आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Murder Case: Former BJP MP Dinu Solanki, Six Others Sentenced To Life Imprisonment

गुजरात हत्या प्रकरण : भाजपचे माजी खासदार दिनू सोळंकी, इतर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - माहितीचा अधिकार क्षेत्रातील (आरटीआय) कार्यकर्ते अॅड. अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी भाजपचे माजी खासदार दिनू बोघा सोळंकी आणि इतर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जेठवा हे गीर वन विभागातील अवैध खनन प्रकरणे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांची हत्या झाली होती. दिनू सोळंकी हे २००९ ते २०१४ यादरम्यान जुनागढचे खासदार होते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश के. एम. दवे यांनी हा निकाल देताना दिनू सोळंकी आणि त्यांचा पुतण्या शिवा यांना खून आणि कटप्रकरणी दोषी ठरवले. या दोघांना प्रत्येकी १५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. शिक्षा झालेल्यांत शैलेश पंड्या, बहादूरसिंह वढेर, पंचन जी. देसाई, संजय चौहान आणि उदाजी ठाकूर यांचा समावेश आहे. या सातही जणांना न्यायालयाने गेल्या शनिवारी दोषी ठरवले होते. 


गीर अभयारण्यात तसेच आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध खननाची माहिती आरटीआयद्वारे उघड केल्यानंतर जेठवा यांची हत्या झाली होती. या अवैध खननात सोळंकी कथितरीत्या सहभागी होते. जेठवा यांनी २०१० मध्ये या अवैध खननाच्या विरोधात एक जनहित याचिका दाखल केली होती. सोळंकी आणि त्यांच्या पुतण्याला या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले होते. अवैध खननात या दोघांचा सहभाग असल्याची अनेक कागदपत्रे जेठवा यांनी सादर केली होती. या याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच जेठवा यांची २० जुलै २०१० रोजी गुजरात उच्च न्यायालयाच्या बाहेर हत्या करण्यात आली होती. 


अॅड. जेठवा यांची उच्च न्यायालयाच्या बाहेर हत्या करण्यात आल्यानंतर गुजरातमध्ये मोठा गदारोळ उडाला होता. या प्रकरणात सत्ताधारी पक्षाचा खासदारच आरोपी असल्याने निष्पक्ष चौकशी होईल की नाही, अशीही शंका करण्यात आली होती. राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरुवातीला सोळंकी यांना क्लीन चिट दिली होती. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी सामाजिक क्षेत्रातून व्यक्त झाली होती. या मागणीसाठी उच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती. अखेर  उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. सीबीआयने २०१३ मध्ये हे प्रकरण हाती घेतले होते.

 

खटल्याचा प्रवास असा 
 सुरुवातीला अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी करून दिनू सोळंकी यांना क्लीन चिट दिली होती. तपासाबाबत असमाधान व्यक्त करताना उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. सीबीआयने नोव्हेंबर २०१३ मध्ये सोळंकी आणि इतर सहा जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. मे २०१६ मध्ये त्यांच्याविरोधात हत्या आणि गुन्हेगारी कटाचा आरोप ठेवण्यात आला होता. न्यायालयाने पहिल्या सुनावणीच्या वेळी १९६ साक्षीदारांची तपासणी केली. आरोपींनी धमकी दिल्यानंतर त्यापैकी १०५ जण उलटले होते. त्यानंतर जेठवा यांच्या वडिलांनी फेरसुनावणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.