Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Greater restaurants to be made by old railways Coaches

रेल्वेचे जुनाट डबे बनणार आता शानदार रेस्टॉरंट; उत्पन्न वाढीसाठी रेल्वेची भन्नाट कल्पना

प्रसाद कानडे | Update - Aug 06, 2018, 07:42 AM IST

२५ वर्षे झालेल्या जुन्या डब्यांचा वापर करून रेस्टॉरंट बनवले जाणार आहे. यातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळणार आहे.

 • Greater restaurants to be made by old railways Coaches

  सोलापूर- जुनाट झालेले रेल्वेचे डबे आता शानदार रेस्टॉरंट बनणार आहेत. २५ वर्षे झालेल्या जुन्या डब्यांचा वापर करून रेस्टॉरंट बनवले जाणार आहे. यातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळणार आहे. रेल्वे बोर्डाने याबाबतचे आदेश प्रत्येक झाेनच्या सरव्यवस्थापकांना दिले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर भोपाळ व कोकण रेल्वेत याची सुरुवात झाली आहे. रेल्वे भाडेतत्त्वावर हॉटेलचालकांना सर्व पार्ट काढून डबा देणार आहे. रेल्वे डब्यांना २५ वर्षांची वयोमर्यादा ठरवून देण्यात आलेली असते. २५ वर्षांनंतर ते डबे रुळावर धावण्यास अक्षम हाेतात. त्यामुळे त्यातील आवश्यक ते पार्ट काढून ते भंगारमध्ये घातले जातात. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत रेस्टाॅरंटसाठी भाड्याने देणे रेल्वेसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे.


  रेल्वे बोर्डाने यासाठी रेल थीम रेस्टॉरंटची संकल्पना आखली आहे. ज्या ठिकाणी ग्राहक मोठ्या संख्येने येतात त्या ठिकाणी असे रेस्टॉरंट उघडावे, असे सांगण्यात आले. कोकण रेल्वेत मडगाव येथे अशा प्रकारचे रेल थीमवर आधारित रेस्टॉरंट उघडण्यात आले. यासाठी रेल्वे व संबधित हॉटेलमालक यांच्यात ९ वर्षांचा करार झाला आहे. या माध्यमातून रेल्वेला एका वर्षाला एका डब्याच्या बदल्यात अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. यानंतर आता स्थानकावरच जुन्या कोचमध्ये रेस्टॉरंटसारखी सेवा देण्याचा विचार सुरू आहे. अनेक ग्राहकांना रेल्वे थीमसारख्या हॉटेलमध्ये जेवण करणे अावडणार आहे.


  कालबाह्य डबे दिले
  रेल्वे थीम रेस्टॉरंटसाठी आम्ही आयुर्मान संपलेला शयनयान दर्जाचा डबा भाडेतत्त्वावर दिला आहे. ९ वर्षांसाठी आमच्यात करार झाला आहे.
  - एल. वर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे


  नऊ वर्षांत मिळतील ३० लाख रुपये
  पूर्वी रेल्वे डब्यांचे आयुर्मान संपल्यानंतर ते मध्यवर्ती कार्यालयाच्या कार्यशाळेत पाठवून देण्यात येत होते. त्या ठिकाणी डब्यांची चाके , ट्रॉली व आवश्यक त्या बाबी काढल्या जात. त्यानंतर त्याचे तुकडे करून ते भंगारात विक्री व्हायचे. यातून रेल्वेला एका डब्यामागे अडीच ते तीन लाख रुपये मिळत असत. आता मात्र हेच डबे भाडेतत्त्वावर दिले जात आहेत. ९ वर्षांच्या करारातून रेल्वे २५ ते ३० लाख रुपये कमावणार आहे.

Trending