आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन सुरू राहील : राम माधव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कठुआ- जम्मू-काश्मीरमधील लोकशाही प्रक्रियेत नॅशनल कॉन्फरन्स(एनसी) व पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी(पीडीपी) खोडा घालत असल्याचा आरोप करत भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी या पक्षांना विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार की बहिष्कार टाकणार, हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

 
जम्मू-काश्मीर विधानसभा विसर्जित करण्याच्या प्रश्नावर राम माधव म्हणाले, डिसेंबरच्या मध्यापर्यंत राज्यपाल शासन कायम राहील. त्यानंतरच्या विषय नंतर चर्चिले जातील. राज्यपाल शासनाबाबत आम्ही समाधानी आहोत. त्यामुळे काही काळ राज्यपाल शासन सुरू ठेवण्याचे ठरवले आहे. भाजप नगरसेवकांच्या मंगळवारी रात्री आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. राज्यघटनेअंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन वाढवण्याची कोणतीही तरतूद नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ डिसेंबरला राज्यपाल शासन संपुष्टात आल्यानंतर केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता आहे.  


एनसी व पीडीपीचे नाव न घेता माधव म्हणाले, सुरुवातीस त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि आता विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने चर्चा करण्यावर भर दिला जात आहे. यातच त्यांचा ढाेंगीपणा उघड झाला आहे. कलम ३५ अ च्या संरक्षणार्थ निवडणुकीत भाग घेणार नसल्याचे ते प्रथम सांगतात, त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेची मागणी करतात. उद्या विधानसभा निवडणुका झाल्यास तुम्ही लढणार की बहिष्कार टाकणार, असा सवाल माधव यांनी केला आहे. दोन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीत सहभाग घेतल्यास ज्या कलम “३५ अ’च्या कारणावरून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर बहिष्कार टाकला त्याचे काय? असे असले तरी या पक्षांनी लोकशाही प्रक्रियेत भाग घेतल्यास त्यांचे स्वागत केले जाईल.  


सुरक्षेच्या मुद्द्यावर माधव म्हणाले, पाकच्या आव्हानाचा सामना योग्य पद्धतीने करण्यास संरक्षण दल सक्षम अाहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यात तीन जवानाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना वरील प्रश्न विचारण्यात आला. आणखी एका सर्जिकल स्ट्राइकची वेळ आली आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, सुरक्षा दल परिस्थितीचा आढावा घेईल आणि आवश्यक ते पाऊल उचलले जाईल.

 

 निवडणुकीत भाग घेण्याबाबत दोन्ही पक्ष दुटप्पी   

दोन्ही पक्षांनी लडाख पर्वतीय क्षेत्र विकास परिषदेच्या निवडणुकीत भाग घेतला. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर बहिष्कार टाकला. असे असले तरी लोकांनी त्यांना चांगला धडा शिकवला आहे व पंचायत निवडणुकीत सहभागी व्हायला भाग पाडले. राज्यपाल शासनाबाबत माधव यांनी समाधान व्यक्त केले. राज्यात चांगले वातावरण तयार झाले आहे. दहशतवादाचा कठोर पद्धतीने सामना केला जात आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या कामाशी लोक अवगत आहेत.  

 

माधव यांनी सरकारबाबत स्थिती स्पष्ट करावी : ओमर 

श्रीनगर । जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेबाबतची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. राज्यपाल शासन कायम ठेवण्याच्या माधव यांच्या वक्तव्यावर ओमर प्रतिक्रिया देत होते. जम्मू-काश्मीर सचिवालयात आपला प्रवेश निश्चित असल्याचे खूप सारे भुकेले प्रत्येकाला सांगत असल्याचे ओमर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...