आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाणम आर्ट फेस्टिवल : दाक्षिणात्य सृजनबंड!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमचं जगणं घृणास्पद नाही, तुमची कला सत्वहिन नाही... तुमच्या जगण्यात परिवर्तनाची आस आहे, तुमच्या कलेत जगण्यातलं अवघं सौंदर्य एकवटलंय. या जगण्याला, त्यातून फुलणाऱ्या विचार आणि कलांना झाकू नका, त्यांचं झोकात दर्शन घडवा... असा दक्षिणेतल्या तमाम-शोषित-वंचितांनाआत्मविश्वास देणारा निर्माता-दिग्दर्शक-लेखक पा.रंजित. त्याच्या कल्पनेतून साकारलेला चेन्नईतला ‘वाणम फेस्टिवल’. फुले-डॉ. आंबेडकर- मार्क्स-पेरियार अशा  महानुभवांना समष्टीशी जोडणाऱ्या या महोत्सवाने दलितकेंद्री कलांचं नवंच सौंदर्यशास्त्र पुढे आणले. ब्राह्मणी राजकीय-सामाजिक व्यवस्थेविरोधातल्या सांस्कृतिक लढ्याचे पर्यायी मार्गही सुचवले.


कला हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक. वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून माणूस आपलं जगणं, भावविश्व नेहमीच मांडत आलाय. हे कला सादरीकरण बहुतांश वेळी सूख आणि दुःखाच्या जाणिवेतून घडतं, तर कधी कलेची मांडणी ही बंड, विद्रोहासारख्या धारदार स्वरूपातून व्यक्त होते. आजवर जगभरातल्या जितक्या ठिकाणी प्रस्थापित सत्ता, व्यवस्थेविरोधात लोक समूहांचे लढे उभे राहिले, त्यात कलामाध्यमांचं व एकूणच सांस्कृतिक राजकारणाचं अनन्यसाधारण महत्व राहिलंय. कारण, कलामाध्यम हे थेट सामन्यांच्या जाणीव-नेणिवेला हात घालत आली आहेत.


आपण राहतो, त्या समाजाच्या समस्या, प्रश्न, इतिहास या संदर्भात जनसामन्यांना काही माहिती नसतं, अशातला भाग नाही. पण त्या संबंधी काही ठोस कृती करायची, पावलं उचलायची त्यांच्यात पुरेशी इच्छाशक्ती नसते. इथं आपल्याला एका आरशाची आवश्यकता पडते. ज्यात समाजजीवनाचं प्रतिबिंब स्पष्टपणे दिसेल. याच टप्प्यावर कलामाध्यमं कामी येतात. कलामाध्यमं या समस्या, प्रश्न यावरील उपाययोजना सांगायच्या भानगडीत, पडत नाही. कलामाध्यमं फक्त त्या समस्या आहेत, तशा, विनासंकोच आपल्यापुढं मांडतात. एरवी, प्रश्नांची उत्तरं देणं नव्हे तर प्रश्न उपस्थित करणं हेच कलेचं उद्दिष्ट मानलं जातं. तेव्हा अपोआपच प्रश्नांची तीव्रता जनसामन्यांना जाणवते. आकडेवारी, लांबलचक विश्लेषणं, अहवाल यापेक्षा एक प्रभावी कलाकृती जनसमान्यांच्या जाणिवेचा चटकन पण तितक्याच ताकदीने ताबा घेते. असाच काहीसा अनुभव चेन्नईत भरलेल्या ‘वाणम आर्ट फेस्टिव्हल’ला भेट दिल्यावर आला.


तमीळभूमीत नव्यानं बहुजन सांस्कृतिक चळवळ उभारणाऱ्या पा. रंजितने हा कार्यक्रम आयोजित केलाय म्हटल्यावर, तर अपेक्षा उंचावल्या होत्या. आतमध्ये प्रवेश केल्यावरच बाबासाहेब आंबेडकरांचा एक मोठा, पुठ्यातून बनवलेला चेहराकृती पुतळा उभा केलेला होता. त्याखाली तमीळ मध्येच, ‘शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा त्यांचा तमाम शोषितांना उद्देशून दिलेला मूलमंत्र कोरलेला होता. चेन्नईतल्या सेंट एबस हायस्कूलमध्ये हा आर्ट फेस्टिव्हल सुरू होता. त्याचं प्रवेशद्वार मोठं विलक्षण, तितकचं कल्पकतेने बनवलं होतं. प्रवेशद्वाराच्या चहुबाजूंनावेष्टित एक बॅनर लागलं होतं. पण इतर समारंभासारखं त्यावर स्वागत, शुभेच्छा किंवा मान्यवरांच्या चेहऱ्यांची गर्दी असलं काहीएक नव्हतं. संपूर्ण पोस्टरभर होती, देशविदेशातील शोषितांच्या मूलभूत न्याय हक्कांसाठी अविरत संघर्ष करणाऱ्या महामानवांची नावं आणि त्याखाली त्यांच्या सह्या. मार्क्स, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरू होणारी ही शृंखला माल्कम एक्स, पाब्लो नेरूदा, फिडेल कॅस्ट्रो, चे गवेरा, मार्टिनल्युथर किंग यांना जोडत पेरियारांजवळ येऊन थांबते. याच नावांनी जगभरातल्या कष्टकरी, उपेक्षित वर्गाला एका नव्या, शोषणमुक्त जगाची स्वप्नं दाखवली. अन्याय विरुद्ध लढायला बळ दिलं. हे विलक्षण होतं. प्रवेशद्वार ओलांडून आत गेल्यावर प्रस्थापित सौंदर्यशास्त्र झिडकारून, एक नवं जग आपली वाट पाहत होतं. समाजातल्या एका उपेक्षित घटकांच्या नाना कलाविष्कारांचं जग! ज्या कलाविष्कारांना मुख्य प्रवाहाने कधी अनुल्लेखाने तर कधी अभीरूचीसारखी गोंडस विश्लेषण वापरत नाकारलं. 


‘वाणम आर्ट फेस्टिव्हल’ हा त्याच कलांचं सादरीकरण करण्यासाठीचा एक उपक्रम. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा आयोजक हा नव्या दमाचा आंबेडकरी दिग्दर्शक. ज्याने आपल्या ‘मद्रास’, ‘कबाली’, ‘काला’, ‘परियरुम पेरूमल’ सारख्या सिनेमांमधून आंबेडकरिझम, दलित असर्शन, शोषितांचं एकूणच जगणं पडद्यावर मांडून प्रस्थापित सिनेवर्तुळात खळबळ माजवली.   खरंतर भारतीय सिनेमात या गोष्टी इतक्या ताकदीने आणि प्रभावीपणे मांडणारा पा. रंजित हा अलीकडच्या काळातला पहिलाच सिने दिग्दर्शक. अमेरिकेतील ‘ब्लॅक आणि तिला पूरक असणारे ‘ब्लॅक’ सिनेमे या प्रेरणेतूनचं पा. रंजितनं ही स्वतंत्र दलित सिनेमांची मुहूर्तमेढ तामीळ सिनेमात रोवलीये.


खरंतर तामिळनाडूत आंबेडकरांचं सिम्बॉलिझम हे काही नवीन नाही. अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांची बॅनर्स आंबेडकरांच्या प्रतिमेशिवाय पूर्ण होत नाहीत. पण सिनेकला माध्यमातून मात्र आंबेडकर पहिल्यांदाच इथल्या नवीन पिढीसमोर मांडले जाताहेत. आंबेडकरी विचारधारा आणि त्यातल्या कलामूल्यांना द्रवीड सौंदर्यशास्त्राची जोड लावत एक आगळंवेगळं सांस्कृतिक समीकरण पा. रंजित इथं उभं करू पाहतोय.
...विस्तीर्ण पटांगणात शे-दोनशे तरुण मुलं-मुली हलगी वाजवत ‘जय भीम, जय पेरियार’च्या घोषणेने सारा परिसर दणानून टाकत होते. त्या गर्दीत पा. रंजित आणि उद््घाटक म्हणून आलेले गुजरातचे दलित युवा नेतृत्व जिग्नेश मेवानीदेखील सामील होते. सारी तरुणाई जोशात हलगी वाजवत, देहभान विसरून, तमीळ लोकगीतांवर ठेका धरत होती. 


यातील काही गाणी ही नुकत्याच येऊन गेलेल्या, "परियेरुम पेरूमल" सिनेमातलीही होती. ही गाणी, हलगीवर पडणारे थाप, यामागे पण त्याचं स्वतःचं असं एक सौंदर्यशास्त्र जागवत होतं. पूर्वी संगीत ऐकणं ही एका विशिष्ट वर्गाची चैनीची गोष्ट होती. विशेषत: आपापल्या हवेल्या, गढीत बसून मस्त गुडगुडी ओढत आस्वाद घ्यायची एक चैनीची गोष्ट. अर्थात तेव्हा लोकसंगीत नव्हतं, अशातला भाग नाही, पण त्याकडं वरच्या वर्गातले तुच्छतेने बघत होते. लोकसंगीत म्हणजे, काहीतरी हलक्या दर्जाचं, अशी मानसिकता रूजली होती. पण हे समीकरण मोडून काढलं ते संगीताचा अनभिषिक्त सम्राट असलेल्या "इलय्या राजाने.’ स्वतः इलय्या राजा दलित. शोषितांच्या वाट्याला येणारं सगळं जगणं त्यांनी अनुभवलं, पचवलं. त्यातून निर्माण झालेल्या संगीताने गेली चार दशकं तमीळभूमीतल्या दोन पिढ्यांना पोसलं. इलय्या राजाने प्रस्थापित संगीताला मासेस पर्यंत पोहचवून त्याचं स्वरूप बदललं. तमीळ चित्रपट संगीतातून वर्किंग क्लासची नाळ जोडली ती इलय्या राजानेच! कलैंगर करूनानिधींनी जसं तमीळ सिनेमांना पौराणिक भाकडकथेतून बाहेर काढत, समाजाला संबोधणारे चित्रपट काढण्याचा पायंडा पडला, तसंच काहीसं इलय्या राजाने संगीताच्या बाबतीत केलं. तेच लोकसंगीत व इलय्या राजाची रूपकं पा. रंजितने "परिपयेरूम पेरूमल’मध्ये वापरली. त्याच प्रकारचं संगीत आता इथं ‘वाणम आर्ट’ फेस्टिव्हल मध्येच सादर करण्यात येत होतं. 


संगीत हे फक्त श्रवणीय कर्णमधुरते पुरतचं नसून, जात व्यवस्थेनं भरडून निघालेल्या एका शोषित वर्गाची आर्त किंकाळीसुद्धा आहे. कित्येक पिढ्यांची घुसमट, जुलमी अत्याचार सहन करत रापलेले मलूल चेहरे, पण आहेत. खूप काही आहे, या संगीतात. ‘वाणम आर्ट फेस्टिव्हल’मधलं सौंदर्यशास्त्र हे अशा बऱ्याच बाबींनी वेगळं होतं. या ‘वाणम’मध्ये रॅप संगीतही सादर करण्यात. अमेरिकेतला वर्णभेदाविरुद्धच्या लढ्यात रॅप चळवळीचं एक अनन्यसाधारण महत्व राहिलंय. समाजातल्या विषमेतवर रॅप संगीताच्या माध्यमातून भाष्य करू पाहणारी एक कृष्णवर्णीय पिढी ऐंशी-नव्वदच्या दशकता उभी राहिली होती. हाच सामाईक धागा पकडून पा. रंजित "कास्टलेस कलेटिव्ह" नावाचा रॅप बँड सुरू केलाय. जातवर्ग लढा, शोषण, विषमता या मुख्य थीमवर गाणी रचणाऱ्या मुलांचा हा ग्रुप. ‘कास्टलेस कलेक्टिव्ह’चा पहिला आल्बम या ‘वाणम फेस्टिव्हल’मध्येच रिलीज झाला.


अजून खूप काही होतं, ‘वाणम’मध्ये. सर्व फेस्टिव्हलमध्ये लाल, काळ्या आणि निळ्या रंगाची मुक्त हस्ताने उधळण होत होती. नजरेला वेधून घेणाऱ्या मार्क्स, पेरियार आणि आंबेडकरांची चित्र होती. या तीन महापुरुषांचा आयोजकांवर किती प्रभाव आहे, हे पावलोपावली दिसून येत होतं. एका दालनात या तिघांची फोटो, जीवन कार्य आणि सर्व साहित्य मांडण्यात आलं होतं. विशेष बाब म्हणजे, ही सर्व पुस्तक तमीळमध्ये होती. सामन्या लोकांपर्यंत हे साहित्य पोहचलं पाहिजे, अशी त्या मागची भूमिका दिसून येत होती.


‘वाणम’मधली मला सर्वात जास्त आवडली, एक कलाकृती ती म्हणजे, एका कोपऱ्यात मोठ्या मंचकावर मागे अंधारलेलं जग, उंच इमारती असं काहीसं चित्र रेखाटलेलं होतं, आणि त्या पुढं ‘मार्व्हल युनिव्हर्स’चे सुपर हिरो जसे उभं टाकतात, तसंच मार्क्स, पेरियार आणि आंबेडकरांचे पुतळे उभे केलेले होते. या मागचं सौंदर्यशास्त्र पण खूपच कल्पक आणि भन्नाट होतं. जसं कॉमिक्समधले काल्पनिक सुपरहिरो समाजातल्या दृष्ट शक्तींशी लढतात, आणि सामन्यांना नि वाचवतात त्याच पार्श्वभूमीवर मार्क्स, आंबेडकर आणि पेरियार जगभरातल्या शोषितांसाठीचे सुपर हिरोच नाहीत का? समाजातल्या जातवर्गवर्ण व्यवस्थेच्या विरोधात, विषमतेच्या विरोधात लढणारे, हे आपले सुपर हिरोच, अशी भन्नाट मांडणी तिथं पाहायला मिळाली.


पलीकडे चित्रांच्या दालनात अनेक प्रकारची चित्र रेखाटली होती. द्रविड राजकारणातील महत्वाच्या व्यक्तींची पेन्सिल आर्ट, ऑइल पेंटिंग्ज, ग्राफिटी, असे अनेक कलाप्रकार एकाच छताखाली पाहायला मिळत होते. इतकंच नाही, तर फ्रेंच, रशियन क्रांतीमधली काही प्रसंगचित्रे पण तिथं मांडण्यात आली होती. एका बाजूला रोहित वेमुला आणि एकूणच मागच्या काही वर्षातील विद्यार्थी आंदोलनाची प्रतिकात्मक ऑइल पेंटिंग्ज, लक्ष वेधून घेत होती. मैदानाच्या मधोमध तमिळनाडूतल्या २६ दलित आयकॉन्सचे शिल्प एका मचंकावर उभे केलेले होते. हे २६ लोक म्हणजे, तमीळनाडूतल्या दलित चळवळीसाठी आपली आयुष्य वेचलेली लोकं. यातली दोनतीन सोडली, तर बाकीच्या बऱ्याच आयकॉन्सची मेनस्ट्रिम माध्यमांनी कधीच दखलही घेतली नाही. तिरुनेल्वी पोन्नस्वामी ज्यांनी दलितांच्या मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केलं होतं, विराम्मल ज्यांनी दलित महिलांसाठी शाळा उभारली होती, पांडियन ज्यांनी सवर्णांच्या कार्यक्रमात हलगी वाजवण्याच्या बलुतेदारीला विरोध केला होता. मेनस्ट्रिम माध्यमं दाखवत नाही, म्हणून काय झालं आम्हीच आमचे हिरो येणाऱ्या पिढी समोर ठेवू म्हणत आयोजकांनी अशी बरेच ‘अनसंग हिरोज’ तिथे सादर केले होते.


आयोजक पा. रंजितच्या मते, हा सोहळा संवादाचा एक अवकाश आहे, आपलं हक्काचं व्यासपीठ, जिथं आपले सामाजिक प्रश्न वेगवेगळ्या कलामाध्यमातून चर्चिले जातील. ज्या अभिजन कलांना, त्या महोत्सवांना मेनस्ट्रिम माध्यमं कव्हर करतात, पणे ते इथं सपशेल विसरून जातात, की त्या रंगबेरंगी जगाच्या पल्याडही एक शोषितांचं, कष्टकऱ्यांचं जग आहे. त्यांचं एक वेगळं स्वतंत्र सौंदर्यशास्त्र असलेलं कलाविश्व आहे. ज्याची कुठही दखल घेतली जात नाही. आम्ही वाणम फेस्टिव्हल मधून त्या दुर्लक्षित घटकांचं जगणं इथं मांडणार आहोत. जातवर्ग लढा हे आपल्या भारतीय समाजाचं एक ज्वलंत वास्तव आहे. त्याला नाकारून चालणार नाही. आमच्या सगळ्या कलांचं सादरीकरणही या दोन मुद्द्यांनाचं धरून असणार आहे. हा ‘वाणम फेस्टिव्हल’ डिसेंबरच्या शेवटी यासाठी ठेवला होता. की, येणारं नवीन वर्ष आपण सगळे समतामूलक, शोषणमुक्त समाज म्हणून एक नवी सुरूवात करूयात...’


खरं तर इकडं दक्षिणेत, तमीळभूमीत दलित-आंबेडकरी चळवळ नव्या जोमाने सांस्कृतिक, माध्यमातून उभी राहाणे ही खूप कौतुकास्पद बाब. ही सांस्कृतिक चळवळ फक्त कविता-कथा-कादंबऱ्या पुरती मर्यादित नसून, ती आता सिनेमासारख्या दृक्श्राव्य माध्यमापर्यंत देखील पोहचलीये. याचा हा पुरावा. कबाली,काला आणि आताचा ‘वाणम आर्ट फेस्टिव्हल’ ही त्याचीचं ताजी उदाहरणं. आता प्रश्न पडतो की, ‘पुरोगामी’ महाराष्ट्रात यात कुठे आह?आंबेडकरी चळवळीचा इतका देदीप्यमान इतिहास असलेला आपला महाराष्ट्र मात्र लोककला सांस्कृतिक चळवळीच्या बाबतीत कमालीचा मागास राहिला आहे. पँथर चळवळीचा काळ सोडला, तर नवंनिर्मिती जणू काही खुंटल्यासारखी झालीय आपली. दृकश्राव्य माध्यमं सोडा, पण मागच्या एका दशकात एखादी दर्जेदार दलित कादंबरी, पण शोधायला गेलं तर सापडत नाही, अशी स्थिती आहे. 


दृकश्राव्य कलामाध्यमांपर्यंत पोहचायला तर मोठा अवकाश आहे, अजून. म्हणूनच  साऱ्यांनाच पा. रंजितकडून शिकण्यासारखे खूप आहे.शोषित समाजाला संकुचित, असंघटित  ठेवणं, यासाठी इथली पुरुषसत्ताक ब्राह्मण्यवादी  सत्ता कायम प्रयत्न करत आलेली आहे, आणि करत राहणार. बाबासाहेब जे म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा यासाठीच या समाजाला न केवळ भाषिक तर प्रांतिक आणि देशी सीमारेषा ओलांडण्याची गरज आज निर्माण झाली आहे. त्याचीच एक नवी आशादायी सुरुवात म्हणून, इकडे दक्षिणेत जी सांस्कृतिक चळवळीची लाट तयार होतेय, त्याला  दाद देऊयात, आपण त्याचा भाग बनूयात आणि आपल्यातून त्याचा नवीन हुंकार भरुयात...


गुणवंत सरपाते
sarpate007@gmail.com

बातम्या आणखी आहेत...