आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजही वरईचा भात अन् लाल मुंगळ्यांची चटणी हे अन्न असलेल्या माडियांचा सवाल, दादा, झेंडा इतेक बताल?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रामपंचायत कागदावर, ग्रामसेवक तालुक्याला; गेल्या ७० वर्षांत ना रस्ता झाला ना वीज पोहोचली; शाळा, दवाखाना तर दूर की बात - Divya Marathi
ग्रामपंचायत कागदावर, ग्रामसेवक तालुक्याला; गेल्या ७० वर्षांत ना रस्ता झाला ना वीज पोहोचली; शाळा, दवाखाना तर दूर की बात

गडचिराेली जिल्ह्यातील आबुझमाडचे जंगल. या घनदाट जंगलातून २२ किमीची पायपीट, होडक्यातून नदीपार करत दिव्य मराठी प्रतिनिधी दीप्ती राऊत यांनी केलेला झेंडा न पाहिलेल्या कुवाकोडी गावाचा ग्राउंड रिपोर्ट...


आबुझमाडच्या जंगलातल्या कुवाकोडी गावात कुणाला ना झेंडा माहीत आहे, ना स्वातंत्र्यदिन. आठ किमीवरच्या बिनागुंडाला भामरागडचे तहसीलदार एकदा गेले. पण त्यापलीकडच्या कुवाकोडी, तुरेमरका, धामनमरका, पुंगासूर आणि पेरमलभट्टी या गावांमध्ये मात्र भारतीय प्रशासन व्यवस्थेतली एकही व्यक्ती गेल्या ७१ वर्षांत पोहोचलेली नाही. गडचिरोली आणि छत्तीसगडच्या नारायणपूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील ही गावं. विशेष म्हणजे, कुमनारसारख्या इथल्या काही गावांची तर सरकारदरबारी नोंदही नव्हती.   


अंगात जुनाट हाफ पँट, मळका शर्ट, भरपूर चालीनं कालवलेला चेहरा, पिंजारलेले केस आणि खांद्यावरच्या दांड्याला लटकवलेल्या दोन पिशव्या. या अवतारात तीस वर्षांचे बुद्राम हुसेंडी भराभर पावलं उचलत होते. बारा किलोमीटरवरच्या लाहेरीतल्या दुकानातून तेलमीठ घेऊन ते गावाकडे निघाले होते. तुमचं शिक्षण किती झालं, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह अधिकच गडद झालं. कधी मोटारसायकल तर कधी होडकं असा प्रवास करत या परिसरात पोहोचलेले एकमेव लोकप्रतिनिधी म्हणजे भामरागड गोटूल पारंपरिक इलाका समितीचे गडचिरोली जिल्हा परिषद सदस्य अॅड. लालसू नागोटी मध्ये पडले. त्या प्रश्नाचं माडियात भाषांतर करून त्यांनी उत्तर मिळवलं, शाळेतच गेलो नाही. दुसरा प्रश्न होता गावातल्या झेंडावंदनाचा. तेवढाच निर्विकार चेहरा ठेवून बुद्रामनं पुन्हा प्रश्न केला, दादा, झेंडा इतेक बताल? अॅड. लालसूंनी त्याचं मराठी रूपांतर सांगितलं, दादा, झेंडा म्हणजे काय रे भाऊ?    


अतिमागास जमातींपैकी माडिया आदिवासींची ही गावं. काही वर्षांपूर्वी नजीकच्या बिनागुंडीला ग्रामसेवकानं बोलावून दिलेली घरांवरची कौलं आणि बायकांच्या अंगातल्या चोळ्या हीच काय ती या गावाच्या विकासाची एकमेव खूण. जंगलातला एक तुकडा कुऱ्हाडीनंच साफ करून वरई फेकून स्थलांतरित शेती करणे हे यांच्या उपजीविकेचं एकमेव साधन. पोटापुरतं पिकवायचं ही आदिम रीत. कोसरी म्हणजे वरईचा भात आणि लाइंग म्हणजे लाल मुंगळ्यांची चटणी हाच मुख्य आहार. वरई संपली की जंगलातले बांबूचे कोंब, झाडपाला आणि शिकार केलेल्या प्राण्यांचं सुकवलेलं मांस हाच पोटाचा आधार. या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी आजही रस्ता नाही की गावात वीज नाही. 


रेशन घ्यायचं तर २२ किलोमीटरवरच्या लाहेरीपर्यंत पायपीट करायची. जानेवारीत स्वत: रस्ता तयार करून रेशनचा ट्रक बिनागुंडापर्यंत आणायचा. कधीतरी मिळणाऱ्या रॉकेलवर एक बत्ती मिणमिणत वापरायची. ते संपलं की सारा कारभार चुलीतल्या विस्तवावर. बत्तीच्या प्रकाशात अभ्यासाची सोय असलेली विनोबा आश्रमशाळा हा इथल्या मुलांच्या विकासाचा एकमेव आशेचा मार्ग. बाकी सारा परिसर अतिदुर्गम आणि अतिमागास. कुवाकोडी ग्रामपंचायतीअंतर्गत येणारी तुरेमरका, धामनमरका, पुंगासूर आणि पेरमलभट्टी या पाच गावांपर्यंत विकास अजून पोहोचलेला नाही. ही ग्रामपंचायत आहे ती ही फक्त कागदावर आणि ग्रामसेवक राहतात तालुक्याच्या भामरागडला. 


नागपूरहून बसने १७० किलोमीटर भामरागड, भामरागडहून १४ किलोमीटर मोटारसायकल आणि ओडा नदी ओलांडून त्यापलीकडे घनदाट जंगल तुडवत, पहाडी पार परत, नदीनाले ओलांडून तब्बल २२ किलोमीटरची पायपीट केल्यावर कुवाकोडी गाव लागतं. १५ माडिया कुटुंबांच्या ८० डोक्यांची वस्ती. लाकडाच्या ओंडकेवजा होडकीतून ओडा नदी पार परत असताना इरपा पोदारी, बुद्राम हुसेडी आणि बोधू मोर हे इथले तिघे भेटले. हिंदी जेमतेम येत होती. मराठी कळतही नव्हती. बोधूनं एकदा गडचिरोली बघितल्याचं सांगितलं. 


लाहेरीहून गावठी कट्ट्याचे छर्रे आणताना पोलिसांनी त्याला अटक केली होती. अस्वलाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी त्याच्याकडे गावठी बंदूक होती. अस्वलाच्या हल्ल्यात कायमचा जीव गमवायचा की पोलिसांच्या अटकेमुळे जेलमध्ये सव्वा वर्ष काढून जीव वाचवायचा, या पर्यायांपैकी जगण्याची थोडी जास्त शाश्वती असलेेला दुसरा पर्याय त्यानं निवडला होता. 

 

पुढील स्लाइडवक क्लिक करून वाचा संबंधीतांच्या प्रक्रीया...

बातम्या आणखी आहेत...