघटना, कृषी सहायक संघटना, महसूल कर्मचारी संघटना, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे व इतर संघटना उतरल्या आहेत. यावेळी तीन दिवसीय संप यशस्वी करण्याची हाक देण्यात आली. सरकारचा वेळकाढूपणा व कामगारविरोधी धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. या तीनदिवसीय संपाची दखल शासनाने न घेतल्यास ऑक्टोबर महिन्यात बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला. जिल्हा परिषदेतील कर्मचारी ही मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाले होते. संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. या आंदोलनात राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष सुभाष कराळे, जिल्हाध्यक्ष विकास साळुंके, कार्याध्यक्ष भारत बोरुडे, सरचिटणीस किशोर शिंगे, खजिनदार भारती सांगळे यात सहभागी झाले होते.


  जिल्ह्यातून आलेल्या लोकांचे हाल
  ग्रामीण भागातून विविध कामांसाठी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या लोकांचे हाल झाले. पैसे खर्च करून कामांसाठी लोक या कार्यालयांत आले, मात्र संप असल्यामुळे लोकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.


  संप योग्य, शंभर टक्के प्रतिसाद
  सरकारने अनेकदा आश्वासने देऊनदेखील आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करू. जिल्ह्यात या संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
  - राजेंद्र राऊत, कार्याध्यक्ष, महसूल कर्मचारी.


  सरकारी कार्यालये आेस, दालनांना टाळे
  विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे नेहमी गर्दी असलेल्या जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय हे आेस पडले होते. कर्मचारी नसल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांच्या दालनांना ठाळे लागले होते.

Trending