आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घृष्णेश्वर साखर कारखान्याकडे सव्वातीन कोटींचा अकृषक उपकर थकीत; रक्कम सात दिवसांच्या आत भरण्याची नोटीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद- खुलताबाद तालुक्यातील गदाना खतनापूर येथील घृष्णेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेडकडे अकृषक करापोटी तब्बल ३ कोटी २४ लाख २३ हजार ६१० रुपये थकीत आहेत. ही रक्कम सात दिवसांच्या आत भरण्याची नोटीस खुलतबादच्या तहसीलदारांनी बजावली असून थकीत रक्कम न भरण्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

 
मुख्य प्रवर्तक अशोक पाटील यांच्या घृष्णेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेडकडून शासनाला देय असलेली सुमारे सव्वातीन कोटींचा उपकर अनेक वर्षांपासून थकीत आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी तहसीलदार राहुल गायकवाड यांनी २४ डिसेंबर २०१८ रोटी नोटीस बजावली आहे. साखर कारखान्याने सव्वा तीन कोटी थकबाकी न भरल्यास कारवाई करण्याचा इशाराही तहसील प्रशासनाने दिला आहे. 

 

घृष्णेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड हा कारखाना माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर यांनी उभारला होता. २० सप्टेंबर १९९४ रोजी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते कारखान्याचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण करण्यात आले होते. उदघाटनानंतरही हा कारखाना काही कारणाने सुरू झाला नव्हता. शेवटी हा कारखाना खासगी उद्योजकांनी विकत घेतला. २०१७ नंतर या कारखान्यात गळीत हंगाम सुरू झाला कारखाना उभारणीनंतर कारखानदारांनी प्रशासनाच्या अकृषक देयकाकडे लक्ष दिले नाही व कोणत्याही तहसीलदारासह इतर अधिकाऱ्यांनी अकृषक देयकाची कारखानदाराकडे आजपर्यंत मागणीही केली नाही. त्यामुळे कराचा आकडा फुगत गेला. नव्याने रुजू झालेले तहसीलदार राहुल गायकवाड यांनी तहसील कार्यालयाचे कामकाज हाती घेतल्यानंतर लगेच गदाना खतनापूर येथील घृष्णेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेडने अकृषक करापोटी देयक दिली की नाही याकडे लक्ष केंद्रित केले. त गायकवाड यांनी अधिक माहिती जाणून घेतली असता कारखान्याकडे ३ कोटी पेक्षा जास्त रक्कम थकबाकी असल्याचे समोर आले. तहसीलदार राहुल गायकवाड यांनी तत्काळ घृष्णेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याला ३ कोटी २४ लाख २३ हजार ६१० रुपये सात दिवसांच्या आत थकबाकी भरण्यासंबंधीची नोटीस बजावली. एवढ्या मोठ्या रकमेची नोटीस आजपर्यंत प्रशासनाच्या वतीने बजावण्यात आली नव्हती. या मोठ्या रकमेची नोटीस बजावण्याची खुलताबाद तालुक्यातील ही पहिलीच वेळ आहे. 

 

काजळीने लोकांना आरोग्याची काळजी 
हा साखर कारखाना खासगी उद्योजकाने घेतल्यानंतर या कारखान्यात खुलताबाद तालुक्यासह गंगापूर तालुक्यातून ऊस गाळपासाठी येत आहे. या कारखान्याच्या धुरांड्यातून बाहेर पडणाऱ्या काजळीमुळे विरमगाव, देवळाना, राजेराय टाकळी, गदाना या गावांसह परिसरातील गावांत प्रदूषण निर्माण होत आहे. गावात घरासमोर उभे केलेल्या वहानांवर काजळीचे थर जमा होत असल्याने वाहने रोजच धुवावे लागतात. अंगणात वाळू घातलेल्या कपड्यांवरही काजळी साचते. शिवाय या काजळीने लोकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कारखान्यातील सांडपाणीही उघड्यावरच सोडले जात असल्याने प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. 

 

महसूल अधिनियमानुसारच नोटीस 
गदाना खतनापूर येथील घृष्णेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेडने साखर कारखान्याकडे अकृषक करापोटी शासनास देय रक्कम ३ कोटी २४ लाखा पेक्षा जास्त थकबाकी आहे. ही थकबाकी शासनाकडे भरणा करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १७४ नुसार मुख्य प्रवर्तकांना नोटीस दिली आहे. रक्कम न भरल्यास पुढील कार्यवाही केली जाईल. राहुल गायकवाड, तहसीलदार, खुलताबाद 

 

दीड किमीपर्यंत प्रदूषण 
गदाना खतनापूर येथील घृष्णेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखाना हा माझ्या गावापासून दीड कि.मी.वर आहे. बाॅयलरमधून बाहेर पडणाऱ्या काजळीमुळे वाहने आणि घरे काळवंडत आहेत. विरमगाव, गदाना, देवळाना, राजेराय टाकळी या गावातील रहिवासी काजळीने हैराण झाले आहेत. गणेश नाना आधाने, उपसभापती, पंचायत समिती 

बातम्या आणखी आहेत...