आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंमत नियंत्रणासाठी नववर्षात १ लाख टन कांद्याचा राखीव साठा करणार सरकार

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील नाशिकजवळील आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ लासलगावमध्ये नवा कांदा येण्यास सुरुवात झाली आहे. - Divya Marathi
महाराष्ट्रातील नाशिकजवळील आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ लासलगावमध्ये नवा कांदा येण्यास सुरुवात झाली आहे.
  • यंदा, ५६,००० टन राखीव साठा होता मात्र, दरवाढ रोखण्यात याचा उपयोग झाला नाही
  • मान्सूनचा विलंब आणि अवकाळी पावसाने कांद्याचे उत्पादन २६ टक्के घटले

नवी दिल्ली - यंदा कांद्याच्या गगनाला भिडलेल्या किमती पाहता सरकार आगामी वर्षात स्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या तयारीत गुंतले आहे. केंद्र सरकारने कांद्याचा राखीव साठा(बफर स्टॉक) सुमारे दुप्पट करत १ लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चालू वर्षांत कांद्याचे ५६,००० टनाचा बफर स्टॉक तयार केला होता. मात्र,वाढत्या किमती रोखण्यात याचाा उपयोग झाला नाही. कांद्याचा भाव अद्यापही बहुतांश शहरांत १०० रु. प्रति किलोवर आहे. यामुळे सरकारला सरकारी क्षेत्रातील कंपनी एमएमटीसीद्वारे कांद्याची आयात करणे भाग पडले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समूहाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली होती. सुमारे १ लाख टन बफर स्टॉक तयार करण्याचा निर्णय त्यात झाला. सरकारकडून बफर स्टॉक करण्याचे काम नाफेड करते. २०२० मध्येही बफर स्टॉकची जबाबदारी ही संस्था सांभाळेल.नाफेड मार्च ते जुलैदरम्यान रबी हंगामात तयार होणाऱा कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करेल. हा कांदा दीर्घकाळापर्यंत साठवून ठेवता येऊ शकतो. खरीप हंगामात महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख कांदा उत्पादक भागांत मान्सून उशिरा आल्याने आणि त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे यंदा कांदा उत्पादनात २६% घट आली आहे. याचा परिणाम वाढत्या किमतीच्या रूपात दिसला. सरकारने कांद्याच्या भावातील तेजीवर अंकुश लावण्यासाठी पावले उचलली आहेत. यामध्ये निर्यात बंदी, व्यापाऱ्यांच्या साठ्यावर मर्यादा, याशिवाय बफर स्टॉक आणि आयातीमार्फत स्वस्त दरात कांद्याची विक्री याचा समावेश आहे. स्वस्त दरासाठी आता आयात केलेल्या कांद्याची विक्री केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...