आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ground Report On Aurangabad Central Constituency Assembly Election 2019 Analysis

तनवाणी कामाला लागल्याने गुलमंडी बिंधास्त, नौबत दरवाजा, आपल्या मतांबद्दल आश्वस्त, बुढीलेनचा ''अभी देखते है'' मूड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिष्ठा पणाला असलेला, युतीमुळे पुन्हा संधी निर्माण झालेला, वंचित, राष्ट्रवादी बरोबरच अपक्षांचेही अस्तित्व असलेला मतदार संघ, म्हणजे मध्य. सर्वांचे लक्ष मध्य मध्ये आणि मध्य मधील लोकांचे पूर्व-पश्चिमवर, असेही चित्र आहे. गेल्यावेळी विरोधात लढलेले एकत्र आहेत, जिंकलेले आपसात भांडत आहेत आणि तेव्हा अस्तित्वात नसलेले यावेळी जोर लावत आहेत. राजकीय 'जोडजंतर'चे कौशल्य दाखवणा-याच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे निश्चित.  एक फेरफटका..  मध्ये मतदार संघात १ लाख ६७ हजार २२६ पुरूष मतदार, १ लाख ५७ हजार ४३६ स्त्री, असे एकूण ३ लाख २४ हजार ६६२ मतदार आहेत. मात्र या स्त्री-पुरूष मतदारांच्या आकडेवारीला गुलमंडीत विशेष महत्व नाही. येथे दोन समिकरणे आहेत. पहिले -  दीढ लाख हिंदू मते, १ लाख २० हजार मुस्लिम आणि उरलेले इतर. आपली ( हिंदू) वोटींग जास्त करून घेतली तर सीट शूअर, हे गुलमंडीतील पानटपरीवरील गणित. तर दुसरे - ''किशू काम कररा ना पिया का'' बस फिर सीट शूअर, हा मराठा हॉटेल पुढील गप्पा गटाचा निकाल. गुलमंडी सध्या बिंधास्त आहे.    पुढे आम्ही पानदरीबा मार्गे शाहागंजहून नौबत दरवाजाला पोहोचलो. शेजारीच असलेल्या पानटपरीवर 'काय म्हणतंय मध्य ?' या प्रश्नाला जैस्वाल येते, हे स्पष्ट उत्तर मिळाले. भुईगळ यांच्या कार्यलयाजवळच्या परिसरात असल्याने आम्ही, अमितचे काय विचारले. अमितला त्याची मतं पक्की मिळणार. पण बाकी मतं कुठून आणणार असा सवाल आला.  तिथून आम्ही आमखास मैदान गाठले. साडे सहा वाजले होते. अंधार पडला तरीही फुटबॉल खेळाडूंना मार्गदर्शन सुरू होते. शेजारीच   अॅड. प्रकाश आंबेडकारांच्या सभेसाठी लोक जमत होते. अजून मैदान रिकामेच. त्यात एक युवक-युवती नजरेस पडले. वंचितचे उपरणे गळ्यात घातलेले. पहिलेच मतदान असेल का ? या प्रश्नाला होकारार्थी उत्तर आले. पण माझं मतदान यवतमाळमध्ये आहे, असे युवक खरमुरे खात म्हणाला. ( विदर्भात खारे दाणे म्हणत नाहीत )  'फक्त बाळासाहेबांना ऐकायला आलो', हे सांगताना त्याच्या डोळ्यात वेगळी चमक होती. कदाचित ती चमक अपेक्षांचीही असेल. सभेला वेळ होणार हे पाहून आम्ही मोर्चा हर्सूलकडे वळवला. सर्वत्र शांतता असल्याने आम्ही टीव्ही सेंटरला आलो. येथे कारेगाव भीमा प्रकरणावरून प्रदीप जैस्वाल यांच्याविषयी काहींची नाराजी दिसली. तर व्यापारी बाजूने जाणवले. पण स्पष्ट मत व्यक्त करत नव्हते. गेल्यावेळी गेलेली जागा परत येऊ शकते असा सूर होता. यातील 'गेलेली' आणि 'येऊ शकते' हे शब्द त्यांचा कल सांगत होते. तिथून पुन्हा आमखास गाठले. मैदान फुल्ल. टेम्पोमधून महिला अजुनही उतरत होत्या. पुढे बुढीलेन या भागात पोहोचलो. कदीर मौलाना यांचे कार्यालय ओलांडून इराणी चहा घ्यायला थांबलो. नासेर सिद्दीकी यांचे पोस्टर गल्ल्यावर बसलेल्याच्या मागेच लागलेले होते. एमआयएम समर्थकाकडून त्यांची बाजू समजेल असे वाटले. पण येथे मिळालेले आगाध ज्ञान सियासत और हकीकत समजावणारे होते.चहा पेक्षा विक्रेताच गरम होता. इम्तियाज भाई की सीट है तो नासेर भाई को फायदा होगा.. या प्रश्न वजा स्टेटमेंटची क्षणात 'धज्जीया' उडाली. कायका चुल्ले का फायदा ? कुरेशी कु रॅली मे बेइज्जत करे, नासेर भाई खासदार के कान के निच्चे के है, इन्ने उप्पर का. तो काट दिए तिकीट. अब सिल्लेखाना के वोट जैस्वाल कु जाते. और रात बे रात, पुलिस-बिलिस मे काम कु आता उन्ने.'' और खासदार साब ? आम्ही विचारले.  साब देखो उने गुटखा बंद कर दिए, कलब बंद कररे. कित्ते बच्चो का नुकसान हो गया. इधर दो नंबर का धंदा एक नंबर पे है. सियासत मे एक ऑंख बंद करके चलना पडता. इनो बडी बडी आंख्या फाडते. और एक बात, अब मौलाना खडे रहे. कोनते वोट लिंगे वो ? बस समझ जाओ तुम.   आतापर्यंतच्या फेरफटक्यातील सर्वात मोठे ज्ञान घेऊन आम्ही लोटाकारंजा येथे पालिका संकुला जवळ आलो. पूर्वी येथे शहराचे मटण मार्केट होते. येथे विचारले तर, अभी कुछ नही, एन्ड मे देखेंगे' असे उत्तर मिळाले.  खडकेश्वरकडे निघालो तर सांस्कृतिक मैदान रोडवरील प्रचंड धूळ रस्ता रोखून होती. मार्ग बदलून 'झलक'ला पोहोचलो. येथील 'सैनिकां'ना मध्य  पेक्षा पूर्व, पश्चिमची चिंता वाटत होती. इतर ठिकाणीही साधारण हीच स्थिती. सूपवर ताव मारताना, अॅड.अभय टाकसाळ यांच्या प्रचाराच्या तीन गाड्या गेल्या. आकर्षक, दणदणीत गाण्यांनी, हॉटेलमधील सर्वांचेच लक्ष वेधले. तिथून पुढे कीर्ती शिंदे यांच्या कार्यालयातील उपस्थितीही लक्षवेधी होती. एकुणच काय तर ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत मतदान घडवून आणण्याचा युतीचा प्रयत्न आहे. एकत्र असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अधिक आहे. तर वंचित आणि एमआयएमला हक्काची मते खुणावत आहेत. राष्ट्रवादीने प्रचारात जोर लावलाय तर अपक्षही मतांना सुरूंग लावणार आहेत. त्यामुळे इराणी चहाच्या अगाध ज्ञानातील आणखी एक वाक्य महत्वाचे आहे.' सियासत मे कँडीडेट बैठाना पडता, खडे भी करना पडता, समझाना भी पडता और समझदारी भी दिखाना पडता' ये हकीकत जो समझा वो जिता.''  

बातम्या आणखी आहेत...