आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी नोंदणीत सवलतीचा २० लाख व्यापाऱ्यांना फायदा ...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझिनेस डेस्क- नकारात्मक आर्थिक आकडेवारी आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या वतीने (एफपीआय) करण्यात आलेल्या विक्रीमुळे गेल्या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून ७०.३८ या पातळीवर आला. नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनात केवळ ०.५ टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच निर्मिती क्षेत्रातील घडामोडींमध्ये घट झाली आहे. सीएसओने जीडीपी वाढीचा अंदाज ७.४ टक्क्यांवरून कमी करून ७.२ टक्के केला आहे. डिसेंबरमध्ये गाड्यांची विक्री कमी झाली. ग्रामीण मागणी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील पीएमआय डिसेंबरमध्ये वाढला असला तरी त्याची गती कमी झाली आहे. जीएसटी परिषदेने छोट्या निर्मिती कंपन्यांसाठी जीएसटीमध्ये नोंदणी करण्याची मर्यादा २० लाखांवरून ४० लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे २० लाख व्यापाऱ्यांना फायदा मिळण्याची शक्यता आहे.  


इन्फोसिसबाबत गुंतवणूकदार सकारात्मक  
इन्फोसिसने अॉक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये नफ्यात २९.६२ टक्के घट झाली असल्याची माहिती दिली आहे. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेमध्ये नफा १२.२ टक्के कमी झाला आहे. वास्तविक डिसेंबर तिमाहीमध्ये महसूलवाढ चांगली झाली होती. ही २०.३ टक्क्यांनी वाढून २१,४०० कोटी रुपये झाली होती. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत महसूल ३.८ टक्के वाढला आहे. डॉलरच्या दृष्टीने पाहिल्यास महसूल वार्षिक आधारावर १०.१ टक्के आणि तिमाही आधारावर २.७ टक्के वाढला आहे. पनाया आणि स्कावा ही नफ्यातील घसरणीची दोन कारणे आहेत. त्यांची संपत्ती वेगळी केल्याने कंपनीचा नफा ५३९ कोटी रुपयांनी कमी झाला आहे. रेव्हेन्यू गायडन्ससंदर्भात गुंतवणूकदार सकारात्मक आहेत.


टीसीएसचे ऑपरेटिंग मार्जिन कमी झाल्याने निराशा 
भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने आतापर्यंत विक्रमी नफा कमावला आहे, असे असले तरी गुंतवणूकदार निराश आहेत. डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीने ८१०५ कोटी रुपयांचा नफा नोंदवला हाेता. महसूल २०.८ टक्क्यांनी वाढून ३७,३३८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या १४ तिमाहींमध्ये झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. डॉलरच्या दृष्टीने पाहिल्यास महसुलात १२.१ टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत यामध्ये १.८ टक्के वाढ झाली. ऑपरेटिंग मार्जिन ०.९ टक्क्यांवरून कमी होऊन २५.६ टक्क्यांवर आहे. गुंतवणूकदारांसाठी हे निराशेचे मोठे कारण आहे. यामुळे निकालाच्या दिवशी शेअरमध्ये घसरण झाली होती. असे असले तरी वर्षभरात  वाढ १० टक्क्यांपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.


गृह फायनान्स खरेदीमुळे बंधन बँकेच्या शेअरमध्ये घसरण 
बंधन बँकेने गृह फायनान्स लिमिटेडला खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर सोमवारी बँकेच्या शेअरमध्ये ६ टक्क्यांची घसरण झाली. विलीनीकरणासाठी गृह फायनान्सच्या ५ शेअरच्या बदल्यात बंधन बँकेचे २.८४ शेअर मिळतील. बंधन बँकेने त्यासाठी मोठी किंमत मोजली असल्याची चर्चा आहे. बंधन बँकेने संचालकांची भागीदारी कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने या प्रकरणात बँकेवर काही बंधने घातलेली आहेत. करार झाल्यानंतर बंधन बँकेत संचालकांची भागीदारी ८२.३० टक्क्यांवरून ६१ टक्के राहील. वास्तविक रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ही भागीदारी ४० टक्क्यांवर आणायची आहे. गृह फायनान्समध्ये एचडीएफसीची ५७.८ टक्के भागीदारी होती.

बातम्या आणखी आहेत...