आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सरकार किमान समान कार्यक्रमानुसारच चालणार' : पटेल, प्रफुल्ल पटेल यांनी साई बाबांच्या समाधीचे घेतले दर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी : महापुरुषांबद्दल विनाकारण विवाद निर्माण करणे हे योग्य नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टोला लगावला. सावरकरांबद्दलची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली असून, राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमानुसारच चालणार असल्याने पाच वर्षें सरकारला कोणतीही भीती नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले आहे. लहान-मोठे विषय असले तरी दोन दिवसांत सर्व प्रश्न मार्गी लागून सोमवारपासून राज्य मंत्रिमंडळ पूर्ण जोमाने कामकाजाला सुरुवात करेल. तीनही पक्षात मंत्रिमंडळातील समावेशावरून काही प्रमाणात नाराजी असल्याचे वाचण्यात येत असून प्रादेशिक विचार करूनच मंत्रिमंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. मंत्रिमंडळात सर्वांचीच वर्णी लावता येत नसल्याने काही प्रमाणावर नाराजी असू शकते. एनआरसी कायदा बनवताना केंद्र सरकारने घाई केल्याने हिंदू-मुस्लिम यांच्यात दरी वाढली आहे. या कायद्याविरोधात आता देशातील तरुण पिढी रस्त्यावर आली असल्याने देशातील शांततेचे वातावरण बिघडले जात आहे. भाजपला हिंदू-मुस्लिम वाद वाढवायचा असल्याचे यातून सिद्ध होत असल्याची टीका पटेल यांनी केली. लोकसभेत व राज्यसभेत एनआरसी कायद्याबाबत सखोल चर्चा व्हायला हवी होती, ती झाली नाही. या कायद्याबाबतचे बिल स्टँडिंग कमिटीकडे विचारविनिमयासाठी जायला हवे होते. पण केंद्र सरकारचे ते पाठवले नाही. देशात उद्योगधंदे बंद पडत आहे. अर्थव्यवस्थेचे प्रश्न, तरुणांच्या नोकऱ्या या प्रश्नावरून तरुणांचे व नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच केंद्राने एनआरसी कायदा आणला असल्याची टीका पटेल यांनी केली. आपण फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी जबाबदारी स्वीकारल्यानंतर फुटबॉलला चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. भविष्यात क्रिकेटप्रमाणेच फुटबॉल हा खेळ लोकप्रिय असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. साई संस्थानतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी संस्थानतर्फे त्यांचा सत्कार केला. यावेळी साई संस्थानचे विश्वस्त बिपिन कोल्हे, रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, नीलेश कोते, चंद्रकांत गोंदकर, दीपक गोंदकर, प्रसाद पाटील, किरण माळी, साई कालेकर, संजय कोतकर हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी श्री साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर. सोबत बिपिन कोल्हे.  

बातम्या आणखी आहेत...