Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | green vegetables eating health benefits in Marathi

पालेभाज्या खा आणि फिट राहा! 

दिव्य मराठी | Update - Apr 21, 2019, 12:04 AM IST

पालेभाज्या म्हटले की पालक, चुका, मेथी, अळू, शेपू, कोथिंबीर एवढीच नावे डोळ्यांसमोर येतात.

 • green vegetables eating health benefits in Marathi

  हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक मोठ्या प्रमाणात असतो. तो शरीरात असणाऱ्या घातक विषाणूंवर हल्ला चढवून त्यांना नष्ट करतो. पालेभाज्यांमध्ये विविध जीवनसत्त्वे असतात, शरीरासाठी ती उपयुक्त असतात. म्हणून पालेभाज्या खा आणि फिट राहा.


  पालेभाज्या म्हटले की पालक, चुका, मेथी, अळू, शेपू, कोथिंबीर एवढीच नावे डोळ्यांसमोर येतात. वास्तवात आपण माहिती करून घ्यायचं ठरवलं आणि पालेभाज्यांचे महत्त्व जाणून त्याकडे डोळसपणे पाहिलं, तर नेहमी वापरता येण्यासारख्या शंभरावर भाज्या आहेत; परंतु त्या निवडायचा त्रास किंवा त्या आवडत नाहीत म्हणून खाल्ल्या जात नाहीत. पालेभाज्या म्हणजे जीवनसत्त्व आणि खनिजांची खाणच.

  महागड्या टॉनिक्समधून जी जीवनसत्त्वे मिळतात त्यापेक्षा किती तरी अधिक पटींनी पालेभाज्यांतून उपलब्ध होतात. दररोज किमान एक वाटी शिजवलेली पालेभाजी प्रत्येकाच्या आहारात असायला हवी. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अ आणि क जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, फायबर यांचे प्रमाण खूप असते. पचायला सुलभ असतात. पालेभाज्या करताना त्यात नेहमी डाळीचं पीठ, सोयापीठ, पनीर, दही घालावं किंवा बरोबर लिंबू खावे. पालेभाज्यांतून मिळणारे बीटा कॅरोटिन महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट आहे, जे कॅन्सरसारख्या आजारांना दूर ठेवते. हृदयरोगातही उपयुक्त ठरते.


  पालेभाज्यांमधला चोथाही अत्यंत उपयुक्त आहे. पालेभाज्यांत उष्मांक कमी आणि चोथा अधिक असतो. हा चोथा बद्धकोष्ठता कमी करतो. वजन कमी करणाऱ्यांसाठी पालेभाज्या वरदानच आहेत. मधुमेहींमध्ये रक्तातील पातळी कमी करतो आणि नियंत्रित ठेवतो, वाढलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतो. फक्त पालेभाज्यांमध्ये सोडियम आणि पोटॅशियम भरपूर असल्याने ज्यांना किडनी विकार असतील त्यांनी आहारतज्ज्ञांकडून प्रमाण आणि त्या घेण्याची पद्धत समजावून घ्यावी. महाराष्ट्रात बाराही महिने पालेभाज्या उपलब्ध असतात. फक्त त्या खाताना स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात विशेषत: पालेभाज्या निवडून स्वच्छ धुऊन घ्याव्यात. गरम पाण्यात मीठ आणि हळद घालून थोडा वेळ ठेवाव्यात आणि नंतर खाण्यासाठी वापराव्यात.


  पालेभाज्या केल्यानंतर लगेचच खाव्यात, पुन्हा पुन्हा गरम केल्यास जीवनसत्त्वांचा ऱ्हास होतो. अशा गुणकारी भाज्यांत औषधी गुणधर्मही भरपूर आहेत. अशा भाज्या अनेक प्रकारांनी खाता येतात. उदाहरणार्थ- कडधान्ये, डाळी आणि शेंगदाणे घालून, दही लावून, चिंच, गूळ घालून, लसूण, मिरची, हिंगाची फोडणी घालून अशा अनेक प्रकारे पालेभाज्या करतात.

Trending