आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या डाळीला १२१, तर स्थानिक तूरडाळीला ८५ रुपये किलोचा भाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्यात मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने येथील पिकांची स्थिती फारशी चांगली नाही. परिणामी उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असून स्थानिक पिकांच्या तुलनेत परराज्यातून आयात करण्यात आलेल्या पिकांना चांगला भाव मिळत आहे.

 
औरंगाबाद किरकोळ बाजारात स्थानिक तूरडाळीला ७७.५० ते ८५ रु. प्रतिकिलोचा भाव मिळत असतानाच गुजरातमधून आयात करण्यात आलेल्या तूरडाळीला १२१ रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. त्याचप्रमाणे मूगडाळ ८५ व १०७ रुपये, उडीद ५५ ते ७१.५० रुपयांचा दर मिळत असताना परराज्यातील याच डाळींना १११ रुपये भाव मिळत आहे. हरभरा ५५ वरून ६० ते ६५ रुपये, मसूर ६० ते ६१ रुपये, मटकी १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. 


मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ पडत आहे. तसेच कपाशी, सोयाबीन आणि मका हीच पिके प्राधान्याने घेतली जातात. तूर अांतरपीक म्हणून घेतले जाते. मूग, उडदासाठी जूनमध्ये पावसाचे वितरण बरोबर नसल्याने पेरणी अत्यल्प होऊन उत्पादनात प्रचंड घट होत आहे. ग्रामीण भागात गरजेपुरते उत्पादन तयार केले जाते. पण शहरातील लाखो ग्राहकांना स्थानिक ते विविध परराज्यांतील डाळीवर विसंबून राहावे लागते. सध्या बाजारात दुष्काळामुळे भाजीपाल्यांच्याच किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच डाळींच्या किमतीही वाढलेल्या आहेत.
 

पुढील काळातही दिसतील हवामानातील बदलाचे परिणाम
जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला तर मूग, उडदाची पेरणी करण्यास शेतकरी अधिक पुढाकार घेतात. पण हवामानात वेगाने व अनपेक्षित बदल होत आहेत. पर्जन्यमान अनिश्चित झाले आहे. जून व जुलैमध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. पावसातील खंड वाढले आहेत. खरिपाची पेरणी लांबली. यंदा मराठवाड्यात मूग ७० टक्के व उडीद ६९ टक्के पेरणी पूर्ण झाली असून पावसाच्या अभावामुळे उत्पादनात २५ टक्क्यांवर घट येण्याची शक्यता आहे. जे उत्पादित होईल, त्यावर शेतकरी प्रक्रिया करत नाहीत. तूर, मूग, उडीद, मटकी अखंड विक्री केली जाते. त्यामुळे बाजारात येणाऱ्या सर्व डाळी या बहुतांश व्यापाऱ्यांकडून आलेल्या असतात. यामध्ये उत्पादकांचे दुहेरी नुकसान होते. कारण प्रक्रिया केलेल्या शेतमालाला दुपटीने भाव मिळत आहे. याचा फायदा प्रक्रिया चालक व विक्रेत्यांना होत आहे. ग्राहकांना महागड्या डाळी खरेदी कराव्या लागतात. 
 

पाकीटबंद डाळी महाग 
सुपर शॉपी, किराणा, ठोक बाजार, मॉलमध्ये सुट्या व पाकीटबंद ब्रँडच्या डाळी उपलब्ध आहेत. खुल्या डाळीपेक्षा पाकीटबंद डाळींच्या किमतीत ४० ते ३० रुपये जास्त किंमत ग्राहकांना मोजावी लागते. 
 

बातम्या आणखी आहेत...