आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देशातील १३ महाविद्यालयांना प्रत्येकी २ कोटींचे अनुदान मंजूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न असलेल्या १३ महाविद्यालयांना पायाभूत सुविधांसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सहा, धुळे जिल्ह्यातील तीन तर, नंदुरबारमधील चार महाविद्यालयांचा समावेश आहे. 


उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीला लागावी, यासाठी रुसाच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत. महाविद्यालयांमध्ये अधिक पायाभूत सुविधा, संशोधनात वाढ आणि रोजगाराच्या संधी या निकषांवर रुसामार्फत महाविद्यालयांना निधी दिला जात आहे. या योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन रुसाच्या वतीने केले होते. यासंदर्भात 'रुसा'च्या राज्य संचालक मिता राजीव लोचन यांनी विद्यापीठात जून महिन्यात अनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पात्र असलेल्या नॅक प्रमाणित गुणांक २.५ प्राप्त महाविद्यालयांनी प्रस्ताव दाखल केले होते. यातील १३ महाविद्यालयांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला आहे. 


या महाविद्यालयांना मिळणार अनुदान 
नूतन मराठा महाविद्यालय (जळगाव), डी.एन.भोळे महाविद्यालय (भुसावळ), महात्मा गांधी महाविद्यालय (चोपडा), लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय (जळगाव), आप्पासाहेब आर.बी.गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (शेंदुर्णी), केसीईचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय (जळगाव), एच.आर.पटेल महिला महाविद्यालय (शिरपूर), विद्यावर्धिनी महाविद्यालय (धुळे), स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे दादासाहेब रावल महाविद्यालय (दोंडाईचा), डी.एच.अग्रवाल कला, आर.ए.वाणिज्य व सी.सी.शहा विज्ञान महाविद्यालय (नवापूर), एन.टी.व्ही.एस.चे विधी महाविद्यालय (नंदुरबार), साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (शहादा), जी.टी.पी. महाविद्यालय (नंदुरबार). 

बातम्या आणखी आहेत...