आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीड - सैनिकी विद्यालयातील शिक्षक साजेदअली अन्सार अली यांचा जुन्या वादातून खून करण्यात आला होता. या खुनाचा मास्टरमाइंड अन्वर खान ऊर्फ गुज्जर खान मिर्झाखान (वय ४०, रा. गुलशननगर, बीड) याला दरोडा प्रतिबंधक पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने गजाआड केले. ही माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. गुज्जरवर तब्बल २६ गुन्हे नोंद असून यातील बहुतांश खंडणीचे आहेत. दरम्यान, खुनानंतर पाच राज्यांत फिरलेला गुज्जर खान देशाबाहेर जाण्याच्या तयारीत होता. यासाठी त्याने अनेकांकडे खंडणी मागितली, यातीलच एकाने पोलिसांशी संपर्क केला अन् पोलिसांनी लावलेल्या जाळ्यात गुज्जर अडकला.
१९ सप्टेंबर रोजी येथील बालेपीर भागात शिक्षक सय्यद साजेद यांची हत्या करून पळून गेलेल्या गुज्जर खानच्या अटकेचे पोलिसांसमोर अाव्हान होते. या प्रकरणात १८ पैकी ११ आरोपींना पोलिसांनी अटक केली होते. परंतु, मुख्य आरोपी गुज्जर फरार होता. त्याला पकडण्यात अखेर ७ ऑक्टोबर रोजी यश आले. दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक गजानन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यास शहराजवळून अटक केली. दरम्यान, गुज्जर खान हा देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता. यासाठी त्याला पैशांची आवश्यकता असल्याने त्याने अनेकांकडे खंडणीचीही मागणी केली. बीडमधीलच एकाला त्याने मोठ्या रकमेची मागणी केली होती. संबंधित व्यक्तीने थेट पोलिसांना संपर्क केला, यानंतर एसपी हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुज्जरसाठी सापळा लावला अन् पैशांच्या आमिषाने तो थेट पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पाेलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस एसपी हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत, दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक गजानन जाधव यांची उपस्थिती होती.
असा पळाला गुज्जर खान
शिक्षक सय्यद साजेद यांच्या खुनानंतर गुज्जर खान नेकनूरहून लातूरमार्गे हैदराबादला पळून गेला. त्याच्या अटकेसाठी हैदराबादेतही बीड पोलिसांनी सापळा लावला होता; परंतु त्यातून तो निसटला. त्याने नंतर दिल्ली गाठली. तेथे तीन दिवस मुक्काम केल्यानंतर तो अजमेरला गेला. माऊंट अबूतून नंतर तो गुजरातमधील म्हैसाळा येथे पोहोचला. नंतर अहमदाबादेतून तो पुण्यात पोहोचला. जवळचे पैसे संपल्याने तो बीडकडे पैशाची तजवीज करण्यासाठी येत होता. मात्र, चऱ्हाटा फाट्यावर त्याला सापळा लावून पकडण्यात आले.
कट्टा, दोन काडतुसे जप्त
गुज्जरकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, चाकू जप्त करण्यात आला. अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक गजानन जाधव, सहायक निरीक्षक संदीप सावळे, पोहेकाॅँ. मनोज वाघ, अशोक दुबाले, राहुल शिंदे, महेश भागवत, संतोष म्हेत्रे, शेख आसेफ, चालक नारायण साबळे यांनी ही कारवाई केली.
सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
गुज्जर खानला न्यायालयात हजर केले असता त्यास १४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्या इतर फरार साथीदारांचा शोध सुरूच आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.