आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला तिसरी मुलगीच झाल्याने आजोबा-आजीने चोरले होते दुसऱ्याचे मूल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयांमधून सहा दिवसांचे मूल (मुलगा) चाेरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी २४ तासांतच जेरबंद केले. आरोपी मंगळवारी संध्याकाळी स्वतःहून रुग्णालय परिसरात कानोसा घेण्यासाठी आला आणि आयताच जाळ्यात सापडला. अमर तुकाराम जोगदंड असे त्याचे नाव असून त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीला तिसरी मुलगीच झाल्याने अमर जोगदंड याने रुग्णालयातून मूल (मुलगा) चोरले. स्वारातीच्या वॉर्ड क्रमांक ८ मधून सोमवारी ६ दिवसांचे मूल चोरीस गेले होते. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख गजानन जाधव, पोलिस उपअधीक्षक राहुल दज, पो. नि. सिद्धार्थ गाडे यांनी तपासाची चक्रे फिरवली. अमर जोगदंड याची मुलगी पूजा कृष्णा सावंत हिला चार दिवसांपूर्वी तिसरीही मुलगीच झाली. ती आणि सफिना या दोघीही एकाच वाॅर्डात होत्या. मुलीला मुलगा मिळवून देण्यासाठी आजी-आजोबांनी सफिनाच्या पोटी जन्मलेले मूल चोरले, पण अखेर चोरी पकडली गेली.

कानोसा घेण्यासाठी आला नि अडकला
अमर जोगदंड रुग्णालयात काय वातावरण आहे, याचा कानोसा घेण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी रुग्णालय परिसरात आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याने आपल्या मुलीला तिला मुलगा पाहिजे होता म्हणून आम्ही बाळ चोरून नेले, अशी कबुली पोलिसांकडे दिली.