आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; राज्यभरातून लाखोंचा भीमसागर चैत्यभूमीवर उसळला

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री ठाकरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मंत्री जयंत पाटील
  • बीआयटी चाळीतील डॉ. आंबेडकरांचे घर राष्ट्रीय स्मारक करणार; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी दादर येथील चैत्यभूमीवर लाखोंचा भीमसागर उसळला होता. बाबासाहेबांचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच रांगा लागण्यास सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी परळमधील बीआयटी चाळीतील बाबासाहेब राहत असलेल्या घराला भेट दिली. तसेच बाबासाहेबांचे हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येईल, अशी घोषणा ठाकरे यांनी केली.

बाबासाहेबांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर ३ डिसेंबरपासूनच लाखो भीमसैनिक दाखल होण्यास सुरुवात झाली होती. हातात निळा झेंडा, डोक्याला जयभीम'ची निळी पट्टी बांधलेले भीम अनुयायी जयभीमचा जयघोष करत होते. लहान मुलांपासून ते ९० वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात बाबासाहेबांबद्दलचा आदर आणि अभिमान दिसून येत होता. चैत्यभूमीवर आलेल्या भीमसैनिकांनी महामानवाला अभिवादन केले. गुरुवारी रात्रीपासूनच दादर स्टेशन ते चैत्यभूमीदरम्यानचा रस्ता भीमसैनिकांनी फुलून जाण्यास सुरुवात झाली होती. आंबेडकरी गायक, कलावंत भीमगीते गाताना दिसत होती. नेहमीप्रमाणे क्रांतिगीतांच्या कॅसेट्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या साहित्यांचे स्टॉल्स, बाबासाहेबांच्या प्रतिमा व पुतळ्यांचे स्टॉल्स लागलेले होते. बँकाचे घोटाळे, कोरेगाव भीमाचा लढा, दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधार अशा विविध विषयांवरील पुस्तके स्टाॅलवर ठेवण्यात आली होती. पुस्तके आणि बाबासाहेबांच्या प्रतिमा आणि पुतळे खरेदी करण्यासाठी स्टॅाल्सवर गर्दी झालेलीही दिसून येत होती. चैत्यभूमी आणि आजूबाजूच्या परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी आपली चैत्यभूमी, स्वच्छ भूमी' हे अभियान गेली तीन वर्षे आम्ही आंबेडकरवादी संघटना राबवत असून या वेळीही त्यांनी संपूर्ण परिसर कचरामुक्त ठेवण्यात यश मिळवले होते.

दैव आणि देवावर विसंबून राहू नका. अंधश्रद्ध व बुवाबाजीचा विरोध करा. भविष्य, मुहूर्त, चमत्कारांवर विश्वास ठेवू नका ही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीचा आधार घेत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीने चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना विज्ञानाचा आधार घेत प्रयोग सादर करण्यात आले. मुंबई मनपातर्फे डाॅ. बाबासाहेबांच्या संग्रहित छायांचित्रांचे प्रदर्शन १९२७ मध्ये बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून लंडन विद्यापीठातून बॅरिस्टरची पदवी मिळवलेल्यापर्यंतचा प्रवास मांडला होता.

बाबासाहेबांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड : मुख्यमंत्री ठाकरे
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, बाबासाहेबांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. सामान्य माणसांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, आमदार आदित्य ठाकरे, मुबंईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री,विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, छगन भुजबळ, नवाब मलिक, राम नाईक, एकनाथ गायकवाड,सचिन अहिर आदी नेत्यांनीही चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.

राज ठाकरेंचे टि्वटच्या माध्यमातून अभिवादन

ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले. राज ठाकरे ट्विटमध्ये म्हणतात, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची गुंफण करीत भारतीय लोकशाहीला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचे अभेद्य कवच दिले. आज भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही राहणे हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल.

राज्यपाल कोश्यारी, पटोले नतमस्तक 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी पावणेआठ वाजता चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या वेळी राज्यपाल म्हणाले, आपण सर्व मिळून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत बनवण्याचा प्रयत्न करूया. बाबासाहेबांचे विचार अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आहेत. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देश एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देश त्यांना आज अभिवादन करत आहे. मीही त्यांना विनम्र अभिवादन करीत आहे.

३१ वर्षांनंतर ठाकरे कुटुंबातील सदस्याची चैत्यभूमीला भेट

१९७८ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चैत्यभूमीला भेट दिली होती. त्यानंतर ठाकरे कुटुंबीयांतील कोणीही चैत्यभूमीला भेट दिली नव्हती. या वेळी मुख्यमंत्री झाल्याने उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीला भेट दिली आणि बाबासाहेबांना अभिवादन केले.

बीआयटी चाळीत १९१२ ते १९३४ या कालावधीत होते वास्तव्य


चैत्यभूमीला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहत असलेल्या परळमधील बीआयटी चाळीतील घराला भेट दिली. १९१२ ते १९३४ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी वास्तव्यास होते. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. घराला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेबांचे हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येईल, अशी घोषणा केली.