आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षमा करण्याचा संस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वै-यावरही प्रेम करा, क्षमा व शील हे भूषण आहे, असा सर्वच धर्मांचा संदेश आहे. हे आपल्याला वाचून माहीत असते; पण याचे आचरण करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्याचे महत्त्व कळते आणि नकळत आपल्यावर झालेल्या संस्काराची कसोटी लागते. शाळेला सुटी असल्याने मी घराबाहेर होतो. माझ्या दोन वर्षांच्या विवेक नावाच्या मुलाने हट्ट धरून पत्नीच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ आपल्या गळ्यात घातली होती. माझी पत्नी ऊर्मिलाने बाहेर जाताना विवेकला घरात ठेवून बाहेरून दरवाजाला कडी घातली होती. ती घराबाहेर जाताच गळ्यात बोरमाळ घातलेला विवेक झोपेतून जागा होऊन रडू लागला. त्याचा रडण्याचा आवाज घराबाहेर गेला. योगायोगाने एक याचक महिला तेथूनच जात होती. माझा मुलगा रडत असल्याचे तिला ऐकू गेले. माझ्या घराचे बंद दार तिने उघडले, पण गळ्यात सोन्याची बोरमाळ असलेले मूल पाहून तिची बुद्धी फिरली. तिने ती माळ लंपास केली. आमच्या घरी धुणे धुवायला येणा-या बाईने कडी काढताना त्या महिलेला दुरून पाहिले होते.
माझी पत्नी घरी येताच धुणेवाल्या बाईने बोरमाळ कुणी चोरली त्या परिसरातील याचक बाईचे नाव सांगितले. आम्ही पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी मुद्देमालासह तिला पकडले; पण तिच्या घरची परिस्थिती व तिची मुले पाहून मला दया आली. या महिलेला शिक्षा झाल्यास मुले उघड्यावर पडतील, असे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले. मी तत्काळ त्या महिलेला उमरग्याला घेऊन गेलो, अ‍ॅडव्होकेट माधव खरोसेकर यांना भेटून तिचे वकीलपत्र घेण्याची विनंती केली. मुद्देमाल मिळाल्याने माझी काही तक्रार नसल्याचे सांगितले. माझी विनंती ऐकून क्षणभर तेही बुचकळ्यात पडले, पण मी त्यांना त्या महिलेची स्थिती समजावून सांगितली. कोर्टालाही विनंती केली. माझी विनंती मान्य करून कोर्टाने त्या महिलेला मुक्त केले.