आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीक्षेत्र राजूर - राजूर येथील वारकरी संस्थेत शिक्षण घेत असलेल्या नातवांना भेटण्यासाठी एसटी बसने राजूरला आलेल्या आजीचा मागे वळत असलेल्या शिवशाही बसची धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. नंदाबाई कचरू खाकरे (६५, वडोद बाजार, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद) अनेक दिवसांपासून नातवाला भेटण्याची इच्छा मात्र अपुरीच राहिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील वडोदबाजार येथील प्रसाद आणि जितेंद्र खाकरे यांनी वारकरी सांप्रदायातील गणराज वारकरी संस्थेेत मागील दोन महिन्यांपूर्वी प्रवेश घेतला आहे. नातवाला रविवारची सुटी असल्याने निवांत भेटता येईल, या आशेने आजी नंदाबाई खाकरे यांनी रविवारी सकाळी सिल्लोड येथून जालना गाडीने राजूर गाठले. राजूर बसस्थानकावर उतरताच बसस्थानकाच्या बाहेर निघण्याच्या तयारीत असताना जालन्याकडे जाण्यासाठी बसस्थानकात उभी शिवशाही बस (क्रमांक एम.एच.२० बी.एल. २१६२ ) मागे वळवत असताना नंदाबाईंना एसटीचा धक्का लागला. यामध्ये त्या खाली पडल्या. त्यांच्या दोन्ही पायावरून बसचे टायर गेले. हा प्रकार तेथे उपस्थित प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी नंदाबाई यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतल्याने औरंगाबादेकडे रवाना करण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी राजूर पोलिस चौकीत बस जमा करण्यात आली आहे.
नातवासाठी आणले हाेते लाडू व बिस्कीट
दाेन महिन्यांपासून प्रसाद व जितेंद्र या दाेन्ही नातवांची भेट झाली नव्हती. कधी सुटीचा रवीवार येताे आणि मी, नातवांना भेटते, अशी उत्सुकता हाेती. शनिवारी नंदाबाई यांनी लाडू बनवले. रविवारी सकाळीच सात वाजता घरून त्या राजूरला जाण्यासाठी निघाल्या हाेत्या. रस्त्यातील किराणा दुकानातून त्यांनी नातवंडांसाठी बिस्किटांचे पुडे व चाॅकलेटही घेतले. मात्र, हाकेवर असलेल्या संस्थानात पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने डाव साधला. साेबत आणलले लाडू, बिस्किटे, चाॅकलेट पिशवीतून रस्त्यावर पडले हाेते.
चालक वाहकाचा हलगर्जीपणा
कोणत्याही बसस्थानकात बसचा प्रवेश झाल्यानंतर बस रिव्हर्स घेताना वाहकाने मागच्या बाजूने कुणी आहे की नाही हे बघणे अपेक्षित आहे. शिवाय त्यांना शिट्टी देण्यात आली असून त्याचा वापरही अनिवार्य आहे. मात्र, चालक आणि वाहकांनी या बाबत गंभीरता न घेतल्याने त्यांच्या हलगर्जीपणामुळे एका वृद्धेला जीव गमवावा लागला.
हाकेच्या अंतरावरच संस्था
राजूर बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर गणराज वारकरी संस्था असून या संस्थेत नंदाबाई खाकरे यांचे नातू प्रसाद आणि जितेंद्र यांना प्रवेश घेतला आहे. नातवांची भेट होईल म्हणून नंदाबाईंनी सिल्लोड ते जालना या गाडीने प्रवास करून दुपारी राजूर गाठले. बसमधून उतरून बसस्थानकाच्या बाहेरच्या मार्गाकडे घेतानाच त्यांना बसची जोराची धडक बसली.
नियमांचे उल्लंघन
कोणत्याही बसस्थानकात बस उभी केली किंवा बाहेर घेत असेल तर त्या एसटीतील वाहकाने पाठीमागे उभे राहून चालकांना सूचना देणे अपेक्षित आहे. बसच्या सरासरी १० ते १५ फूट अंतरावर उभे रहायला हवे. राजूरच्या प्रकरणात मात्र, निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येते. या प्रकरणी कार्यवाही होईल.
उद्धव वावरे, विभाग नियंत्रक, जालना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.