आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा राष्ट्रीय तर काँग्रेसचा स्थानिक मुद्दय़ांवर भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडोदा येथून उमेदवारी दाखल केल्यानंतर गुजरातेत नरेंद्र मोदींचे वारे वाहत आहे. बडोद्यात त्यांचा ‘रोड शो’ही यशस्वी झाला आणि हे स्पष्ट झाले की ते येथून विक्रमी मतांनी विजयी होतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व बडोद्यातून मोदींविरोधात निवडणूक लढवत असलेले मधुसूदन मिस्त्री एका चांगल्या लढवय्याप्रमाणे मोदी लाटेचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु येथील सर्वसामान्य मतदार आज तरी उघडपणे मोदींसोबत असल्याचे चित्र दिसत आहे.

बडोद्याच्या जवळच भरूच येथेही एक संघर्षपूर्ण लढत रंगली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचा मतदारसंघ असलेल्या भरूचमधून काँग्रेसने यंदा जयेश पटेल यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून येथून विद्यमान खासदार मनसुख वसावा यांनाच पुन्हा मैदानात उतरवले आहे. या लढतीत रंगत अशासाठी निर्माण झाली आहे की, काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या जयेश पाटील यांनी जर पटेल व अल्पसंख्याक समुदायाची मते मिळवली तर ते भाजपसाठी अडचणीचे ठरू शकते. अहमद पटेलांसाठीही ही जागा प्रतिष्ठेची असल्याने ते जयेश पटेलांच्या प्रचारासाठी जास्त वेळ देणार आहेत.

दक्षिण गुजरातच्या बारडोलीच्या जागेवर काँग्रेसने विद्यमान खासदार तुषार चौधरी हे उमेदवार असून त्यांची स्थिती थोडीशी सुधारल्याचे चित्र आहे. त्यांच्या विरोधात भाजपने प्रभूभाई वसावा यांना तिकिट दिले आहे. वसावा हे मूळचे काँग्रेस नेते असून काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.दक्षिण गुजरातमधील वलसाड मतदारसंघात भाजपचे के. के. सी. पटेल व काँग्रेसचे किशन पटेल यांच्यातही जोरदार चुरस आहे.

या निवडणुकीत गुजरातच्या अनेक भागातील मतदार अद्याप शांत आहेत. ते त्यांचा पाठिंबा कुणाला? हे उघड करू इच्छित नाहीत. परंतु त्यांना हे वास्तव स्वीकारण्यात जरादेखील संकोच वा भीती वाटत नाही की त्यांचे मत हे शेवटी मोदींनाच जाणार आहे. अल्पसंख्याक व आदिवासी भागांतील मतदारदेखील त्याचे मौन सोडायला तयार नाही. या भागांमध्ये एप्रिलच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात मोदींच्या दहा ते बारा निवडणूक सभा घेण्याचा भाजचा प्रयत्न आहे. पक्षाच्या राजकीय तज्ज्ञांच्या मते या सभांमुळे संपूर्ण गुजरात ‘मोदीमय’ होऊन जाईल.

राज्यात काँग्रेस व भाजपचे मुद्दे उत्तर ध्रूव आणि दक्षिण ध्रुवाइतके विरुद्ध टोकाचे वाटत आहेत. प्रचारात जास्तीत जास्त मुद्दे हे राष्ट्रीय स्तरावरील असावेत, हा भाजपचा प्रयत्न आहे. तर प्रचाराचा पूर्ण भर हा स्थानिक म्रुद्यांवरच असावा असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजप पाठिंबा मागत आहे. सोबतच भ्रष्टाचार, महागाई, अर्थव्यवस्थेतील सुधारणा आदी मुद्दे भाजपकडून प्रचारात आणले जात आहेत. तर काँग्रेसने गुजरातमधील भ्रष्टाचार, आपल्या उमेदवारांची प्रतिमा, जातीय समीकरणे यावर प्रचार केंद्रीत करत आहे. भाजपचा भर यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर आहे. डिसेंबर 2012 मध्ये झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत गुजरातेत 70 टक्के मतदान झाले होते. परंतु तीव्र उन्हाळा असल्याने आता मतदारांना घराबाहेर काढून केंद्रापर्यंत घेऊन जाण्याचे आव्हान दोन्ही पक्षांपुढे असेल.
लेखक गुजरातचे राज्य संपादक आहेत.