Home | Divya Marathi Special | Ground analysis on Raj Thackeray by Sanjay Awate

ग्राउंड अॅनॅलिसिस : राज की बात!

संजय आवटे | Update - Apr 18, 2019, 10:41 AM IST

राज ठाकरे त्या दिशेने तर चाललेले नाहीत?

 • Ground analysis on Raj Thackeray by Sanjay Awate

  “नरेंद्र मोदींना डोक्यावर घेऊन सर्वप्रथम नाचलात ते तुम्ही. आणि, आता मोदींच्या विरोधात सर्वात जास्त बोलत आहात, तेही तुम्हीच! नेमकं काय घडलं?”
  ... अमरावतीच्या अंबा फेस्टिव्हलमध्ये राज यांची प्रकट मुलाखत घेताना मी विचारलं. राज म्हणाले,
  हो! कारण आता मला कळून चुकलंय, नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही राष्ट्रीय आपत्ती आहे!

  मोदी आणि शहा ही राष्ट्रीय आपत्ती असेल वा नसेल, पण राज यांच्यासाठी मात्र ती इष्टापत्ती ठरली आहे!
  सध्याचं वातावरण बघा.


  नरेंद्र मोदींची सभा सुरू होते. मोदी महाराष्ट्रात असल्याने सगळी मराठी न्यूज चॅनल्स स्वाभाविकपणे ती सभा लाइव्ह दाखवू लागतात. पण, मध्येच अचानक ती सभा स्क्रीनवरून अदृश्य होते आणि राज ठाकरेंची लाइव्ह सभा दिसू लागते. ज्या वाहिन्यांनी मोदींची सभा अर्ध्यातून बंद केली, त्यांच्या मोदीप्रेमाविषयी काहीही शंका नसते. तरीही, राज यांच्याच सभेकडे जाण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय नसतो.

  असे आहे काय राज यांच्याकडे?
  भारताच्या इतिहासातील ही पहिली घटना असेल. ज्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा नाही, त्या पक्षाच्या सभा सर्वात लक्षणीय ठरताहेत. राज ठाकरेंच्या सभांना महाराष्ट्रभर उदंड प्रतिसाद मिळतो आहे. जिथे सभा आहे, तिथे तर विलक्षण गर्दी होतेच; पण टीव्हीवर, सोशल मीडियावर, सर्वत्र या सभांना मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. हा प्रतिसाद देणाऱ्यांमध्ये महिला आणि तरुण अर्थातच आघाडीवर आहेत. अशा महाराष्ट्रात राज सभा घेताहेत, जे या लोकसभा निवडणुकीमधील उत्तर प्रदेशनंतरचे सगळ्यात मोठे राज्य आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४२ जागा जिथे भाजप – शिवसेनेने जिंकल्या होत्या, तिथे राज ठाकरे एकच मुद्दा घेऊन उभे आहेत – “मोदी आणि शहा या जोडगोळीला पराभूत करा.” लोकशाही धोक्यात आहे, असे सांगत राज ठाकरे लाखोंच्या सभा घेत या जोडीला लाखोली वाहताहेत. कोणत्याही उमेदवाराच्या वा पक्षाच्या बाजूने ते बोलत नाहीत. मोदी आणि शहा वगळता अन्य कोणा नेत्याच्या वा पक्षाच्या विरोधात ते बोलत नाहीत. दूर कशाला, शिवसेना वा उद्धव ठाकरेंच्या विरोधात चकार शब्दही ते काढत नाहीत. (त्यामुळे, बोलता येत नाही आणि सहनही होत नाही, अशी स्थिती झाली आहे उद्धव ठाकरे यांची!) गंमत म्हणजे, हेच ते राज, ज्यांनी महाराष्ट्राला सर्वप्रथम मोदींचे गुणगान सांगितले. मोदी महाराष्ट्रात कोणाला ठाऊकही नव्हते, तेव्हा आपले सगळे आमदार (विधिमंडळ अधिवेशन सोडून) गुजरातेत नेऊन तिथला ‘विकास’ त्यांना दाखवणारे आणि नंतर त्या मॉडेलचं तोंड फाटेपर्यंत कौतुक करणारे राज ठाकरे आज मात्र मोदींच्या विरोधात बरसू लागले आहेत.

  राज ठाकरे हे बोलत असताना, महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये काय सुरू आहे? राधाकृष्ण विखे- पाटील हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते. विरोध तर सोडाच, आज विखे- पाटील भाजपचा प्रचार करण्यात गुंतले आहेत, एकीकडे भाजपचा प्रचार आणि तरीही काँग्रेसचे स्टार प्रचारक! दुसरीकडे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची पराभूत मानसिकता जाणवण्याइतकी ठळक आहे. कॉंग्रेसचे अन्य नेतेही मागच्या बाकांवर बसलेले आहेत. विश्वजित कदमांसारखे तरूण नेते बेपत्ता आहेत, तर सत्यजित तांबेंसारखे जे नेते काम करताहेत, त्यांनीही नामोहरम व्हावे, अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तडफेने रिंगणात उतरलीय हे खरे, पण त्यांच्या अनेक सिंहांना भाजपने आपल्या चारा छावणीत बांधून ठेवले आहे.


  अशावेळी राज ठाकरे येतात आणि या दोन्ही पक्षांना काय करता येऊ शकते किंवा काय करता येणे शक्य होते, याचा वस्तुपाठच देतात. राज यांच्या व्यक्तिमत्त्वात ‘एक्स फॅक्टर’ आहे. करिष्मा आहे. पण, मुद्दा तेवढाच नाही. मोदी आणि शहांंना ज्या पद्धतीने ते विरोध करत आहेत, तसा इतरांना गेल्या पाच वर्षांत करता आला नसता का? राज यांची बदललेली शैली लगेच लक्षात येते. नकला अथवा सवंग टिका करण्याऐवजी राज पुराव्यांसह पुढे येतात. ‘प्रेझेंटेशन’च्या धाटणीत आपले भाषण करतात. मुद्दा मांडतात आणि संबंधित व्हिडिओ, व्हिज्युअल्स सादर करतात. एवढेच नाही फक्त, ‘इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम’च्या शैलीत स्टिंग ऑपरेशन करतात, पर्दाफाश करतात. सध्याच्या सोशल मीडियाने व्यापलेल्या या वातावरणात अशी शैली अपिल होणे अगदीच स्वाभाविक आहे. ‘पोलिटिकल कम्युनिकेशन’ म्हणून राज यांच्या या संवादशैलीचा विचार करायला हवा. राज कितीही लोकप्रिय वक्ते असले तरी लोकांचा ‘ऍटेंशन स्पॅन’ कमी झालाय, हे समजण्याएवढे ते बुद्धिमान आहेत. अशा प्रेझेंटेशन्सचा, व्हिज्युअल्सचा, धक्कातंत्रांचा त्या अर्थानेही फायदा होतो.

  राजकीय रिंगणात राज आले, त्याच काळात साधारणपणे मराठी वृत्तवाहिन्या अवतरल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे हॅपनिंग नसताना, या दोघांनीच त्या कालावधीत एकमेकांची सोबत केली. राज यांच्या सभांमुळे वाहिन्यांनी टीआरपी मिळवला, तर राज यांचा चेहरा त्यामुळे महाराष्ट्राच्या ओळखीचा झाला. राज यांनी आपल्या धुंवाधार शैलीसह पहिल्याच फटक्यात १३ आमदार जिंकून दाखवले. नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राज यांचा बहर ओसरला आणि अस्तित्वापुढे प्रश्न निर्माण झालेली मनसे म्लान झाली. राज यांची तलवार म्यान झाली. ही निवडणूक तर अशी होती की जिच्याशी राज यांचा काही संबंध नव्हता. एकूण राजकारणातूनच ‘इरिलिव्हंट’ होत चाललेल्या राज यांनी या पोकळीतून जी संधी निर्माण केली, ती अभूतपूर्व आहे. अभिव्यक्तीचा प्राण घेणाऱ्या वातावरणातच विरोधकांना खरा प्राणवायू मिळत असतो. याला इतिहास साक्ष आहे. राज्य अथवा देश पातळीवरील विरोधकांना ही संधी हेरता आली नाही. राज यांनी ती पकडली. स्वतःच्या इंजिनाला हवे असणारे इंधन त्यांनी शिताफीने भरुन घेतले.

  लोकसभेचा निकाल काहीही लागला, तरी महाराष्ट्राच्या राजकारणात राज यांनी आपली जागा निश्चित केली आहे. हे ‘ठाकरे’ रूप खऱ्या शिवसैनिकांनाही आवडावंसं आहे. निवडणुकीच्या रिंगणात पक्ष नसतानाही राज सत्तेला प्रश्न विचारताहेत, यात लोकांना अंतर्विरोध काही वाटत नाही. कारण, आपण स्वतः निवडणुकीच्या राजकारणापासून, पदापासून दूर आहोत आणि लोकांच्या जे हिताचं आहे, ते कोणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलत आहोत, या ठाकरी बाण्याचंच तर गारूड लोकांवर आहे! हेतू आणि प्रामाणिकपणा या संदर्भानं राज यांना कोणतंही प्रमाणपत्र आताच देण्याचं कारण नाही. पण, ‘क्राउडपूलर’ राजची दखल घेणं टाळण्यातही अर्थ नाही.
  आज राज्याच्या राजकारणात (कोणत्याही पक्षाकडे) नेता नाही. मोदी महाराष्ट्रात आल्यानंतर शरद पवारांवरच टीका करतात. कारण, टीका करण्याइतपत पात्रतेचाही अन्य नेता त्यांना महाराष्ट्रात दिसत नसावा. शरद पवार यांच्यानंतरचा महाराष्ट्राचा नेता कोण? राष्ट्रवादी काँग्रेसकडे नेत्यांची कमतरता नाही. पण राज्याचा नेता होण्याच्या क्षमतेचे कोणी आज तरी नाही. कॉंग्रेसकडे तर नेताच नाही. भाजप – शिवसेना पुन्हा सत्तेत येतीलही, पण नेत्यांची पोकळी भरण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही. अशावेळी राज ठाकरे यांना असणारी संधी त्यांच्या लक्षात आली असावी. शिवाय, २००९ च्या निवडणुकीतील हे राज नाहीत. गेल्या दहा वर्षांत त्यांनी बरेच जग पाहिले आहे. उदंड अपयश पचवले आहे आणि नकाराला तोंड दिले आहे. त्यामुळे त्यांची भाषा बदलली आहे. टोन बदलला आहे.

  महाराष्ट्राचे राजकारणही बदलू पाहाते आहे. शिवसेनेची स्पेस वरचेवर आक्रसू लागली आहे. आक्रमक उत्स्फूर्तता हेच व्यवच्छेदक वैशिष्ट्य असणारी शिवसेना कधी नव्हे एवढी बिचारी आणि ‘कॅल्क्युलेटेड’ झाल्याचे ‘परसेप्शन’ आहे!. करिष्मा असणारे नेतृत्व तर शिवसेनेच्या एकचालकानुवर्ती गाभ्यातच अनुस्यूत आहे. आज सेनेकडे तेही नाही. सोबत करणारा भाजपच शिवसेनेची स्पेस बळकावतो आहे. राष्ट्रवादीलाही ती स्पेस हवी आहे. अशावेळी एका ठोस प्रादेशिक पक्षाची जागा रिकामी आहे.
  राज ठाकरे त्या दिशेने तर चाललेले नाहीत?

Trending