आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेभान झुंडशाहीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणलेली गदा सरकारने मोडीत काढावी, अखिल भारतीय साहित्य संमेलनात ठराव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी वाङ्मयात जातीयवाद वाढतोय, हा सबंध वाङ्मयाला पोखरणारा
  • वाङ्मयातील दहशतवादाविषयी कोण बोलणार ?, समारोपात प्राचार्य रा. रं. बोराडे यांचा सवाल

​​​​​​उस्मानाबाद : ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला. संमेलनात वीस ठराव टाळ्यांच्या कडकडाटात मंजूर करण्यात आले. यात समाजातील झुंडशाहीविरुद्ध आवाज उठवणारा ठराव सर्वात महत्त्वाचा होता. समाजातील झुंडशाहीचा वाढता उपद्रव निरनिराळ्या क्षेत्रात गंभीर समस्या निर्माण करत आहेत. झुंडशाहीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. ही प्रवृत्ती वरचेवर प्रबळ होत असून राज्य व केंद्र सरकारांनी या उपद्रवी प्रवृत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा, असा ठराव या वेळी मंजूर करण्यात आला.

जातीयवाद सबंध वाङ्मयाला पोखरणारा

दरम्यान, त्या दहशतवादाविषयी बोलायचे, मग वाङ्मयातील या दहशतवादाविषयी कोणी बोलायचे, असा परखड सवाल करून मराठी वाङ्मयात जातीयवाद वाढला असल्याची चिंता प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी समारोपावेळी व्यक्त केली.

मेरिटवाले नव्हे, कलावंत ही देशाची अोळख 

उस्मानाबाद : मराठी वाङ्मयात जातीयवाद वाढला आहे. हा जातीयवाद उद्या सबंध वाङ्मयाला पोखरणार आहे, अशी चिंता व्यक्त करून 'त्या' दहशतवादाविषयी बोलायचे, मग वाङ्मयातील या दहशतवादाविषयी कोणी बोलायचे, असा परखड सवाल प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी उपस्थित केला. उस्मानाबादेतील संत गोरोबाकाका साहित्यनगरीतील ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप प्राचार्य बोराडे यांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. आपण गांभीर्याने घ्यावा अशा प्रकारचा भयानक जातीयवाद वाङ्मयामध्ये आला आहे. हा माझ्या जातीतला लेखक आहे, याच्याविषयी बोलाल तर नीट बोला, अन्यथा गप्प बसा, असे धमकावले जाते. परंतु लेखक-कलावंतांना जात नसते. पारितोषिके आपल्याच जातीतल्या लेखकाला देऊन टाकायची म्हणजे लेखकही खुश होतात. हा जातीयवाद वाङ्मयाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, असा गंभीर इशारा प्राचार्य बोराडे यांनी दिला. आपल्या भाषणात बाेराडे यांनी गुणवत्तेच्या चढाओढीत बालवाङ्मयाकडे केले जाणारे दुर्लक्ष तसेच वाचनाची कमी होत चाललेली गोडी, समकालीन साहित्यात नवलेखकांची वाचनाप्रति उदासीनता यावरही कडक शब्दांत भाष्य केले.

देशाची ओळख मेरिटवाल्यांवर नव्हे, कलावंतावर


बालवाङ्मयाकडे कुणाचेही लक्ष नाही. शिक्षक-मुख्याध्यापकांना किंवा कुठल्याही पालकाला मुलगा मेरिटमध्ये यावा असे वाटते. मात्र कुणालाही आपला मुलगा लेखक, अभिनयकार, चित्रकार व्हावा, संशोधक व्हावा असे वाटत नाही. त्याने संशोधक, लेखक व्हावे असे का वाटत नाही? आपली संस्कृती कलावंतांनी उभी केली आहे. देशाची ओळख मेरिटवाल्यावर नाही, कलावंतांवर होते, अशा शब्दांत त्यांनी गुणवत्तेच्या मागे लागणाऱ्या पालकांवर केली.

उत्तम लेखक बनण्यासाठी उत्तम वाचक बना 

ग्रंथवाचनाचे प्रमाण कमी झाले आहे हेही मान्यच करावे लागेल. नवलेखक भेटायला आल्यानंतर त्याला सध्या तू काय वाचतोस, असा सवाल विचारतो. त्यावरून त्याचा दर्जा मला कळतो. मात्र एक नवोदित लेखकाला असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने आपल्या शेतात ऊस पिकत असल्यास दुसऱ्याच्या शेतातला कशाला खायचा, असा प्रश्न केला. ही शोकांतिका आहे, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून उत्तम लेखक व्हायचे असेल तर अाधी उत्तम वाचक बना, असा सल्ला प्राचार्य बाेराडे यांनी दिला. दरम्यान, तत्पूर्वी संमेलनासाठी सहकार्य करणाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, रवींद्र केसकर आदींची उपस्थिती होती.

लेखकांनी आपली भूमिका ठरवायला हवी

उस्मानाबादच्या संमेलनात जी नावे चर्चेत होती त्यात माझेही नावे होते. मात्र मी संमेलनाध्यक्ष होणार नाही, असे जाहीर करून चर्चेला पूर्णविराम दिला. काही निर्णय लेखकाने घ्यावे लागतील. २००२ मध्येच कुठल्याही साहित्याचा पुरस्कार स्वीकारायचा नाही, असे ठरवले होते. वयाची ७५ वर्षे झाली तेव्हा ठरवले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायचे नाही. एखाद्याने लग्न करायचे असले तर वयातच केले पाहिजे. खेड्यात त्याला घोडनवरा म्हणतात. आपण घोडनवरा व्हायचे नाही त्या मोहातून बाजूला झालो, असे प्राचार्य बोराडे यांनी स्पष्ट केले.

म्हणून केला अपारंपरिक अध्यक्ष

आतापर्यंत मराठी साहित्याने कानडी, इस्लामी, बौद्ध साहित्याला स्वीकारून मुख्य प्रवाहात आणले. आतापर्यंत मुख्य प्रवाहाशी संलग्न नसलेला भाग प्रवाहात आणण्यासाठी अपारंपरिक अध्यक्षाचा प्रयोग केल्याची माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना दिली.

मंजूर ठरावांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह रेल्वेमार्गांचाही विषय

संमेलनातील ठरावात शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दोन्ही सरकारची अनास्था, बारावीपर्यंत मराठी विषयाची सक्ती करावी, यासाठी राज्य सरकारने कायदा करावा, मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाण थांबवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, विधान परिषदेवर नियुक्ती करताना राजकीय लाेकांपेक्षा या विषयातील तज्ञांच्याच नियुक्त्या कराव्यात या ठरावांचा समावेश होता. याशिवाय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्नाटक सीमाभागात मराठीची जपणूक करणाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा विषय एका ठरावात मांडण्यात आला. मराठी साहित्य संमेलनांवर बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारचा या वेळी निषेध करण्यात आला. कर्नाटक, तेलंगणा-आंध्र सीमेवरील गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बृहन्महाराष्ट्र मराठी भाषा विभाग उघडावा, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली होती. या वाड्याचे स्मारकात रुपांतर करावे, महाराष्ट्र परिचय केंद्रांचे पुनरुज्जीवन करावे आणि नसलेल्या सर्व राज्यांतील महत्वाच्या ठिकाणी नव्याने महाराष्ट्र परिचय केंद्रे स्थापन करावीत, महाराष्ट्रातील साठहून अधिक बोलीभाषांचे संवर्धन करण्यासाठी तज्ञांची समिती नेमावी, मराठवाड्याला हक्काचे २३ टीएमसी पाणी देण्यात यावे, उस्मानाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मनाबादेतील उपकेंद्राचे रुपांतर स्वतंत्र विद्यापीठात करावे, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरू करावे, अशा मागण्यांचे ठराव संमेलनात सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले.

बायबल मराठी संतपरंपरेशी निगडित

संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांना प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे समारोप कार्यक्रमास ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचे समारोपीय भाषण याप्रसंगी वाचून दाखवण्यात आले. बायबलमधील अनेक प्रसंग हे मराठी संतपरंपरेशी निगडित असल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे.
 
साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना प्राचार्य रा.रं. बोराडे. व्यासपीठावर इतर मान्यवर. छाया : कालिदास म्हेत्रे
 

बातम्या आणखी आहेत...