आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल्‍लारी भूकंपाची 25 वर्षे : घाेषणा आदर्श शहराची, श्रेयाच्या घाईमुळे किमान पुनर्वसनही राहिले अपुरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूज (गुजरात), किल्लारी - २५ वर्षांपूर्वी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात झालेला भूकंप म्हणजे त्या वेळची सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती. त्यातून सावरणे आणि पुनर्वसन करणे हे एक मोठे आव्हान होते. ते राज्य सरकारने एनजीओंच्या मदतीने उत्तमरीत्या पेलले, असे त्या वेळी म्हटले जात होते. पण किल्लारीनंतर ७ वर्षांनी किल्लारीपेक्षाही भीषण भूकंप झालेल्या भूजकडे एकदा पाहिले की किल्लारी भूकंपानंतरच्या स्थितीची कीव येते. यात गुजरात सरकारपेक्षा गुजराती माणसाचे कौतुक आहे. हा दोन समूहांच्या मानसिकतेतला फरक आहे. गुजरात पुढे का आणि मराठवाडा मागे का, याचे उत्तर या दोन भूकंपग्रस्त भागांच्या तुलनेतून आपोआपच मिळते. ‘दिव्य मराठी’ टीमने केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट.

 

किल्लारी : रोज भूकंपाच्या स्मृती

दत्ता सांगळे/साजिद पठाण | किल्लारी
भूकंप होऊन पाव शतक लोटले. नवी पिढी कर्ती धर्ती झाली. तरीही किल्लारी आणि परिसरातील ग्रामस्थांच्या मनातून भूकंप घर करून आहे. त्याला कारण त्या आघाताच्या स्मृतींना रोज उजाळा मिळेल, अशीच व्यवस्था तिथे करून ठेवली आहे. नवी गावे वसवताना सरकारी पद्धतीने ठोकळेबाज उत्तरे शोधली गेली. सरकारी पद्धतीनेच ती थोपली गेली. त्यामुळे तिथे घरांऐवजी उभे राहिले चार भिंतींचे खोके. घरपण नसेल तर गावपण कुठून येणार? त्यामुळे पुनर्वसित गावे म्हणजे खोक्यांनी भरलेले कंटेनर बनले आहेत. अनेक गावांना ना रस्ते बनले ना पाणी मिळाले. पुनर्वसित घरांचीही दुरवस्था झाली आहे. अर्थात, यंत्रणेसह इथल्या लोकांची मानसिकताही त्याला कारण आहेच.

 

भूज : लोकसहभागामुळे किल्लारीपेक्षा सरस

मंदार जोशी | भूज (गुजरात)
पिण्याच्या पाण्याचा कोणताही स्रोत नाही. अर्धा जिल्हा समुद्राने वेढलेला, तर उर्वरित हद्दीतील बहुतांश सरहद्दीला पाकिस्तान डोळे वटारून बसलेला. अशा अवस्थेत २६ जानेवारी २००१ च्या सकाळी भूकंप झाला आणि वाचलेले रहिवासी समस्यांनी ग्रासलेला कच्छ जिल्हा सोडून जाण्याच्या तयारीला लागले. पण ‘या संकटाला संधी बनवायची’ या जिद्दीने तिथले प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था कामाला लागल्या आणि पुनर्वसनाचा ‘भूज’ पॅटर्न तयार झाला. लोकसहभाग हे त्याचे मुख्य तत्त्व होते जे किल्लारीत पाळलेच गेले नाही. त्यामुळे आज भूज आणि परिसर म्हणजे नवे विश्व आहे, ज्याने भूकंपाच्या आठवणी कधीच विस्मृतीत ढकलून दिल्या आहेत.

 

नेमके काय घडले होते...

१९९३ मध्ये आजच्या दिवशी लातूर जिल्हा भूकंपाने हादरला होता. ६.४ रिश्टर अशी भूकंपाची नोंद करण्यात आली होती. भूकंपाचा धक्का पहाटे चारच्या सुमारास बसला होता. लातूरकर गाढ झोपेत असताना हा धक्का बसला होता. भूकंपात सुमारे २० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. ३० हजारावर लोक जखमी झाले होते. सामान्यपणे भूकंप पृथ्वीमधील दोन प्लेटमध्ये झालेल्या टकरीमुळे होतो, असे गृहितक मान्यता पावलेले आहे. मात्र, लातूरच्या भूकंपाचे नेमके कारण संशोधकांना सापडलेले नाही. कोट्यवधी वर्षांपूर्वी भारत आफ्रिकेपासून तुटला व पुन्हा हजारो वर्षे समुद्रात तरंगल्यानंतर आशियाई प्लेटशी त्याची धडक झाली.

 

विशेष : भारतीय प्लेट आजही आशियाई प्लेटला दाबणारी आहे. त्याचा परिणाम हिमालयाच्या उंचीवर होत आहे. लातूरमधील भूकंप अशाच भूगर्भीय हालचालींतून झाला होता, असा संशोधकांचा अंदाज आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, किल्‍लारी व भूज येथील स्थितीतील फरक...
 

 

बातम्या आणखी आहेत...