आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीची मायेची फुंकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकोणीस वर्षांपूर्वीची गोष्ट. माझे लग्न झाल्यानंतर प्रथमच ‘ह्यांच्या’ गावाकडे जाण्याचे ठरले होते. गावाकडची शुद्ध व मोकळी हवा, स्वच्छ परिसर, दुतर्फा झाडी आणि मनमोहक निसर्गसौंदर्य या सर्व गोष्टी अनुभवता आल्याने आत्मिक समाधान व मन प्रसन्न करणारे वातावरण होते. घराबाहेर तुळशी वृंदावन, ओसरीत चौफाळा बांधलेला पाहून मला तेथील घर खूप आवडले. सर्वांच्या भेटीगाठी, गप्पागोष्टी, विचारपूस आणि त्यानंतर चहापाणी असे सोपस्कार पार पडले. नवीन आलेल्या सुनेने स्वयंपाक करावा, असा आजीचा आग्रह होता. आजी स्वभावाने तापट, कडक आणि करारी वाटल्या. त्यांच्या आवाजात कणखरपणा जाणवला.

घरात 18 माणसांचे कुटुंब होते. सर्वांना एकाच धाग्यात त्यांनी गुंंतवून ठेवले होते. आजीकडे वर मान करून पाहण्याची हिंमत कोणातच नव्हती. आजींनी मला भाकरी बनवण्यास सांगितले. मी तयारीला लागले. दोन भाकरी झाल्यावर तिसरी तव्यावर टाकणार इतक्यात लाइट गेली. मग काकूंनी चिमणी, कंदील लावले. मला त्या अंधुक उजेडात वाटले तव्यावर भाकरी टाकलेली आहे. म्हणून त्यावर पाण्याचा हात फिरवण्यासाठी तव्यावर ठेवला. तवा आधीच गरम झालेला. हात ठेवताच जोरात चटका बसला आणि मी जोरात ओरडले. सर्व जणी पाण्यात हात घाल, मळलेला गोळा लाव म्हणजे दाह थांबेल, असे सांगत होत्या. मग आजीच पुढे आल्या. बराच वेळ पाण्यात हात बुडवून ठेवला. मग पदराने पुसून त्यावर अलगद हाताने त्यांनी मलमपट्टी लावली. मला कुरवाळून जवळ घेतले. आजींचे प्रेमळ रूप पाहून माझे मन भरून आले. खूप बरेही वाटले. हात पूर्ण बरा होईपर्यंत काही काम करू दिले नाही. आज आजी आमच्यात नाहीत, पण त्या मायेची फुंकर माझ्या आठवणीत आहे.