आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज वाहिनीपासून ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास सौर कृषी पंप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमरावती - शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने शेतात सिंचनासाठी वीज मिळावी म्हणून महावितरणनने यंदापासून कृषी वीज पुरवठ्यासाठी एचव्हीडीएस (हाय होल्टेज डिस्ट्रीब्युशन सिस्टिम) योजनेमधून पुरवठा देण्याचे काम सुरू केले आहे. या योजनेमधून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येते. मात्र काही शेतकऱ्यांच्या शेतापासून वीजवाहिनीचे अंतर सहाशे मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास 'एचव्हीडीएस'मधून वीज पुरवठा न देता सौर ऊर्जेद्वारा पुरवठा देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 


अनेक शेतकरी वर्षानुवर्षांपासून वीज जोडणीसाठी ताटकळत आहेत. यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेताच्या जवळपास वीजवाहिनी नाही त्यांना यापूर्वी प्रत्येक खांबाप्रमाणे महावितरणच्या ठरलेल्या दरानुसार रक्कम भरणा करावी लागत होती. यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागायचा किंवा वर्षांनुवर्षे वीजजोडणीची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र अशा शेतकऱ्यांच्या शेतात वीज पुरवठा देण्याऐवजी महावितरणने थेट सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेतला आहे. सौर कृषी पंप घेतल्यास शेतकऱ्यांवर वीज जोडणीच्या तुलनेत काहीसा आर्थिक भुर्दंड पडणार आहे मात्र एकदा सौर कृषी पंप सुरू झाल्यानंतर भविष्यात संबंधित शेतकऱ्याला वीजदेयकांची कटकट राहणार नाही. पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी शेत असल्यास संबंधित शेतकऱ्याला तीन एचपी तसेच पाच एकरापेक्षा जास्त शेत असल्यास पाच एचपीचे सौर कृषी कनेक्शन देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना जोडणी घेण्यापूर्वी सुरूवातीला वीज जोडणीच्या तुलनेत काही पैसे अधिक लागणार आहे. मात्र वीज खंडित होणे आणि रात्रीच्या सिंचनापासून शेतकऱ्यांची सौर ऊर्जेमुळे सुटका होणार आहे. मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना कृषी भारनियमनामुळे तसेच पुरेशा वीजदाबाअभावी सिंचन योग्य पद्धतीने करण्यास प्रचंड अडचणी येत आहे. 


वर्षांनुवर्षांपासून असलेले ट्रान्सफॉर्मर, एका ट्रान्सफॉर्मवर क्षमतेपेक्षा जास्त वीज जोडणी यामुळे सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास अडचणी येत असल्याचे पुढे आले होते. म्हणूनच यंदापासून महावितरणने 'एचव्हीडीएस' योजना कार्यान्वित केली आहे. ही योजना खर्चिक असली तरी याचा कोणताही अतिरिक्त भुर्दंड शेतकऱ्यांवर येणार नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याउलट प्रत्येक शेतकऱ्याला किंवा शेत लागून असल्यास दोन शेतकऱ्यांना मिळून एक स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर लावण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळणार आहे. 'एचव्हीडीएस'च्या एका वीज जोडणीसाठी महावितरणला सुमारे अडीच लाख रुपये खर्च येत आहे. मागील सहा महिन्यांपासून महावितरणकडून कृषी वीज जोडणीची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र आता 'एचव्हीडीएस' योजनेतून वीज जोडणी देण्यासाठी महावितरणकडे तब्बल ७० कोटी रुपयांचा निधी आला आहे. मार्च २०१८ पर्यंत जिल्ह्यात तब्बल ४ हजार ६९५ शेतकऱ्यांचे कृषी वीज जोडणीचे अर्ज प्रलंबित होते. मात्र आता 'एचव्हीडीएस' योजनूमधून वीज जोडणीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. 


सौरपंपामुळे होणारे फायदे 
शेतकऱ्यांना दरमहा येणाऱ्या वीज देेयकांपासून सुटका होईल, त्यामुळे आर्थिक बचत होईल. 
दिवसाच पुरेशी ऊर्जा उपलब्ध असल्यामुळे रात्रीचे सिंचन करण्याची वेळ येणार नाही. 
भारनियमन आणि वीज खंडित होण्याच्या अडचणी येणार नाही. 
भारनियमनामुळे अनेेक शेतकऱ्यांना मुबलक जलसाठा असताना योग्य वेळी सिंचन करता येत ही मात्र सौरऊर्जेमुळे ही अडचण दूर होईल. 
 
 
जिल्ह्यात २२ शेतकऱ्यांना दिली जोडणी 
'एचव्हीडीएस' योजनेमधून जिल्ह्यात कृषी पंपाच्या वीज जोडणीची प्रक्रिया सुरू झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यात २२ शेतकऱ्यांना जोडणी दिली आहे. ज्यांच्या शेतापासून वीज वाहिनीचे अंतर सहाशे मीटरपेक्षा जास्त आहे त्यांना सौरऊर्जेवरील कृषीपंप देण्यात येणार आहे. तसा निर्णय महावितरणने घेतला आहे. सुहास मेत्रे, अधीक्षक अभियंता, महावितरण. 


यंदा पाचशे शेतकऱ्यांच्या शेतात होणार सौरऊर्जेद्वारे कृषी पंपाचा पुरवठा सुरू 
महावितरणकडे मार्च २०१८ पर्यंत वीजजोडणी मागणी करणाऱ्या ४ हजार ६९५ शेतकऱ्यांपैकी सुमारे साडेचारशे ते पाचशे शेतकऱ्यांच्या शेतापासून वीज वाहिनी सहाशे मीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. त्यामुळे यंदाच सुमारे पाचशे शेतकऱ्यांच्या शेतात सौरऊर्जेद्वारे कृषी पंपाचा पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सौरऊर्जेसोबतच पंपसुद्धा देण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...