आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री पुन्हा रस्त्यावर, वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी विक्रेत्यांना तंबी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 अमरावती - शहरातील विविध ठिकाणांसह इतवारा भाजीबाजारातील स्वच्छतेची पाहणी शुक्रवार, दि. १६ नोव्हेंबरला पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केली. त्यावेळी भाजी बाजारात दुकाने सोडून त्यापुढील जागेत थेट रस्त्यापर्यंत तंबू ठोकून भाज्या व इतर सामान विक्रेत्यांनी सजवून ठेवलेले दिसले. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्याचे कळल्यानंतर पालकमंत्र्यांनी भाजी बाजारातील दुकानदारांना दुकानाच्या आतच सामान ठेवण्याची तंबी दिली. यासोबतच बाजारात सर्वत्र घाण होत असते तेव्हा येथे नियमित स्वच्छता करावी, गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता काटेकोर करा, नगरसेवकांच्या तक्रारी लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करावी, स्वच्छतेच्या कामांत सातत्य ठेवावे, असे निर्देश मनपा आयुक्त संजय निपाणे यांना दिले. 

 

सुमारे एक महिना आधी शहरातील साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी शहरातील स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण दिवसभर मोहीम उघडून अस्वच्छतेसाठी जबाबदार मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. कंटेनरच्या बाहेर कचरा दिसायलाच नको, असे निर्देशही त्यांनी त्यावेळी दिले होते. यापुढे जर अस्वच्छता आढळली तर कोणाचीही गय करणार नाही, असे ठणकावत त्यांनी मी पुन्हा स्वच्छतेची पाहणी करणार, असेही त्याचवेळी कठोर शब्दांत सुनावले होते. त्यानुसार पालकमंत्र्यांनी आज स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे, पालिकेच्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी गणेश कुत्तरमारे, स्वच्छता निरीक्षक यावेळी उपस्थित होते. 


स्वच्छतेच्या ठेक्यासंदर्भात नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. स्वच्छतेच्या ठेक्यांची प्रक्रिया नव्याने राबवून तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असेही निर्देश त्यांनी मनपा प्रशासनाला दिले. यावेळी प्रभागाचे नगरसेवक, भाजीपाला विक्रेते, दुकानदार उपस्थित होते. 


अनेक ठिकाणी आढळला कचरा, सांडपाणी, अतिक्रमण : पाहणी दरम्यान शहरात जागोजागी अतिक्रमण, कचरा व सांडपाणी आढळले. त्यामुळे पालकमंत्र्यांनी नियमित स्वच्छता का केली जात नाही, याबद्दल मनपा अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. सोबतच स्वच्छतेच्या ठेक्याबाबतही माहिती घेतली. बाजारात सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याच नाहीत, ज्या आहेत त्या कचऱ्याने बुजलेल्या आहेत. तसेच काही बोअरिंग असून त्या बोअरिंगचे पाणी वाहून जाण्यासाठी नालीची सोय नसल्याने ते पाणी कचऱ्यात मिसळून दुर्गंधी निर्माण होते याकडेही पालकमंत्र्यांनी मनपा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून कारवाई करण्याचे निर्देश दिले. 


यापुढे जर अस्वच्छता आढळली तर कोणाचीही गय नाही­ : पालकमंत्री पोटे 
स्वच्छता पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांनी शुक्रवारी अमरावती शहरातील भाजी बाजार व इतवारा बाजारातील भागांची पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी दुकानासमोर सामान न लावण्याची तंबी विक्रेत्यांना दिली. 


बाजारातील सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी नाल्यांचे बांधकाम करण्याचे आदेश 
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. भाजीबाजार, इतवारा बाजारातील भाजीविक्रेत्या व दुकानदारांना कायमस्वरुपी सिमेंट-काँक्रिटचे ओटे बांधून द्यावे. सांडपाण्याची व्यवस्था होण्यासाठी नाल्यांचे बांधकाम करावे. सडक्या भाजीपाल्याची दुर्गंधी व मोकाट गुराढोरांचा वावर रोखण्यासाठी जागोजागी कंटेनर ठेवावे आणि त्याची नित्याने साफसफाई करावी. नागरिकांना येणे-जाणे सोयीचे व्हावे यासाठी भाजीपाला विक्रेता व दुकानदारांना साहित्य आपल्या जागेतच ठेवण्यास सूचित करावे. परिसरात स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे आदेश त्यांनी दिले. 


या भागांत केली स्वच्छतेची पाहणी 
स्वच्छता पाहणी दौऱ्यात शंकरनगर, फरशी स्टॉप, गौरक्षणाच्या बाजूचा दस्तुरनगर, शिवधारा नेत्रालय, जयभारतनगर चपराशीपुरा, बेलपुरा, रेल्वेस्टेशन, जुना कॉटन मार्केट रोड या परिसराची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भाजी बाजार व इतवारा बाजारातील भागांची पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यामुळे या सर्वच परिसरात वेगळेच वातावरण तयार झाले होते.ज्या भागात पालकमंत्र्यांनी दौरा केला तेथील स्वच्छतेची नेमकी स्थिती पालकमंत्र्यांनी बघितली. काही ठिकाणी तर गाडीतूनच त्यांनी स्वच्छतेचा आढावा घेतला

बातम्या आणखी आहेत...