आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच पिढ्यांनंतर कुटुंबात जन्मलेल्या 'सोनपरी'चेे भव्य स्वागत, ८०० फुटांपर्यंत फुलांची पखरण अन‌् फटाक्यांची आतषबाजी!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- तुळजापूर तालुक्यातील मंगरूळमध्ये माळी कुटुंबाने मुलीच्या जन्माचा अनोखा सोहळा साजरा केला. सोनपरी घरी येणार म्हणून सुमारे ८०० फुटांपर्यंत फुलांच्या पाकळ्या अंथरण्यात आल्या होत्या. गावातील रस्त्यांवर रांगोळी काढून घरदार तोरण लावून सजवण्यात आले होते. फटाके फोडून, बॅँड लावून मुलीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावकऱ्यांना मिठाई वाटप करून तोंड गोड करण्यात आले. हा सोहळा बुधवारी (दि.२६) सायंकाळी पार पडला. 


मंगरूळचे पोलिस पाटील लक्ष्मण राजेंद्र माळी यांच्या कुटुंबात पाचव्या पिढीनंतर मुलगी जन्माला आली. एकीकडे मुलीच्या जन्मानंतर नाक मुरडणारा समाज तर दुसरीकडे मुलीच्या जन्मासाठी आतुरलेली कुटुंबे, अशी विसंगती आहे. माळी कुटुंबाने मात्र मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्याचा निर्णय घेतला. तुळजापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बुधवारी पत्नी अंजू आणि सोनपरी मुलीचे स्वागत करण्यासाठी लक्ष्मण पाटील यांनी भव्य तयारी केली होती. गावातून घराकडे येणाऱ्या रस्त्यावर फुलांच्या पाकळ्या अंथरण्याचे काम सुरू झाले. सुरुवातीला वेलकम सोनपरी, अशा शब्दांत रांगोळी काढून आरास करण्यात आली. गुलाब, गलांडा आदी प्रकारच्या फुलांनी रस्त्याचा ८०० फुटापर्यंतचा भाग व्यापून टाकला होता. बॅन्ड पथक तयारीत होते. तरुण मुले फटाक्यांची माळ अंथरून सज्ज झाले होते. 


कुटुंबातील सदस्यांच्या नजरा तुळजापूर रस्त्याकडे लागलेल्या होत्या. फुलांनी सजवलेल्या जीपमधून अंजू माळी त्यांच्या छोट्याशा चिमुकलीला घेऊन खाली उतरताच बॅन्डचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव तरळून गेले. छोट्याशा सोनपरीचे इतके जोरदार स्वागत आजवर कधीही झाले नव्हते. म्हणून हा कौतुकाचा सोहळा पाहण्यासाठी अवघे गाव रस्त्यावर आले होते. लक्ष्मण माळी यांच्या मातोश्री शशिकला यांनी चिमुकलीचे आणि सून अंजू यांचे औक्षण करून वाजतगाजत घराकडे नेले. त्यानंतर गावकऱ्यांना मिठाई वाटण्यात आली. मुलीच्या स्वागताचा अनोखा सोहळा मंगरूळमध्येच नव्हे तर पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला. 


कुटुंब भारावले 
आमच्या कुटुंबात पाच पिढ्यंानंतर मुलगी झाली आहे. हा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. मुलगी जन्मल्यापासून स्वागताचा सोहळा थाटात करण्याची आमची इच्छा होती. मुलीच्या जन्माचे प्रत्येकाने स्वागत करावे, मुलगी ओझं नाही, तीच खरा दोन्ही कुटुंबाचा आधार आहे, हे यातून सांगण्याचा प्रयत्न होता, असे लक्ष्मण माळी यांनी सांगितले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...