आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासाठी मोठी चिंता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेचे नवे अध्यक्ष म्हणून गोतबाया राजपक्षे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर लंकेमध्ये बुद्धिस्ट सिंहली समाजाच्या प्राबल्याचा एक नवा अध्याय पाच वर्षांच्या खंडानंतर सुरू झाला. लष्करी सैनिक आणि संरक्षणमंत्री म्हणून काम केलेल्या राजपक्षेंची विचारसरणी ही खूपच आक्रमक आहे. निवडणुकीतील विजयानंतर संख्येने २० टक्के असलेल्या अल्पसंख्याक हिंदू (तमिळ), मुस्लिम नागरिकांना शांततेचे, सहकार्याचे आवाहन करतानाही त्यांच्या बोलण्यामध्ये आक्रमकतेचा दर्प आहे. “सिंहलींच्या मतांवर निवडून येण्याची खात्री असतानाही मी अल्पसंख्याकांना विजयामध्ये भागीदार होण्याचे आवाहन केले होते. अपेक्षेनुसार प्रतिसाद नव्हता. आता तरी श्रीलंकेच्या विकासासाठी सहकार्य करा.”  हे सहकार्याचे आक्रमक आवाहन. नूतन अध्यक्षांचे मोठे भाऊ महिंद्रा राजपक्षे हेही १० वर्षे लंकेचे अध्यक्ष होते. राजपक्षे बंधू हे लंकेच्या विरोधातील बंडखोरांचा कठोर बिमोड करण्याच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. अशा राजपक्षेंमुळे दुहेरी पेचात भारत सापडला आहे. लंकेतील जनमताचा आदर म्हणून राजपक्षे यांना समर्थन द्यायचे तर तेथील मूळचे भारतीय तमिळ आणि तामिळनाडूमधील ‘डीएमके’ला मानणारा मोठा वर्ग नाराज होतो. तमिळ लोकांच्या हिताची भाषा केली तर ३० वर्षांच्या अंतर्गत यादवीतून निर्माण झालेल्या कडवटपणामुळे लंकेतील सत्ताधारी ते मान्य करणार नाहीत. भारतासाठी अडचणीचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजपक्षे बंधूंचे चीनबद्दलचे प्रेम आणि ओढा. चीनने भारताभोवतीच्या छोट्या शेजारी देशांना मोठी कर्जे देऊन अप्रत्यक्षरीत्या त्यांना आपल्या पंखाखाली खेचले आहे. राजपक्षेंच्या प्रेमामुळे चीनची घुसखोरी तेथे झालीच. श्रीलंकेचे एक मोठे बंदर मोठी रक्कम खर्चून ते विकसित करत आहेत. चीनकडून कर्ज घेण्यातील धोका लंकेला आताच कळणार नाही. चीनच्या पार्श्वभूमीवर शेजारी राष्ट्रांशी भारताचे संबंध हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे. आजवरचे राज्यकर्ते आणि प्रशासनातील उच्च पदस्थांचा दृष्टिकोन त्याला कारण आहे. खेडेगावातील सरंजामशाहीतील घराणे ग्रामस्थांकडे ज्या वर्चस्वाच्या नजरेतून बघतो त्याच नजरेतून भारत आजवर श्रीलंकेकडे पाहात आला. लंकेशी आपले हवाई मार्गाशिवाय कुठलेही दळणवळण नाही. दोन देशातले सामुद्रिक अंतर हे फक्त २४ किलोमीटर असताना दळणवळण बिलकूल नाही. पूर्वी रोज खेपा चालायच्या. त्या भारताने बंद केल्या. चीनने हे हेरले. भारताच्या सर्व शेजारी देशांशी चीनने रस्ता, हवाई, सामुद्रिक, रेल्वे मार्गाने संपर्क प्रस्थापित केला आहे. लंका आणि भारतीयांमध्ये सांस्कृतिक, दैनंदिन चालीरीतींमध्ये खूपच साधर्म्य आहे. शेजाऱ्यांकडे पाहण्याच्या भारताच्या आजवरच्या पद्धतीनेच समस्या उभ्या केल्या. हे अंतर कमी कसे होईल? याचाच प्रयत्न भारत सरकारने केला पाहिजे. चीनला रोखण्यासाठी भारत एक विमानतळ विकसित करतोय. ७० वर्षांचा दुरावा दूर करण्यासाठी हे प्रयत्न अत्यंत तोकडे आहेत. लंकेच्या भौतिक गरजांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहेच, पण दोन मनांमधील दरी कशी दूर होईल? याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...