आरोग्य / आहारातील कडधान्य आहेत आरोग्यासाठी उत्तम...

कडधान्यातील विशेष म्हणजे ते जास्त शिजविल्यानंतर देखील त्याच्यातील पोषकतत्वे कायम राहतात.

रिलिजन डेस्क

Nov 06,2019 12:15:00 AM IST

कडधान्य आपल्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र आजच्या धकाधकीच्या म्हणण्यापेक्षा 'फास्ट फूड'च्या युगात घरातूनच काय तर हॉटेलमधून कडधान्याची हकालपट्टी झाली आहे. कडधान्याच्या अभावामुळे मानवाच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. कडधान्यातील विशेष म्हणजे ते जास्त शिजविल्यानंतर देखील त्याच्यातील पोषकतत्वे कायम राहतात. तसेच त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व व पोषकतत्वे असतात.


तूरडाळ : तूरडाळीत खनिज, कार्बोहायड्रेट, लोहयुक्त खनिज, कॅल्शियम यांचे योग्य प्रमाण असते. तूर डाळ पचण्यास सोपी जाते. लहान बालकांना तूरडाळीचे पाणी पिण्यास देतात. तसेच आजारी व्यक्तीस तुरीच्या डाळीची खिचडी खाण्यास देतात. मात्र दमा व वाताचे आजार असणाऱ्या व्यक्तींना तूरडाळीपासून त्रास होतो.


हरभरे : हरभरे व हरभऱ्याची डाळ मानवी आरोग्यासह सौंदर्यास देखील उत्तम आहे. यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, लोहयुक्त खनिज व व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. रक्तदाब, खोकला व कावीळ या आजारावर लाभदायी असून हरभऱ्याच्या डाळीचे पीठ केस व त्वचेच्या सौंदर्यावर गुणकारी असते.


मूग : शिजवलेले किंवा भिजवलेले मुगामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्त्वे असून ते मानवास आरोग्यवर्धिनी असतात. कोंब आलेल्या मुगामध्ये कॅल्शियम, लोहयुक्त खनिज, प्रोटीन, कार्बोहायड्रेट व व्हिटॅमिन्स यांच्या मात्रा दुपटीने वाढतात. ताप व खोकला झालेल्या व्यक्तीसाठी ते लाभदायी असतात.

मसूर : मसूरच्या डाळीचा उपयोग रक्तशुद्धी तसेच रक्तवाढीसाठी होतो. जुलाब, खोकला व अपचन यावर मसूरची डाळ लाभदायी असते.


उडीद : उडदाची डाळ शरीरास थंड असते. मानवी आहारात तिचा उपयोग करतेवेळी शुध्द तुपात हिंग टाकून त्याची वाफ दिली पाहिजे. यात देखील कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम व प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळतात. मुळव्याध, दमा, पक्षाघात आदी आजार असलेल्यांनी त्यांच्या आहारात उडीद डाळीचा जास्त वापर केला पाहिजे.

X
COMMENT